esakal | ट्रेकर्सला खुणावणारा आणि घनदाट जंगलातला वासोटा किल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

vasota-fort

ट्रेकर्सला खुणावणारा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याचा किल्ला म्हणजे वासोटा. सदाहरित घनदाट जंगलाचा विलोभनीय अनुभव घेत या किल्ल्याची भटकंती करता येते. 

ट्रेकर्सला खुणावणारा आणि घनदाट जंगलातला वासोटा किल्ला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गिरीप्रेमींचे पाय सध्या थबकले असले, तरी वेध मात्र भविष्यात कोणता गड सर करायचा याचे मनसुबे रचायला सुरुवात झाली आहे. ट्रेकर्सला खुणावणारा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याचा किल्ला म्हणजे वासोटा. सदाहरित घनदाट जंगलाचा विलोभनीय अनुभव घेत या किल्ल्याची भटकंती करता येते. 

सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वसलेला वासोटा हा वनदुर्ग. हा किल्ला व्याघ्रगड नावानेही ओळखला जातो. साहसी ट्रेकची आवड असणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी हा आदर्श किल्ला आहे. किल्ल्यावर पाण्याची टाकी, वाड्याचे अवशेष, शिवमंदिर असून, बाबुकडा नावाचा अजस्र कडा सर्वांत मोठे आकर्षण आहे. कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वसलेला हा वनदुर्ग म्हणजे थंडी व उन्हाळ्यातील ट्रेकचा भन्नाट पर्याय. बामणोली गावातून वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी शिवसागर तलाव बोटीने पार करावा लागतो. तिथून वनखात्याच्या चेकपोस्टपासून खड्या चढाईने दोन तासांत वासोट्याच्या माथ्यावर आपण पोचतो. हा संपूर्ण प्रवास घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने नितांत सुंदर आणि आनंददायी आहे. वाटेत क्वचित प्रसंगी रानटी जनावरांचेही दर्शन होऊ शकते. यासाठी गडावर जाताना वाटाड्याची मदत घेतलीच पाहिजे. जंगलाची वाट असल्याने चुकायची जास्त शक्यता असते.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

साधारणपणे दोन ते अडीच तास पायपीट केल्यावर आपण किल्ल्यावर पोचतो. किल्ल्यावर पोचताच क्षणी समोर मारुतीराया स्वागताला सज्ज असतो. किल्ला आणि त्यावरून कोयना आणि सह्याद्रीच्या विलोभनीय दर्शनाने दोन-अडीच तास केलेल्या पायपिटीचा थकवा पार निघून जातो. वासोटा किल्ल्याच्या जवळ नागेश्‍वर नावाचे गुहेतले शिवमंदिर असून, ते बघून एका दिवसात पुन्हा वासोटा गडावर परतावे लागते किंवा तिथून खाली कोकणात चोरवणे गावात उतरता येते. वासोटा किल्ल्यावर मुक्कामाची परवानगी नसल्याने एका दिवसात हा ट्रेक करावा लागतो. रणरणत्या उन्हात जंगल ट्रेकचा हा पर्याय अतिशय सुंदर आहे. या किल्ल्यावर जाण्यापूर्वी तुम्ही कास पठाराचाही आनंद घेऊ शकता. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जायचं कसं? : साताऱ्याहून कास पठारमार्गे बामणोली गावात जायचे. पुण्याहून शक्‍यतो रात्रीचा प्रवास केल्यास सकाळी बामणोलीला पोचून दिवसभरात वासोटा बघून संध्याकाळी परतीचा प्रवास सुरू करता येतो. 

जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही. 

पाण्याची सोय : गडावर पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध आहे. 

loading image