esakal | माकडांच्या अभ्यासातून कळली रंजक माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

माकडांच्या अभ्यासातून कळली रंजक माहिती

माकडांच्या अभ्यासातून कळली रंजक माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निकोबार द्वीप समूहावरील माकडांचा अभ्यास करणाऱ्या अवधूत वेलणकर या तरुण संशोधकाला बरीच रंजक माहिती मिळाली आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण निष्कर्षांचा घेतलेला आढावा.- नीला शर्मा

माकडांच्या वर्तनातील मानसशास्त्रीय अभ्यास, काही अंशी मानवासाठी उपयुक्त ठरतो. त्याचप्रमाणे मानव व माकड यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी, माकडांच्या निरीक्षणांवर आधारित निष्कर्षांची मदत होऊ शकेल का, याचाही विचार सध्या केला जात असल्याचे वेलणकर यांनी सांगितलं.

वेलणकर म्हणाले, ‘‘माकडांचा अभ्यास मी पाच- सहा वर्षांपासून करतो आहे. बेंगळुरूमधील ग्रेट निकोबार, लिटल निकोबार व कचाल या तीन छोट्या बेटांवर माकडांची ‘लॉंग टेल मकाक’ ही प्रजाती वावरते. ही दक्षिणपूर्व आशियात सर्वत्र आढळत असली तरी भारतात मात्र फक्त या द्वीपांपुरतीच मर्यादित असल्याचं दिसतं.

‘मकाका फॅसिक्युलॉरिस उंब्रोसा'' हे तिचं शास्त्रीय नाव. या प्रजातीबद्दल ब्रिटिश काळातील काही नोंदी सापडतात. माझे पीएच.डी.चे मार्गदर्शक डॉ. एच. एन. कुमारा यांनी मला, त्सुनामीनंतरच्या दहा वर्षांच्या कालावधीत या माकडांबद्दल तपशीलवार अभ्यास करायला सांगितलं.’’

वेलणकर यांनी असंही सांगितलं की, या प्रजातीच्या संख्येबद्दल अभ्यासांती अनुमान बांधण्याचं काम माझ्याकडे होतं. त्याचबरोबर त्यांचा वावर कुठवर आणि कसा असतो, याची माहिती मी करून घेत होतो. शिवाय त्यांचे खाद्यप्रकार व खाण्याच्या पद्धतीही मी जाणून घेत होतो. या अभ्यासातून त्यांची संख्या अगोदरच्या नोंदींपेक्षा वाढलेली आढळली. ओढवलेल्या परिस्थितीत कमकुवत माकडं दगावली, पण बलवान नर टिकून राहिले. त्यामुळे नरांची संख्या जास्त होती.

संधीचा फायदा करून संकटावर मात

मिळेल त्या आहारावर जगता येण्याच्या क्षमतेमुळे मकाक प्रजाती तग धरू शकते. बेटांवर मोठ्या प्रमाणात नारळाची झाडं असल्याने तेच त्यांचं मुख्य अन्न. मात्र शहाळं अथवा सुकलेला नारळ कसा फोडायचा, आतील गर कशा प्रकारे खायचा वगैरे बाबतीत त्यांचं ज्ञान व कौशल्यं दिसून आलं.

निरनिराळ्या हंगामात मिळू शकणाऱ्‍या सत्तावीस प्रकारच्या पदार्थांवर ते जगत होते. पण माती लागलेलं फळ हातांनी चोळून स्वच्छ करणं किंवा डबक्यातील पाण्यातून काढून खाणं यांसारख्या प्रक्रिया ते करताना आढळले. प्राप्त परिस्थितीत मिळेल त्या संधीचा फायदा करून घ्यायच्या वृत्तीमुळेच ही प्रजाती तगून राहिली व पुन्हा वाढीस लागली, हे लक्षात आलं.

जगभर माकडांचा अभ्यास मानसशास्त्रीय दृष्टीने केला जातो आहे. त्यांच्या वागण्याबद्दलच्या अभ्यासातून मानवी वस्त्यांमध्ये घडणाऱ्या माकड-मानव संघर्षावर काही मार्ग निघू शकेल का, या भावनेनेही माकडांसंदर्भातील अभ्यासाकडे पाहिले जात आहे.- अवधूत वेलणकर, संशोधक

loading image
go to top