
मोहीम क्रेस्टेड किंगफिशरची
- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार
सत्ताल पांगोटच्या टूरमध्ये क्रेस्टेड किंगफिशरचे सर्वांनाच आकर्षण होते. त्यासाठी आम्ही पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात चाफी परिसरात गेलो. काळोख होईपर्यंत चाफीचा परिसर पिंजून काढला; पण निराशा झाली. टूरच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा एकदा चाफी परिसरात गेलो. या वेळेसदेखील बहुधा निराशाच पदरी पडणार, असे वाटत असतानाच दूर तारेवर दोन क्रेस्टेड किंगफिशर बसलेले दिसले आणि त्या संधीचे सोने झाले.
असत्ताल पांगोटची टूर जाहीर केली तेव्हा किमान दोन मेंबर्स क्रेस्टेड किंगफिशर मिळेल, याकरिता येण्यास इच्छुक होते. ही टूर म्हणजे भरपूर सुंदर पक्षी पाहायला मिळणार, हे सर्वांना माहीत होते. त्यामुळे लगेच टूर फुल्ल झाली. काठगोदामला सकाळी पाचला पोहोचलो आणि तासाभरातच गाडीने सत्ताल येथील हरी लामा यांच्या बर्डर्स डेन या छानशा रिसॉर्टमध्ये पोहोचलो. चहा-नाश्ता करून रिसॉर्ट परिसरातच असलेल्या लापणात दुपारी १ वाजेपर्यंत बसायचे ठरले होते. चक्क ४० विविध दुर्मिळ पक्ष्यांचे सुंदर छायाचित्रण आम्हाला तिथे बसल्या-बसल्या करता आले. लापणातील सत्र संपताच सर्वच खुशीत होते. सर्वांना छान छायाचित्रे मिळाली होती आणि तीही टूरच्या पहिल्याच सत्रात. आपल्याला क्रेस्टेड किंगफिशर मिळेल का, असे आमच्या टूर मेंबर्सने विचारले. जेवल्यानंतर चाफी परिसरात जाऊया. तिथे दिसण्याची अधिक शक्यता आहे, असे मी म्हणालो.
दुपारी तीन वाजता चाफी परिसरात पोहोचलो. चाफी परिसराचे ढोबळपणे दोन भाग करता येतात. एक अलीकडचा चिंचोळा भाग व दुसरा पुढचा मोठा परिसर, जिथे बऱ्याचदा क्रेस्टेड किंगफिशर दिसलेला आहे. अलीकडील भागात थांबून आम्ही आठ-दहा छोट्या पक्ष्यांचे छायाचित्रण केले. तिथेच आम्हाला क्रेस्टेड किंगफिशर समोरून उडताना दिसला; परंतु त्याने छायाचित्रणाची संधीच दिली नाही. चाफीच्या पुढच्या परिसरात नक्की मिळेल, काळजी करू नका. गाडीत बसा पुढे जाऊ असे सर्वांना सांगितले.
त्या संध्याकाळी काळोख होईपर्यंत आम्ही चाफीचा परिसर पिंजून काढला. तिथे अजून एक ग्रुप होता. तेही क्रेस्टेड किंगफिशरकरिता आले होते; पण सर्वांची निराशा झाली. दुसऱ्या दिवशी वेगळ्या ठिकाणी इतर पक्ष्यांकरिता जायचे ठरले. तिसऱ्या दिवशी सर्व आटोपून संध्याकाळी पुन्हा एकदा चाफी परिसराची भेट घेतली. पहाटेच पांगोटला निघायचे होते, त्यामुळे ती एकच संध्याकाळ आमच्याकडे क्रेस्टेड किंगफिशरच्या छायाचित्रणाकरिता उपलब्ध होती. एक ग्रुप अगोदरच तिथे होता.
थोड्याच वेळात तो ग्रुप तिथून निघाला. या वेळेसदेखील बहुधा निराशाच पदरी पडणार, असे वाटत असतानाच दूर तारेवर दोन क्रेस्टेड किंगफिशर बसलेले दिसले. कॅमेऱ्यात टिपले तेव्हा जेमतेम दोन छोटे ठिपके दिसले. आम्ही शांतपणे थांबायचे ठरवले. सोबत असलेल्या ड्रायव्हर त्रिलोक नेगी यांना थोडे पुढे जाऊन अंदाज घ्यायला सांगितले; पण तो थोडा पुढे जाताच ते दोन्ही पक्षी उडाले आणि आमच्या दिशेने आले. आमच्या समोरून पुढे गेले. आपण खाली नदीच्या पात्रात उतरूया, असे लामाजी म्हणाले. नदीचे पात्र सुकलेले होते. त्यामुळे फारशी अडचण आली नाही. खाली उतरताच आम्हाला ते दोघे पलीकडील किनाऱ्यावरील एका झाडाच्या वरच्या मोकळ्या फांदीवर बसलेले दिसले. लांबूनच रेकॉर्ड शॉट घ्या मग हळूहळू पुढे सरकू, असे सर्वांना बजावले. कुणीही तडक त्या ‘क्रेस्टेड किंगफिशर’च्या दिशेने न जाता बाजूने हळूहळू पुढे सरकू, असे सांगून आम्ही थांबत थांबत छायाचित्रण करत पुढे सरकलो. बहुधा त्या दोन्ही पक्ष्यांच्या मनातील भीती गेली असावी. त्यामुळे आम्हाला त्यांनी व्यवस्थित छायाचित्रे टिपू दिली. अशा रीतीने क्रेस्टेड किंगफिशरच्या छायाचित्रणाची इच्छा पूर्ण करून दुसऱ्या दिवशी पहाटेच पांगोटकरिता सर्व सज्ज झालो.
sudhir_gaikwad03@yahoo.co.in
Web Title: Dr Sudhir Gaikwad Writes Campaign Crested Kingfisher
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..