वीकएण्ड पर्यटन :  सहस्रावधी शिवलिंगांचं पाटेश्‍वर 

pateshwar
pateshwar

नुकताच श्रावण सुरू झाला आहे. पावसानेही सर्वदूर चांगली हजेरी लावली आहे. आसमंत पाचूसारखा हिरवागार बनला आहे. श्रावणात साताऱ्याजवळचं पाटेश्‍वर हे खुणावणारे मंदिर आहे. काही वर्षांपूर्वी घाटरस्ता तयार करण्यात आला असला, तरी बरंच अंतर हे आजही चढून जावं लागतं. 

साताऱ्यापासून अवघ्या १४ किलोमीटरवर देगाव नावाचं छोटंसं गाव आहे. या गावाच्या मागच्या डोंगरावर पाटेश्‍वराचं अप्रतिम मंदिर आणि आसपास पसरलेली लेणी आहेत. या लेण्यांमध्ये व इथल्या मंदिरामध्ये विविध आकार आणि प्रकारात कोरलेली शिवलिंगं पाहायला मिळतात. बोटाच्या पेरांएवढ्या उंचीपासून ते चार फूट उंचीच्या शिवलिंगांची इथं रेलचेल दिसते. या पिंडींवरील कलाकुसरीचेही विविध प्रकार पाहता येतात. पाटेश्‍वराचा डोंगर चढताना चालण्याचे श्रम जाणवू नयेत, इतकी हिरवाई सभोवताली असते. चढणीवरच पाषाणात कोरलेली गणेशाची मूर्ती दिसते. मुख्य मंदिराच्या पायथ्याशी कमलपुष्पांनी भरलेली विश्‍वेश्‍वर नावाची पुष्करिणी आहे. पुष्करिणीच्याच एका भिंतीवर शिवाची मूर्ती कोरलेली आहे. पुष्करणीला लागूनच बांधीव दगडी पायऱ्या आहेत. या मार्गानं चढत गेल्यानंतर पाटेश्‍वराचं मुख्य मंदिर लागतं. मंदिराकडं जाताना दोन शिवलिंगं दिसतात. त्यापैकी एका पिंडीच्या मध्यभागी शिवलिंग आणि त्याच्या बाजूनं ६८ सयोनी शिवलिंगं कोरलेली आहेत. दुसऱ्या शिवलिंगावर मध्यभागी दाढी-मिशा असलेलं महादेवाचं शिल्प आणि त्याच्या बाजूनं ७१ अयोनी शिवलिंगं कोरलेली आहेत. येथील लेण्यातील एका शिल्पपटातली पाच शिवलिंगं पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचं प्रतिनिधित्व करतात. हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. मंदिरासमोरचं नंदीचं शिल्प आणि गाभाऱ्यातील चार फूट उंचीच्या शिवलिंगाची प्रमाणबद्धता चकित करणारी आहे. 

थोडं पुढं गेल्यावर पाच लेण्यांचा गट दिसतो. याला बळीभद्र मंदिर लेणं म्हणतात. या प्रमुख शिल्पाव्यतिरिक्त दशावतार, अष्टमातृका, माहेश्‍वरी, नवग्रह, शेषशायी विष्णू, महिषासुरमर्दिनी, कार्तिकेय, चामुंडा आदी दैवतांची शिल्पंही पाहता येतात. या लेण्यात वृषभ-मानव म्हणजेच अग्नी-वृषाची एक सुंदर मूर्तीही आहे. समोरच्या बाजूनं ही मूर्ती दाढीधारी पुरुषाची आणि बाजूनं वृषभाची भासते. गुहेच्या एका भिंतीवर विष्णुसहस्रनामाची महती सांगण्यासाठी सहस्र शिवलिंगं कोरलेली आहेत, तर दुसऱ्या भिंतीवर सूर्यप्रतिमा आणि पुन्हा सहस्र शिवलिंगं आहेत. भालचंद्र शिव आणि ब्रह्मदेवाची शिल्पही या समूहात आहेत. या गुहांमध्ये एकमुखी, चतुर्मुखी आणि सहस्रमुखी, अशा अनेक प्रकारांत शिवलिंगं कोरलेली आहेत. 

कसे जाल? - पुण्याहून सातारामार्गे पाटेश्‍वर १२१ आणि मुंबईहून २६४ किलोमीटर. 

मुक्कामाची सोय ः सातारा शहरात अनेक हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत. साताऱ्यातील मुक्कामात अजिंक्यतारा, सज्जनगड, ठोसेघर धबधबा, कास पठार, बामणोली, चाफळ आदी ठिकाणं पाहता येतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com