अंदमानातील ‘रुड्डी’चा थरारक अनुभव

खंड्या हा पक्षी सर्वांनाच माहिती आहे, पण भारतात खंड्या (किंगफिशर) पक्ष्याच्या सुमारे १२ प्रजाती असल्याचे फार थोड्या लोकांनाच माहिती असेल.
Ruddy Kingfisher Bird
Ruddy Kingfisher BirdSakal
Summary

खंड्या हा पक्षी सर्वांनाच माहिती आहे, पण भारतात खंड्या (किंगफिशर) पक्ष्याच्या सुमारे १२ प्रजाती असल्याचे फार थोड्या लोकांनाच माहिती असेल.

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

एवढीशी ती होडी, तीही गळती लागलेली. बाजूला पाण्यात मगरींचाच वावर असल्याने आम्ही विचित्र पेचात सापडलो. मी मात्र माघारी परतायला नकार दिला. वर्षभर या ‘रुड्डी’च्या मागावर होतो. त्यामुळे ही संधी मी नक्कीच सोडणार नव्हतो. कांदळवनात शिरताच आम्हाला ‘रुड्डी’चे दर्शन लगेच झाले, पण फांदी आड असल्यामुळे छायाचित्र मिळाले नाही. थोड्याच वेळात किमान चार ते पाच ‘रुड्डी’ आम्हाला दिसले आणि त्यांचे छायाचित्रणही करता आले. या छायाचित्रणासाठी करावी लागलेली जीवघेणी कसरतही कायम स्मरणात राहणारी अशीच आहे.

खंड्या हा पक्षी सर्वांनाच माहिती आहे, पण भारतात खंड्या (किंगफिशर) पक्ष्याच्या सुमारे १२ प्रजाती असल्याचे फार थोड्या लोकांनाच माहिती असेल. २०१६ पर्यंत भारतातील केवळ जैनी मारिया मॅडम यांनीच त्या सर्व प्रजातींचे छायाचित्रण पूर्ण केले होते. या १२ पैकी दोन प्रजाती शोधून त्यांचे छायाचित्रण करणे त्या वेळी फार कठीण होते, कारण त्या वेळी त्यांचा निश्चित ठिकाण फारसे कुणाला माहीत नव्हते. ‘ब्लिथ्स’ आणि ‘रुड्डी’ या त्या दोन प्रजाती. माझ्याही तोपर्यंत १० प्रजाती पूर्ण झाल्या होत्या आणि ‘रुड्डी’ किंगफिशरसाठी मी दोन वेळा पश्चिम बंगालमधील सुंदरबन येथे गेलो होता; परंतु यश मिळाले नव्हते. सर्वप्रथम डिसेंबर २०१५ मध्ये गेलो. त्यानंतर पावसाळ्यात ‘रुड्डी’ दिसण्याची शक्यता अधिक असते, असे कळल्याने २०१६ च्या पावसाळ्यात पुन्हा सुंदरबन गाठले होते. तो अनुभवदेखील थरारक होता.

