वीकएण्ड पर्यटन : चित्रीकरणाचे शहर 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

वाई हे कृष्णा नदीच्या काठावर असलेले धार्मिक क्षेत्र. काही जण वाईला ‘दक्षिण काशी’ मानतात. सरदार रास्ते यांनी १७६२मध्ये बांधलेले, एकाच दगडातून सलगपणे घडविलेली मूर्ती असलेले वाईचे ढोल्या गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे.

वाईचे नाव उच्चारले, तरी आपल्या डोळ्यासमोर कृष्णामाईचा घाट आणि त्यासभोवतालचा परिसर डोळ्यासमोर येतो. महाराष्ट्राचे मोठे सांस्कृतिक संचित असलेल्या वाईला निसर्गाने भरभरून दिले आहे आणि तो ठेवा वाईकरांनी अजूनही मोठ्या निष्ठेने जपला आहे. सांस्कृतिक शहर म्हणून लौकिक असलेल्या वाईने आता चित्रीकरणाचे शहर म्हणून ओळख निर्माण केली आहे. या निमित्ताने मोठी इंडस्ट्री वाईमध्ये विकसित झाली आहे. वाई हे कृष्णा नदीच्या काठावर असलेले धार्मिक क्षेत्र. काही जण वाईला ‘दक्षिण काशी’ मानतात. सरदार रास्ते यांनी १७६२मध्ये बांधलेले, एकाच दगडातून सलगपणे घडविलेली मूर्ती असलेले वाईचे ढोल्या गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हा गणपती वाईचे ग्रामदैवत आहे. 

वाईमध्ये सिद्धेश्वर मंदिरातील श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान इत्यादी मंदिरे आहेत. वाई येथे मराठी विश्वकोश मंडळाचे कार्यालय असून येथे वैदिक शिक्षण देणारी प्राज्ञपाठशाला १९०१ पासून सुरू आहे. 

वीकएण्ड पर्यटन : शेकरूंचे आश्रयस्थान

वाई अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती, त्‍याच्या खुणा आजही जागोजागी पहायला मिळतात. कृष्णेच्या तीरावर वसलेले वाई ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. एके काळी ते इथल्या वैशिष्ट्यपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठीही प्रसिद्ध होते. वाईपासून केवळ दोन किलोमीटरवरील मेणवलीचा घाट प्रसिद्ध आहे. 

उत्तम मंदिरे 
वाईमधील घाट हे पूर्वी उपासनेसाठी वापरण्यात येत असत. या शहरामध्ये धार्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वावर होता त्यामुळे येथील मंदिरांचे आराखडे पेशवेकाळाची साक्ष देतात. घाटावर वसलेली गणपती, विष्णू आणि लक्ष्मी यांची मंदिरे ही स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. या सगळ्या मंदिरांच्या शैलीमध्ये समानता आहे. धातूवरील कलाकुसर, लाकडी स्तंभांचा कलात्मक वापर व पाषाणाने दिलेले अभेद्यपण हे यांचे वैशिष्ट्य. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या मंदिरांमध्ये लक्ष्मीचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. मंदिराच्या प्रवेशाचा दरवाजा पश्चिमाभिमुख आहे. यानंतर येतो प्रशस्त सभामंडप. पाच स्तंभ असलेल्या या सभामंडपाला काहीशा निमुळत्या असलेल्या छतामुळे गुहेसारखा आकार आलेला आहे. मंदिराच्या मुख्य शिखराला साठ उपशिखरे आहेत. या शिखरांवरचे नक्षीकाम मराठा स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण होय. उपशिखरांच्या चारही बाजूंना छत्र्या कोरलेल्या आहेत. तसेच भौमितिक आकृत्यांचा वैविध्यपूर्ण वापर करण्यात आला आहे. शिखराची रचना लक्ष्मीयंत्रासारखी करण्यात आली आहे. हे शिखर अठरा मीटर उंच आहे आणि सर्वांत वरचा आकार कलशाच्या आकाराचा आहे. गाभार्‍यामध्ये लक्ष्मीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. येथील सभामंडपाची रचना वैशिष्ठ्यपूर्ण आहे. येथे आवाज घुमत असल्यामुळे ध्वनिक्षेपकाशिवाय शेवटच्या श्रोत्यापर्यंत आवाज पोचू शकतो. वाईपासून जवळच असलेल्या बावधन गावातील बगाड ही यात्रेतील परंपरा प्रसिद्ध आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वाईपासून जवळच धोम धरण असून तो परिसर पाहण्यासारखा आहे. 

राहण्याची सोय - 
वाईमध्ये राहण्याची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था आहे. 

कसे जाल? 
- पुण्याहून स्वारगेट बसस्थानकावरून वाईसाठी स्वतंत्र बससेवा आहे. 
- खासगी वाहनाने पुणे-बंगळूर महामार्गावरून सुरूर फाट्यावरून वाईकडे जाण्याचा मार्ग आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weekend Tourism wai The City of Filming