दिहिंग पटकाईमधील ‘कर्णा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

red headed trogon

हवामानाची अनिश्चितता, गर्द जंगले, डोंगरदऱ्या असे वातावरण असलेले आसाम आणि अरुणाचल. बरेच दिवस हे प्रदेश जंगल सफारीसाठी खुणावत होते; तो योग यावर्षी एप्रिलमध्ये पूर्ण झाला.

दिहिंग पटकाईमधील ‘कर्णा’

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

आसामच्या टूरमध्ये अखेरच्या दिवशी पुन्हा एक प्रयत्न म्हणून ‘ग्रे पिकॉक पिझन्ट’करिता दिहिंग पटकाई अभयारण्यात गेलो. यावेळेस अगदी दहा फुटांवरून झाडीतून त्याचा आवाज येत होता. अगदी खात्रीशीर मिळणार असे वाटत असतानाच त्याने आम्हाला चकवले. निराश होऊन आम्ही परतायचे ठरवले. अभयारण्यातून बाहेर पडणार इतक्यात जवळच कर्णा (रेड हेडेड ट्रोगॉन) आत बसलेला दिसला...

हवामानाची अनिश्चितता, गर्द जंगले, डोंगरदऱ्या असे वातावरण असलेले आसाम आणि अरुणाचल. बरेच दिवस हे प्रदेश जंगल सफारीसाठी खुणावत होते; तो योग यावर्षी एप्रिलमध्ये पूर्ण झाला. सात दिवसांची टूर निश्चित झाली. त्यापैकी तीन दिवस अरुणाचल प्रदेशमधील मिश्मी टेकड्या यात मायोडिया, रोइंग, तिवारी गाव व आसाममधील देहिंग पटकाई, दिब्रू सैकोहा, मागुरी बिल असे वनप्रदेश पाहायचे ठरले.

मुंबई ते दिल्ली व दिल्ली ते दिब्रुगड अशा रात्रभराच्या विमान प्रवासानंतर सकाळी नऊ वाजता दिब्रुगडला पोहोचलो. तिथून मिश्मी हिल्स साधारण पाच तासांवर आहे. वाटेत जेवण व पक्षी छायाचित्रण करायचे ठरले. रोइंगला पोहोचताच आमच्या मार्गदर्शकाने गाडीतून उतरायला सांगितले. रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी होती. येथील पक्षी अत्यंत लाजाळू असतात व आकारानेही लहान. त्यामुळे जर सतर्क नसाल, तर पक्षी तुमच्या पुढ्यात येऊन गेला तरी कळणार नाही. पंधरा मिनिटांच्या शोधानंतर आम्हाला हवा असलेला दुर्मिळ कॅचर व्रेन बॅब्लर दिसला. सर्वांनी त्याला टिपून घेतले. टूरची सुरुवातच अत्यंत दुर्मिळ अशा पक्ष्याच्या छायाचित्राने झाल्यामुळे सर्वच खुश होते. जेवल्यावर अजून थोडे पक्षी निरीक्षण केले.

गोल्डन थ्रोटेड बार्बेट (सुवर्ण कंठी तांबट) हा दुर्मिळ पक्षी अगदी जवळून पाहता आला. अंधार पडता-पडता आमच्या निवासाच्या ठिकाणी म्हणजेच मिश्मी हिल्समधील कॉफी डे हाऊसला पोहोचलो. ब्रिटिशांच्या काळात बांधलेल्या या रेस्ट हाऊसचे त्यानंतर बहुदा नूतनीकरणच झालेले नसावे. त्यामुळे अत्यंत वाईट अवस्थेत असलेल्या त्या ठिकाणी तीन रात्री काढायच्या होत्या. सर्व ग्रुप मेंबर्सना आधीच त्याबद्दल कल्पना दिलेली असल्यामुळे सर्वांचीच मानसिक तयारी झाली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपासून मात्र तिथे पाऊस पडू लागला. वातावरण पूर्णपणे बदलून गेले. सर्वत्र धुके आणि संततधार पाऊस. आपण जगापासून पूर्णपणे अलिप्त आहोत, असेच वाटू लागले. पुढे अडीच दिवस पाऊस असल्यामुळे खूप छायाचित्रण करणे शक्य झाले नाही. शेवटच्या रात्री मात्र संपूर्ण रेस्ट हाऊसमध्ये जळवांचा संचार होता. आमच्यापैकी सर्वांनाच त्याचा उपद्रव झाला.

