भटकंती : निघोजचे रांजणखळगे

ranjankhalge
ranjankhalge

पुण्याहून एका दिवसात पाहून होणारी ठिकाणे अनुभवण्यासाठी आपण वेगळ्या वाटेनं जाणार आहोत; पूर्व दिशेला. निसर्गाचा आविष्कार रांजणखळगे (potholes) बघायला! अविरत वाहणाऱ्या पाण्यानं शेकडो वर्षांत कातळात घडवलेले हे शिल्पच जणू.
पुण्याच्या बाहेर पडलात की गर्दी कमी होऊन वाहतूक कमी होते. निघोजला जाण्यास दोन रस्ते. शिरूरच्या पुढं घोडनदीचा पूल ओलांडून गव्हाणवाडीच्या फाट्यावरून डावीकडं राळेगण थेरपाळ, जवळा असे छोटे छोटे पल्ले गाठून निघोज गावात पोचता येते. दुसरा मार्ग म्हणजे शिक्रापूर-गणेगाव खालसा-मलठण-टाकळी हाजी मार्गे निघोज. एका मार्गानं जाऊन दुसऱ्या मार्गाने परत आल्यास प्रवासाचा तोचतोचपणा टाळला जातो. 

शिरूरहून गेलात, की आधी आपण निघोज गावात पोचतो. तिथं वेशीजवळून रस्ता कुंडाकडं जातो. स्थानिक भाषेत कदाचित रांजणखळगे कुणाला समजणार नाहीत, पण कुंड किंवा कुंडमाऊली म्हटलात की लगेच रस्ता दाखवतील. निघोजमधील मळगंगा देवी म्हणजे पंचक्रोशीतल्या कुटुंबांची कुलदेवता. तिथलं दर्शन आटोपलं की अंदाजे दोन-अडीच किलोमीटरवर जगप्रसिद्ध रांजणखळगी आहेत. कुकडीच्या प्रवाहामुळं कातळाला भेदून पाण्याने विविध अंगांनी चौखूर वाट शोधली आहे. प्रवाहासोबत आलेल्या दगडगोट्यांमुळं आणि खडकातल्या खोलगट जागेत भोवरे तयार होऊन रांजण आणि अन्य आकाराची खळगी तयार झाली. आजही त्यातून पाणी वाहत असते. काही खळगी अगदी पुरुष-दोन पुरुष खोलीची आहेत. त्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे नदीचं पात्र जमिनीपासून जवळपास पन्नास ते साठ फूट खोलवर कातळ कापून पोचलं आहे. 

सावकाश काळजी घेत, माहीतगाराची मदत घेऊन त्यात उतरून हे प्रचंड कातळशिल्प पाहणे अविस्मरणीय अनुभव असतो. कुंडांच्या वरच्या बाजूला आता बंधारा घातल्यानं नियंत्रित पद्धतीनं पाण्याचा लयीत प्रवाह सुरू असतो. शांत झऱ्याचे झुळझुळणारे पाणी थकल्या गोंधळलेल्या मनाला उभारी देतं. सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर नदीचा संथ प्रवाह, तरीही त्या शांततेचा स्वतःचा पोत असतो. धबधब्याचा रोरावणारा उच्छल प्रवाह वेगळ्याच ऊर्जेनं भारून टाकतो. अशा सगळ्याच ध्वनिसादांचं मिश्रण मनामनात तरंग उमटवत असते. अशा जलप्रवाहाचे वेगवेगळे ध्वनी आणि त्यांचा विशाल ऑर्केस्ट्रा ऐकण्यासाठी निघोजसारखं उत्तम ठिकाण नाही. कातळातून वाट काढत जाणारे पाणी त्याच्या विविध वेगानं वेगवेगळी वाद्ये लावून बसलेल्या वादकांच्या समूहाप्रमाणे एक Philharmonic ऑर्केस्ट्रासारखे जिवंत संगीत समोर सादर करत असते. ते ऐकण्यात आगळाच अनुभव आहे. 

अलीकडं या कुंडांच्या शेजारीच नदीवर झुलता पूल आहे. त्यावरून रांजणखळग्यांची अथांग खोली अनुभवता येते. शेजारचंच मळगंगेचं, म्हणजेच कुंडमाऊलीचं नदीकाठी असलेले मंदिर असंच अथांग मनाचा ठाव घेणारं...

विशेष सूचना : अनुभवाशिवाय आणि चांगल्या प्रतीची पादत्राणे किंवा बूट असल्याशिवाय कुंडांच्या अंतराळात उतरू नये. शक्यतो सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी भेट द्यावी, जेणेकरून उन्हात आसपासचा खडक तापून होणारा उष्णतेचा त्रास टाळता येईल. आसपास कवठे यमाईचं पुरातन मंदिर, मोराची चिंचोली, आदर्शग्राम राळेगण सिद्धी, पिंपळनेरला संत निळोबाराय समाधी मंदिर अशी ठिकाणंही आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com