मुळात मुसळधार पावसात बंगालच्या उपसागरात बोट घेऊन जाणेच धोकादायक. कारण तेथे तुफानी वादळे येत असतात. जोरदार पावसात तीन दिवस बोटीतून फिरूनही ‘रुड्डी’ किंगफिशरचे छायाचित्र काही टिपता आले नाही. केवळ एकदा लांबून उडताना तो दिसला इतकाच. त्यामुळे जानेवारी २०१७ ला अंदमानला जाऊन ‘रुड्डी’करिता प्रयत्न करायचे ठरवले. पाच दिवसांचा दौरा ठरला. इतके दूर जायचे तर इतरही काही पक्षी बघू, त्यामुळे जिथे ‘रुड्डी’ दिसण्याची शक्यता अधिक असते, तिथे तिसऱ्या व चौथ्या दिवशी जाण्याचे ठरवले. दोन दिवस चिडिया टापू, सिप्पी घाट आणि इतर ठिकाणी पक्षी छायाचित्रण करून तिसऱ्या दिवशी बोटीचा प्रवास करून शोल बे परिसरात पोहोचलो; पण रात्रीपासून माझे पोट बिघडल्याने खूप अशक्तपणा आला होता, पण ज्या पक्ष्यासाठी इतक्या दूरवर आलो होतो तो कसा चुकवणार? म्हणून बरे नसतानाही मी इतरांसोबत निघालो. पूर्ण प्रवास झोपून राहिलो. पोर्ट ब्लेअरला पोहोचल्यावर आणि तिथून पुढे गाडीने प्रवास केला. शोल बे येथे पोहोचल्यावर ‘रुड्डी’चा शोध सुरू झाला. मी मात्र झोपूनच राहिलो, ‘रुड्डी’ दिसला तर मला उठवा, असे मित्रांना सांगितले. तीन तास शोधल्यावरही तो दिसला नाही. ‘रुड्डी’ हा अत्यंत लाजरा व कांदळवनात आडोशाला राहणारा पक्षी असल्याने फार क्वचित मोकळ्यावर बसलेला दिसतो. त्यामुळे आमच्या मार्गदर्शकाने बोटीतून कांदळवनात प्रवेश करायचे ठरवले. माझी अवस्था मात्र अजूनही बरी नव्हती. त्यामुळे सर्व निर्णय माझे इतर मित्र आणि आमचा मार्गदर्शक डॅनिश घेत होता.

तिथे गेल्यावर केवळ एक छोटी वल्हवायची होडी उपलब्ध होती. जेमतेम दोन माणसे आणि नावाडी मावतील इतकी लहान. आम्ही मात्र चार जण अधिक आमचा मार्गदर्शक असे पाच जण होतो. त्यातही मी पोट बिघडले म्हणून आडवा झोपणार होतो. होडीत स्थिरस्थावर झाल्यावर कांदळवणात जाण्यास निघालो, तेव्हा ‘रुड्डी’ दिसला तर उठवा रे, असे पुन्हा सांगितले आणि डोळे मिटून घेतले. थोड्या वेळात लक्षात आले की होडीत पाणी शिरू लागले आहे. होडीला तीनचार ठिकाणी छिद्रे होती. त्यातून पाणी आत शिरत होते. तीन रिकाम्या प्लॅस्टिकच्या डब्यातून पाणी बाहेर ओतायचा कार्यक्रम सुरू झाला आणि हा उद्योग आम्हाला होडीतून बाहेर येईपर्यंत करावा लागणार होता.

आमच्यापैकी दोघांनी होडीबाहेर पाण्यात हात घातले. ते पाहताच नावाडी ओरडला, ‘हात आत घ्या, पाण्यात मगरी आहेत,’ ते ऐकताच आम्ही सर्वच घाबरलो. आमच्यापैकी एक मित्र तर म्हणाला, की आपण परत जाऊ. एवढीशी ती होडी, तीही गळती लागलेली. बाजूला पाण्यात मगरींचाच वावर असल्याने आम्ही विचित्र पेचात सापडलो. मी मात्र माघारी परतायला नकार दिला. वर्षभर या ‘रुड्डी’च्या मागावर होतो. त्यामुळे ही संधी मी नक्कीच सोडणार नव्हतो. कांदळवनात शिरताच आम्हाला ‘रुड्डी’चे दर्शन लगेच झाले, पण फांदी आड असल्यामुळे छायाचित्र मिळाले नाही. थोड्याच वेळात किमान चार ते पाच ‘रुड्डी’ किंगफिशर आम्हाला दिसले आणि त्यांचे छायाचित्रणही करता आले. ‘रुड्डी’चे छायाचित्रण आटोपून आम्ही सुखरूप बाहेर आलो; मात्र मगर कुठेच दिसली नाही. त्यामुळे सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतरही अंदमानला दोन वेळा जाण्याचा योग आला आणि ‘रुड्डी’चेही छान छायाचित्रण करता आले, पण कांदळवणाच्या आत मात्र पुन्हा शिरण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. ‘रुड्डी’सह अंदमानातील ती कांदळवनातील सफर मात्र कायम लक्षात राहील.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com