Tourism
Tourismsakal

Tourism : छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटनवाढीसाठी हवा कनेक्टिव्हिटीचा बूस्टर

मराठवाड्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरात असलेला समृद्ध ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनस्थळांमुळे पर्यटनाची राजधानी म्हणूनही बघितले जाते.

छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरात असलेला समृद्ध ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनस्थळांमुळे पर्यटनाची राजधानी म्हणूनही बघितले जाते. इथल्या पर्यटन आणि पर्यटन व्यवसाय वाढीच्यादृष्टीने कनेक्टिव्हीटी वाढणे फार गरजेचे आहे. दिल्ली, मुंबई ते छत्रपती संभाजीनगर अशी वंदे भारत रेल्वे सुरू झाली पाहिजे.

धार्मिक व पर्यटनाच्यादृष्टीने छत्रपती संभाजीनगर व परिसरात अनेक स्थळे आहेत. सध्या हिवाळ्याची सुरुवात झाली. त्यातही दिवाळीच्या सुट्या लागल्यानंतर छत्रपती संभाजीनगर व परिसरात पर्यटक येण्याचा ओघ वाढत असतो. मात्र, देशाअंतर्गत येणारे आणि परदेशातून येणारे पर्यटक वाढले पाहिजेत.

मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे महेशमाळ हिलस्टेशन म्हणून विकसित करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जाते यासाठी वैधानिक विकास मंडळानेदेखील शिफारस केली. छत्रपती संभाजीनगरात आलेला पर्यटक पुढे देवगिरीचा किल्ला, कागजीपुरा, खुलताबाद, वेरुळला जाऊन परतीच्या प्रवासात महेशमाळ या हिलस्टेशनला जाऊ शकतात.

मात्र, अजूनपर्यंत हिलस्टेशन म्हणून याचा विकास झालेला नाही. शहरातील बीबी का मकबरा, पाणचक्की, पाहून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी जाणारे पर्यटक पुन्हा छत्रपती संभाजीनगरात आल्यानंतर त्यांना रात्र पर्यटनासाठीच्या सोयी सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.

औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंतसिंग यांनी सांगितले, ‘छत्रपती संभाजीनगरातील पर्यटनाच्या वाढीसाठी दिल्ली-छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबई-छत्रपती संभाजीनगर अशी वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची फार गरज आहे.

या रेल्वेने शहर जोडले गेले तर देशातील आणि परदेशातील दोन्ही पर्यटक मोठ्या प्रमाणात वाढतील; कारण विमानाच्या वेळा पर्यटकांच्यादृष्टीने सोयीस्कर नसल्याने वंदे भारतला पर्यटक प्राधान्य देतील. रेल्वेचे दरही त्यांना परवडणारे असल्याने वंदे भारत रेल्वेसेवा सुरू झाली पाहिजे.’

‘साउंड शो’चा अद्याप आवाज नाही

शहरात येणारे पर्यटक बीबी का मकबरा, देवगिरीचा किल्ला, वेरुळ, अजिंठा या ठिकाणी उशिरापर्यंत थांबले पाहिजेत यासाठी या ठिकाणी लाइट ॲण्ड साउंड शो सुरू झाला पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून या बाबत मागणी केली जाते. मंत्रीमंडळाच्या बैठकांमध्ये याच्या घोषणा पण होतात. मात्र, प्रत्यक्षात आजपर्यंत हा शो सुरू झालेला नाही.

अहमदाबाद, बंगलोर,चेन्नई, दिल्ली म्हणजे एबीसीडी इथे जाणारा पर्यटक छत्रपती संभाजीनगराकडे कसा वळवण्याच्यादृष्टीने एबीसीडीमध्ये प्रमोशन झाले पाहिजे. देशांतर्गत व देशाबाहेरून होणाऱ्या कॉर्पोरेट सेक्टरच्या बैठका आपल्या शहरात व्हाव्यात यासाठी संबंधितांनी पुढाकार घ्यावा; कारण यानिमित्त येणारा पर्यटक इथल्या पर्यटनस्थळांना भेटी देतील व पर्यटन वाढेल.

- जयंत गोरे, स्मिता हॉलिडेज

पर्यटनवाढीच्या दृष्टीने कनेक्टिविटी वाढण्याची गरज आहे. सध्या बेंगलूर, हैद्राबादला विमानसेवा आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगरातून जयपूर, उदयपूर आणि दिल्ली असे जोडणारी विमानसेवा सुरु करणे फार गरजेचे आहे.

- जसवंतसिंग, अध्यक्ष, औरंगाबाद टुरीझम डेव्हलपमेंट फाउंडेशन

रेल्वेसेवा, विमानसेवेची कनेक्टिव्हिटी फार महत्त्वाची आहे. आज आपल्याला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रिपद मिळालेले आहे गुजरात, राजस्थानला जोडणारी छत्रपती संभाजीनगरातून रेल्वेसेवा झाली पाहिजे. राजस्थानमध्ये येणारे पर्यटक विमानसेवेअभावी छत्रपती संभाजीनगरला येत नाहीत. रेल्वेसेवा सुरू झाली तर ते येतील. देशभरात जिथे मोठ्या संख्येने पर्यटक भेटी देतात तिथे शासनाने छत्रपती संभाजीनगरातील ऐतिहासिक पर्यटनस्थळे, वारसास्थळे, तीर्थस्थळांचे प्रमोशन करावे.

- मंगेश कपोते, हेरंब ट्रॅव्हल्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com