जुन्नरमधील वारसा जपायला हवा...

सिद्धार्थ कसबे
Thursday, 21 November 2019

युनेस्को १९ ते २५ नोव्हेंबर हा आठवडा संपूर्ण जगभर ‘जागतिक वारसा सप्ताह’ म्हणून साजरा करते. याचा मुख्य उद्देश म्हणजे सर्व देशातील सर्व प्राचीन वारशांबद्दल जनजागृती करणे व या सर्व वारसास्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करणे होय. जुन्नर तालुक्‍यात असलेला सातवाहनकालीन वारसा जपायला हवा. 

युनेस्को १९ ते २५ नोव्हेंबर हा आठवडा संपूर्ण जगभर ‘जागतिक वारसा सप्ताह’ म्हणून साजरा करते. याचा मुख्य उद्देश म्हणजे सर्व देशातील सर्व प्राचीन वारशांबद्दल जनजागृती करणे व या सर्व वारसास्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करणे होय. जुन्नर तालुक्‍यात असलेला सातवाहनकालीन वारसा जपायला हवा. 

पुणे जिल्ह्यातील जुन्नर हा महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न असलेला तालुका आहे. जुन्नर हे दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन साम्राज्याच्या आर्थिक राजधानीचे शहर होते. सातवाहन काळात भारताचा व्यापार परदेशातही चालत असे. ग्रीक व रोमन येथील व्यापारी भारतात रेशीम, मसाले, हिरे, मानके, मोती यांचा व्यापार करण्यासाठी येत असत. परदेशातून येणारा सर्व माल हा कल्याणच्या बंदरावर उतरवत आणि पुढे बैलगाडीमार्फत जुन्नरच्या दिशेने घेऊन जात असत. याचा ऐतिहासिक पुरावा म्हणजे जुन्नर तालुक्‍यातील घाटघर गावाजवळ असलेला नाणेघाट हा सातवाहन कालीन व्यापारी मार्ग आजही अस्तित्वात आहे. 

कल्याण ते पैठण या व्यापारी मार्गावर नाणेघाट आहे. या नाणेघाटात सातवाहन राणी नागनीकेने व्यापारी आणि प्रवासी यांच्या विश्रांतीसाठी लेणी कोरली. त्या लेणीमधे तिने सातवाहन राजघराण्यातील सदस्यांचे पुतळे कोरून ठेवले व त्या प्रत्येक पुतळ्यावर त्यांची नावेही कोरली आहेत. आज त्या पुतळ्यांच्या पायाचे अवशेष शिल्लक आहेत. त्यांच्यावर लिहिलेल्या नावावरून त्यांची ओळख सिद्ध होते. या शिलालेखाची सुरुवात चंद्र, सूर्य यांना वंदन करून केलेली आहे. तसेच, या शिलालेखांत राणी नागणिकेने केलेल्या अनेक यज्ञांचा उल्लेख येतो. यात गाडी भरून गावांना गायी, धान्य, कपडे आदी दान दिल्याचे उल्लेख आहेत. आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी येथील शिलालेखात आलेल्या शब्दांवरून केलेली आहे.

या लेणी बाहेर व्यापारी आणि प्रवाशांसाठी ठिकठिकाणी पाण्याचे हौदसुद्धा खोदण्यात आलेले आहेत. दोन हजार वर्षांपूर्वीचा एक मोठा दगडी रांजण आज तिथे पाहायला मिळतो. एका दिवसात तो रांजण नाण्याने भरत असे. त्यावरून या घाटाला नाणेघाट असे नाव पडले असावे. जुन्नरमधून जाणाऱ्या या प्राचीन व्यापारी मार्गावर अनेक बौद्ध लेण्या व नाणेघाटाच्या संरक्षणार्थ किल्लेसुद्धा निर्माण केले गेले. भारतातील सर्वांत प्राचीन वारसा म्हणजे या बुद्धलेणी, बुद्धस्तूप, लेणींतील शिलालेख व शिल्प आणि किल्ले आहेत. त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची गरज आहे. हा वारसा आपल्याला जपायचा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Heritage Week The heritage in Junnar should be preserved