अखेर गवसला ‘ग्रेटर हुपो लार्क’

चंडोल वर्गातील ग्रेटर हुपो लार्क आकर्षक रंग नसलेला, पण दुर्मिळ पक्षी आहे. हिवाळ्यात वाळवंटीय प्रदेशात हा महत्‌प्रयासाने दिसू शकतो.
greater hoopoe lark
greater hoopoe larksakal

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

आपण ठरवून एखादी गोष्ट करावी म्हणतो, पण बरेचदा ती होत नाही. योग्य वेळ आली की आपसूकच होते. तसेच काहीसे वन्यजीवांचे छायाचित्र काढताना होते. आपण एखादा पक्षी किंवा प्राणी पाहायचाच, असे ठरवून जंगलात जातो; पण तो दिसायचा तेव्हाच दिसतो. असेच काहीसे घडले ग्रेटर हुपो लार्कबाबत.

चंडोल वर्गातील ग्रेटर हुपो लार्क आकर्षक रंग नसलेला, पण दुर्मिळ पक्षी आहे. हिवाळ्यात वाळवंटीय प्रदेशात हा महत्‌प्रयासाने दिसू शकतो. कच्छच्या मोठ्या व छोट्या प्रदेशात, राजस्थानमध्ये हा हिवाळ्यात दिसू शकतो. चंडोल वर्गातील हा सर्वात मोठा पक्षी. चोच मात्र त्यामानाने बरीच मोठी व पुढील बाजूस वक्र असते. हे सहसा मातीतून अन्न वेचताना किंवा पळतानाच, एकटे किंवा क्वचित जोडीने दिसतात.

२०११ पासून २०१७ पर्यंत पाच वेळा छोट्या कच्छच्या प्रदेशात प्रयत्नपूर्वक याला शोधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. वाळवंटातील जमिनीशी एकरूप होणाऱ्या रंगाच्या या पक्ष्याला विस्तीर्ण पसरलेल्या प्रदेशात शोधणे तसे आव्हानाच. त्यामुळे तेव्हा फारसे वाईट वाटले नाही; परंतु जसजसा पक्ष्यांचा अभ्यास वाढला, तसतशी या पक्ष्याला बघण्याची उत्सुकता वाढली.

कोरोना महामारीच्या आधी डिसेंबर २०१९ मध्ये राजस्थानातील डेसर्ट नॅशनल पार्कची सफर केली होती. त्यावेळी या पक्ष्यासाठी प्रयत्न करायचे मनोमन ठरवले होते. सुरुवातीचे दोन दिवस माळढोक व इतर पक्षी टिपल्यावर तिसऱ्या दिवशी नेटशी या सीमेजवळच्या गावात ग्रेटर हुपो लार्ककरिता जायचे ठरले. हा परिसर संवेदनशील असल्यामुळे थोडे सांभाळून राहा व कुणाशी हुज्जत घालू नका, असे आम्हाला सांगण्यात आले. दोन तास प्रवास करून येथे पोहोचलो. त्याने निराश केले नाही. सर्वांना व्यवस्थित दिसला; पण थोडा दूर असल्याने खूप छान फोटो काढता आले नाहीत. मिळाले त्या फोटोवर समाधान मानून निघालो. टूर संपली; पण ग्रेटर हुपो लार्कचा चांगला फोटो मिळाल्याचे राहूनच गेले होते.

गेल्या महिन्यात भुज/कच्छला जाण्याचे ठरले होते. येथे ग्रेटर हुपो लार्क दिसण्याची शक्यता होती. या टूरमध्ये आमचा सर्वात जास्त प्रयत्न ठिपकेवाली पाखुर्डी (स्पॉटेड सॅन्डगृझ) या पक्ष्याकरिता होता. दुपारच्या सत्रात चंडोल, वेडा राघू, काही वटवट्या जातीचे पक्षी, रनगोजा इ. टिपून झाल्यावर ठिपकेवाली पाखुर्डी जिथे दिसू शकते, तिथे आम्हाला आमचे मार्गदर्शक भरत कापडी घेऊन गेले. तासभर, त्या विस्तीर्ण पसरलेल्या, सर्वत्र खुरटी झुडुपे असलेल्या भागात शोधाशोध केल्यावर पाखुर्डीचे तीन-चार थवे जमिनीवर अन्न वेचण्यात मग्न झालेल्या दिसल्या. त्यांचे छायाचित्रण पूर्ण करून परतणार, इतक्यात हुपो लार्क असे भरतभाई ओरडताच आम्हा सर्वांची नजर ते इशारा करत असलेल्या दिशेला वळली. तो पक्षी पटकन दिसलाच नाही. दूरवर त्याचा ठाव घेत होतो, मात्र भरतभाई खूप अलीकडे इशारा करत असल्याचे जाणवले. आमच्या गाडीपासून २५-३० मीटर अंतरावर तो होता. इकडून तिकडे धावत होता. मध्ये क्षणभर थांबताच आम्ही त्याची छायाचित्रे टिपून घेत होतो. नंतर तो एका झुडपावर काही क्षण विसावला. नेमकी तीच संधी साधून आम्ही त्याचे छायाचित्रण केले. इतक्या वर्षांची इच्छा त्यादिवशी अखेर पूर्ण झाली.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com