

कोरोना (Covid 19) कालावधीत घरी बसून खूप कंटाळा आलायं? निसर्गात जाऊन मुक्त श्वास घ्यायचायं? खूप लांब न जाता कमी पैशात पर्यटन करायचायं, तुम्हाला जंगल सफारीसाठी पश्चिम महाराष्ट्र हे बेस्ट ठिकाण आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाट हा जैव विविधतेने समृध्द आहे. गर्द हिरवाई, थंड हवा, स्वच्छ वातावरण, देवराई, धार्मिक ठिकाणे एक ना अनेक छोट्या छोट्या गोष्टीत तिनही ऋतूत पर्यटनाचा मुक्त आनंद घेता येतो.
राधानगरी अभयारण्यातील दाजीपूर जंगल सफारी 1 नोव्हेबर पासून सुरु झाली आहे.
दिवाळीच्या (Diwali) सुट्टीत एकाच ठिकाणी तुम्हाला पर्यटनाचा आनंद घेता येतो. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आंबा, पावनखिंड, विशाळगड, राधानगरी (Aamba, Pavankhind, Vishalgad, Radhanagari) अभयारण्य पाहू शकता. तुम्हाला जंगल सफारीचा वेगळा आनंद घ्यायचा असेल तर एकदा दाजीपूरला अवश्य भेट द्या. राधानगरी अभयारण्यातील दाजीपूर जंगल सफारी 1 नोव्हेबर पासून सुरु झाली आहे. या अभयारण्यात तुम्हाला वन्यप्राणी,उभयचर,फुलपाखरे, वेगवेगळी औषधी वनस्पती पाहायला मिळेल.
कोल्हापूरपासून ८० कि.मी.वर निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेले दाजीपूर हे महाराष्ट्रातील सर्वात जुने व पहिले अभयारण्य. गवे हे दाजीपूर चे प्रमुख आकर्षण आहे त्याचबरोबर या ठिकाणी सात वर्षांतून एकदा कारवी वनस्पती फुलते. हे या ठिकाणचे एक वेगळे आकर्षण आहे. दाजीपूर अभयारण्यची स्थापना १९५८ मध्ये झाली. या अभयारण्यात एकूण ३५ प्रकारच्या वन्यप्राण्यांची व २३५ प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे. या जंगलात १८०० प्रकारच्या वनस्पतीही आढळतात. राधानगरी अभयारण्याचा परिसर ३५१ चौ. कि.मी. आहे. समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची ९०० ते १००० फूट आहे.
दरवर्षी जुन ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळी ऋतूत अभयारण्य पर्यटकांसाठी बंद केले जाते. हिवाळ्यातील आल्हादायक वातावरण, जंगलात पसरलेली हिरवाई,विविध पक्ष्यांचे मंजुळ आवाज व जंगलातील मातीच्या रस्त्यावरून जंगल न्याहाळत जाताना दिसणारे वन्यप्राणी,उभयचर,फुलपाखरे,पक्षी जंगल सफारी करत तुम्हाला पाहता येतात. सकाळी 6 वाजता सफारीला सुरवात होणार असून दुपारी 2.30 पर्यंत जंगल सफारी साठी प्रवेश मिळणार आहे. प्रत्येक मंगळवारी अभयरण्यास साप्ताहिक सुट्टी असेल.
काय पाहाल
जंगल सफारी करण्यासाठी राधानगरी व दाजीपूर येथून तुम्हाला जीप मिळतात. यातून तुम्ही ठाक्याचा वाडा, मुरडा बांबर, लक्ष्मी तलाव, वाघांचे पाणी,सांबर कुंड, हाडाक्याची सरी, सापळा, सावराई सडा असे नैसर्गिक पाणवठे, निरीक्षण मनोरे पाहू शकता. स्थानिक युवक गाईड तुम्हाला जंगलाची ओळख करून देतात. याशिवाय राधानगरी येथील फुलपाखरू उद्यान व दाजीपूर येथील जंगल माहिती केंद्र हि पाहतां येते.
कसे जाल
कोल्हापूर ते राधानगरी हे अंतर ५५ कि.मी. आहे. (एस.टी.बस किंवा स्वतःच्या गाडीने या ठिकाणी जाऊ शकता.)
राधानगरी पासून दाजीपूर अंतर २५ किलोमीटर आहे.
याच बरोबर दाजीपूर पासून अभयारण्य मनोरा : २२ किलोमीटर वर आहे.
राहण्याची सुविधा : दाजीपूर येथे पर्यटन मंडळाची हॉटेल, खासगी हॉटेल उपलब्ध आहेत. शिवाय राधानगरी येथे हॉटेल आणि राहण्याची सुविधा.
खाद्य पदार्थ : अस्सल कोकणी पद्धतीचे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण, शाकाहारी दूध आमटी यासह अनेक पदार्थ परिसरात ऑर्डरप्रमाणे मिळतात.चला तर मग जंगल सफारीचा आनंद घेऊया.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.