esakal | निसर्गाचा अनोखा अविष्कार - शिवथरघळ 
sakal

बोलून बातमी शोधा

Shivthar Ghal Cave in Maharashtra

शिवकाळात प्रसिद्ध असलेला जांभळीचा माळ, मठाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ आदी समर्थसाहित्याशी संबंधित ठिकाणं आहेत. या दोन्ही घळींना पर्यटकांनी आवर्जून भेट दिली पाहिजे.

निसर्गाचा अनोखा अविष्कार - शिवथरघळ 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दोन्ही बाजूंना डोंगरांचे कडे आणि मध्येच असलेली अरुंद दरी, म्हणजेच घळ. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अशा अनेक घळी आहेत. अनेक घळींना इतिहास आहे आणि त्या प्रसिद्ध आहेत. परंतु सर्वांत प्रसिद्धीला आली, ती समर्थ रामदासस्वामींची शिवथर घळ. शिवथर घळ ही तिथल्या निसर्गसौंदर्यामुळं, पावसाळ्यात तिथं कोसळणाऱ्या धबधब्यामुळं पर्यटकांना आकर्षित करते. रामदासस्वामी १६४९मध्ये या प्रदेशातील घळीत वास्तव्यास आले. त्यांनी १६६०पर्यंतचा काळ इथं व्यतीत केला आणि त्या काळात त्यांनी दासबोध आणि इतर ग्रंथसाहित्याची निर्मिती केली. दक्षिण दिग्विजयासाठी जाण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवथर घळीत येऊन समर्थांचा आशीर्वाद घेतला होता. 

पर्यटकांना आकर्षित करणारी शिवथर घळ ही वरंध घाट उतरल्यानंतर लागणाऱ्या बिरवाडी गावाजवळ आहे. घळीच्या पायथ्यापर्यंत वाहनं जाऊ शकतात. सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वाघजाईदेवीच्या कुशीत हे ठिकाण आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होतो. ही पश्‍चिमवाहिनी नदी पुढं सावित्री नदीला जाऊन मिळते. काळ नदीच्या तीरावर कुंभे, कसबे आणि आंबे अशी तीन छोटी गावं आहेत. पार्किंगच्या ठिकाणापासून पायऱ्या चढून वर आल्यानंतर शिवथर घळ दिसते. घळीच्या शेजारीच धीरगंभीर आवाजात कोसळणारा धबधबा आहे. घळीच्या वरच्या डोंगरावर चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे भग्नावशेष आहेत. इथून राजगड, रायगड, तोरणा आणि प्रतापगड साधारण समान अंतरावर आहेत. शिवथर घळीतल्या गुहेत रामदासस्वामी आणि कल्याणस्वामींच्या मूर्ती आहेत. समर्थांच्या साहित्याचं लेखन कल्याणस्वामींनी केलं होतं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वरंध-कुंभारकोंडमार्गे २० किलोमीटरवर रामदासपठार डोंगररांगेत खरी शिवथर घळ आहे. याच घळीला समर्थांनी ‘सुंदरमठ’ असं नाव दिलं होतं. रामदासपठारावर समर्थ मठाची जागा आहे. इथं १९५७ मध्ये समर्थांचं मंदिर बांधण्यात आलं. या मठापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर ही घळ आहे. मठाच्या माळापर्यंत वाहनं जाऊ शकतात. घळीच्या मुखाशी दगड आणि मातीच्या साह्यानं बांधलेला उघडा दरवाजा आहे. गुहेच्या समोरच समर्थांच्या बसण्याची जागा दिसते. साधारण एक हजार चौरस फूट क्षेत्र असलेल्या या गुहेत दगड आणि मातीचं बांधकाम केलेल्या तीन भिंती आहेत. हवा खेळती राहण्यासाठी खिडक्यासदृश पोकळ्या आहेत. गुहेच्या समोरच्या भिंतीमध्ये समर्थांच्या बसण्याची जागा खोदून काढली आहे. त्याला सिंहासन म्हणतात. त्याशिवाय देवघर आणि सात कोनाडे आहेत. घळीपासून अर्ध्या किलोमीटरवर गोविंदमाची आहे. दहा फुटांवर रामगंगा नावाचा धबधबा आहे. सुमारे ३० फुटांवर गुप्तगंगा आहे. जवळच शिवकाळात प्रसिद्ध असलेला जांभळीचा माळ, मठाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ आदी समर्थसाहित्याशी संबंधित ठिकाणं आहेत. या दोन्ही घळींना पर्यटकांनी आवर्जून भेट दिली पाहिजे, इतका हा प्रदेश देखणा आहे. शिवथर घळीचा समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे २९८५ फूट आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कसे जाल? 
- पुण्याहून भोर-वरंध-बिरवाडीमार्गे शिवथर घळ सुमारे १११ किलोमीटर. 
- मुंबईहून गोवा महामार्गानं माणगाव-लोणेरे-महाड-बिरवाडीमार्गे २०५ किलोमीटर. 
- साहसी पर्यटकांसाठी दुसरा मार्ग राजगड-भुतोंडे-बेळवंडी नदी-कुंबळ्याचा डोंगर-गोप्याघाटमार्गे कसबे शिवथरपर्यंत पोचता येतं. तथापि, हा मार्ग काहीसा अवघड आणि वेळ खाणारा आहे. 
- शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समितीच्या इमारतीमध्ये पूर्वपरवानगी घेऊन निवासाची सोय होऊ शकते. स्वत-चा शिधा दिल्यास भोजनाचीही सोय होते. पायथ्याच्या गावांमध्येही भोजनाची सोय होऊ शकते. शिवथर घळीपर्यंत एसटी बसचीही सोय आहे. 

loading image
go to top