अरुणाचलमधून आसामला आलो. तिथे चांगलेच ऊन पडले होते. वाटेतदेखील छायाचित्रण केले. रिसॉर्ट चांगले होते. लवकर जेऊन झोपूया व सकाळी पाच वाजता बाहेर पडूया असे ठरले. सकाळी मात्र वेगळेच दृश्य... आमचे रिसॉर्ट ब्रह्मपुत्रा नदीच्या काठाजवळ होते. सकाळी नदीचे पाणी रिसॉर्टमध्ये गुडघाभर शिरले होते. त्यामुळे छोट्या होडीतून रस्त्यापर्यंत जावे लागले. रात्रभर पाऊस पडल्याचा हा परिणाम होता. पुढे तीन दिवस आमचा मुक्काम असेपर्यंत आम्हाला होडीतूनच रिसॉर्टपर्यंत यावे-जावे लागले; परंतु दिवसभर अजिबात पाऊस नसल्यामुळे भरपूर छायाचित्रण करता आले. सकाळी दिहिंग पटकाई अभयारण्यात शिरलो आणि समोरच झाडाच्या फांदीवर रुडी किंगफिशर दिसला. अत्यंत दुर्मिळ. या पक्ष्याकरिता मी दोन वेळा सुंदरबनची सफर केली व शेवटी अंदमानला याचे दर्शन झाले होते आणि आता येथे सर्वांना तो सहज दिसला होता. सर्वांनी भराभर छायाचित्रे टिपली. येथे अनेक पक्ष्यांची छायाचित्रे टिपून झाल्यावर आम्ही राखी मोर (ग्रे पिकॉक पिझन्ट) या अत्यंत दुर्मिळ पक्ष्याच्या छायाचित्रणाकरिता सज्ज झालो. आमचा मार्गदर्शक आम्हाला एका विशिष्ट ठिकाणी घेऊन गेला व शांत बसून राहायला सांगितले. अत्यंत अरुंद व उंच-सखल जागी आम्ही दाटीवाटीने आठ जण बसून राहिलो. थोड्याच वेळात अगदी जवळून ‘ग्रे पिकॉक पिझन्ट’चा आवाज ऐकू येऊ लागला; पण दोन तास वाट बघूनही तो बाहेर आला नाही. शेवटी आम्ही बाहेर पडून दुसरीकडे प्रयत्न करायचे ठरवले. दरम्यान आम्हाला लाल डोक्याचा कर्णा (रेड हेडेड ट्रोगॉन) या अजून एका दुर्मिळ पक्षाचे छायाचित्रण करायचे होते. त्याचे छायाचित्रण मात्र आम्हाला करता आले; पण मनाजोगती छायाचित्रे मिळाली नाहीत.

पुढच्या दिवशी मागुरी बिल परिसरात छायाचित्रण करून शेवटच्या दिवशी पुन्हा ‘ग्रे पिकॉक पिझन्ट’करिता दिहिंग पटकाई अभयारण्यात आलो. या वेळेस अगदी दहा फुटांवरून झाडीतून त्याचा आवाज येत होता. अगदी खात्रीशीर मिळणार असे वाटत असतानाच त्याने आम्हाला चकवले. निराश होऊन आम्ही परतायचे ठरवले. सर्वच पक्षी एकाच भेटीत मिळाले तर पुन्हा यायला कारण मिळणार नाही ना... आम्हाला रिसॉर्टवर पोहोचून विमानतळावर जायचे होते. त्यामुळे थोडी घाई होती. अभयारण्यातून बाहेर पडणार इतक्यात गाडीतूनच रेड हेडेड ट्रोगॉन मार्गातून जवळच आत बसलेला दिसला. आम्ही गाडीतून उतरताच तो किंचित आत उडाला. इतक्यात त्याच्या बाजूला अजून एक (कर्णा) रेड हेडेड ट्रोगॉन येऊन बसला. कॅमेरे सरसावताच दोघे उडाले; पण ते उडताना त्यांचे बरोबर कुठूनसे अजून दोन उडताना दिसले. आम्ही थोडा वेळ शांत एका जागी राहायचे ठरवले आणि अवघ्या पाच मिनिटांत ते जवळच्या फांदीवर स्थिरावले. सर्वांनाच अप्रतिम छायाचित्रे मिळाली. ग्रे पिकॉक पिझन्ट मिळाला नाही हे सर्व लगेच विसरून गेलो आणि आनंदाने रिसॉर्टला परतलो. तब्बल १९० पक्ष्यांचे छायाचित्रण करून अरुणाचल-आसाम दौऱ्याची यशस्वी सांगता केली.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

Web Title: Dr Sudhir Gaikwad Writes Dihing Patkai Sanctuary Red Headed Trogon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top