भटकंती : वाघाचे साम्राज्य - ताडोबा!

मयूर जितकर
Friday, 3 April 2020

प्रमुख वृक्ष - साग, बांबू, धावडा, तेंदू, मोहा, बिबळा.
प्रमुख प्राणी - बिबट्या, तरस, नीलगाय, अस्वल, जंगली कुत्रा, उदमांजर, रानमांजर, सांबर.
प्रमुख पक्षी - गरुड, बगळा, करकोचा, ससाणा, रानकोंबडा.
एकूण क्षेत्रफळ - ७०० चौरस किलोमीटर
कसे जाल? - चंद्रपूरहून ताडोबा ४० किलोमीटर अंतरावर आहे. चंद्रपूरला रेल्वे किंवा रस्तामार्गे जाता येते. सर्वांत जवळचा विमानतळ नागपूरला आहे.

सध्या कोरोनामुळे तुम्हा सर्वांना घरातच बसावे लागत असेल. मात्र, लवकरच लॉकडाऊन संपून भटकंतीला सुरवात होईल, अशी आशा आहे. तोपर्यंत, आपण महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात. आपल्या भारतात तसेच महाराष्ट्रातही अनेक राष्ट्रीय उद्याने आहेत. विविध वनस्पती व पशुपक्ष्यांच्या रक्षणासाठी त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ताडोबा हे महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून, ते चंद्रपूर जिल्ह्यात आहे.

महाराष्ट्रातील या सर्वांत पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची घोषणा १९५५मध्ये झाली. ताडोबा म्हणजे जंगलाची शान असलेल्या वाघाचे साम्राज्य होय. ताडोबा राष्ट्रीय उद्यान व अंधारी अभयारण्याचे एकत्रीकरण करून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे. वाघांबरोबरच मगर आणि गवा हेही उद्यानाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानात ठिकठिकाणी पाणवठे आहेत. 

या पाणवठ्यांशेजारी मचाणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मचाणावर बसून विविध प्राणी पाहण्याचा रोमांचक अनुभव घेता येतो. येथे पर्यटकांसाठी निवासाचीही सोय आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा आनंद काही वेगळाच. येथील जंगलात मोठ्या प्रमाणात बांबूची वने व मोहाचे वृक्षही आहेत. हिरवीगार वृक्षसंपदा, पट्टेदार वाघ व इतर पशुपक्षी पाहण्यासाठी ताडोबाला एकदा तरी आवर्जून भेट द्यायलाच हवी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiger in Tadoba