मागुरी बिलमधील ‘सातभाई’

मागुरी बिल परिसर पाणथळ, गवताळ व वेळूची वने असलेला. येथील पक्षी आकाराने लहान व अतिशय चपळ असतात. त्यामुळे छायाचित्र घेणे फारच कठीण.
Satbhai Bird
Satbhai BirdSakal
Summary

मागुरी बिल परिसर पाणथळ, गवताळ व वेळूची वने असलेला. येथील पक्षी आकाराने लहान व अतिशय चपळ असतात. त्यामुळे छायाचित्र घेणे फारच कठीण.

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

मागुरी बिल परिसर पाणथळ, गवताळ व वेळूची वने असलेला. येथील पक्षी आकाराने लहान व अतिशय चपळ असतात. त्यामुळे छायाचित्र घेणे फारच कठीण. या परिसरात काही पक्षी छायाचित्रित करत असतानाच ‘तांबूस टोपी सातभाई’ हा लाजरा व सतत गवताच्या आत लपून राहणारा पक्षी क्षणभरच दिसला. शांतपणे त्याला शोधू लागलो. नंतर बराच वेळ तो दिसत नव्हता. मी एका सोबत्यासोबत तिथेच रेंगाळत राहिलो. ग्रुप बराच पुढे गेला आणि आम्हीदेखील त्यांना गाठायचा निर्णय घेतला. जेमतेम चारपाच पावले पुढे गेलो आणि एका मोकळ्या फांदीवर हा ‘सातभाई’ दिसला.

भारतातील उत्तर-पूर्व क्षेत्र सध्या पक्षी निरीक्षणाकरिता खूप चर्चेत आहे. घनदाट अरण्ये व समृद्ध पक्षीवैभवामुळे प्रत्येक वन्यजीव छायाचित्रकाराला, पक्षी निरीक्षकाला एकदा तरी उत्तर-पूर्वेला जाण्याची इच्छा असते. अरुणाचलमधील तवांग, मिश्मी हिल्स, सिक्कीम, लाटपांचोर, लावा, देहिन्ग पटकाई, दिब्रू सैकोहा ही व अशी अनेक ठिकाणे आहेत; परंतु तिथे पक्षी छायाचित्रण करणे फारच कठीण असते. येथील पक्षी आकाराने लहान, अतिशय चपळ व अस्थिर असतात. अरण्येदेखील घनदाट असतात, त्यामुळे सूर्यप्रकाश कमी. वेळीअवेळी पडणारा पाऊस, दाट धुके यामुळे पक्षी छायाचित्रण म्हणजे एक कसोटीच असते.

आसाममधील मागुरी बिलबद्दल खूप ऐकले होते. काही छायाचित्रेदेखील पहिली होती. त्यामुळे कित्येक दिवस मागुरीला जाण्याची इच्छा होती. एप्रिल २०२२ मध्ये अरुणाचल प्रदेशसोबतच आसाममधील दिब्रू सैकोहा, देहिन्ग पटकाई व कित्येक दिवस मनात असलेल्या मागुरी बिलला जाण्याचे ठरले.

दौऱ्याची सुरुवात मिश्मी हिल्सपासून व उत्तरार्धात शेवटी मागुरी बिल करण्याचे निश्‍चित केले. मिश्मीमधील साडेतीन दिवसांपैकी अडीच दिवस पावसाची संततधार, दाट धुके यामुळे छायाचित्रण करताना फारच कसरत करावी लागली. उत्तर पूर्वेतील लहरी हवामान काय असते, याचा प्रत्यय आला. अरुणाचल आटोपून आसामला येईपर्यंत रात्र झाली होती. आमचा रिसॉर्ट मागुरी बिल परिसराजवळच होता. नशिबाने आसाममध्ये पाऊस नव्हता. त्यामुळे सर्वच खूश होते. जरा लवकरच जेवण उरकून झोपी गेलो, कारण सकाळी ५ वाजता छायाचित्रणाकरिता देहिन्ग पटकाईमध्ये जायचे होते. गजर लावून सकाळी ४.३० ला सर्व उठले आणि खोलीचे दार उघडताच सर्वच अवाक् झाले. आम्ही झोपल्यावर रात्रभर पाऊस पडला होता आणि त्यामुळे संपूर्ण रिसॉर्टमध्ये गुडघाभर पाणी भरले होते. तिथल्या लोकांना याची सवय असावी, कारण त्यांनी तीनचार होड्या ठेवल्या होत्या. आम्ही त्या होड्यांमधून रस्त्यावर उभ्या असलेल्या आमच्या गाड्यांकडे गेलो.

आसाममध्ये दोन दिवस देहिन्ग पटकाई व दिब्रू सैकोहामध्ये लाल डोक्याचा कर्णा, सुलतान टिट, बे वूडपेकर, हिरव्या चोचीचा मालकोहा, घुबडांच्या काही प्रजाती अशा अनेक दुर्मिळ पक्ष्यांची छायाचित्रे टिपली. तिसऱ्या दिवशी मागुरी बिल परिसरात फिरायचे ठरले. हा भाग पाणथळ, गवताळ व वेळूची वने असलेला होता. त्यामुळे येथे त्याप्रकारच्या वनात असणारे पक्षी दिसतील हे माहीत होते. दलदलीच्या बाहेरील रस्त्यावरून फिरत फिरत पक्षी पाहत होतो. गवत उंच असल्यामुळे पक्षीनिरीक्षण करणे कठीण होते. गवताळ व दलदल प्रदेशातील पक्षी क्वचितच उघड्यावर येतात. त्यामुळे त्यांचे छायाचित्रण फार कठीण असते; पण आम्हाला येथे थोड्याच वेळात चक्क जॅकपॉट लागला. चायनीज रुबी थ्रोट एका मोकळ्या वेळूच्या काडीवर बसून ओरडत होता. सर्वांनी त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. ग्रासबर्डसचे दोन प्रकार, काही खंड्याच्या प्रजाती, ब्ल्यू थ्रोट (शंकर), कुक्कुट भोवत्या, काही वार्ब्लर्स असे पक्षी छायाचित्रित करत असतानाच आमचा मार्गदर्शक अचानक सर्वांना शांत राहण्याचा इशारा करू लागला.

चेस्टनट कॅप्प्ड बॅबलर (तांबूस टोपी सातभाई) हा दुर्मिळ, अत्यंत लाजरा व सतत गवताच्या आत लपून राहणारा इवलासा पक्षी त्याला दिसला होता. हालचाल केली किंवा गडबड केली तर हा पक्षी दिसणारच नव्हता. आम्ही शांतपणे उभे राहून निरीक्षण करू लागलो. बराच वेळ झाला तरी तो दिसत नव्हता, त्यामुळे सर्व पुढे निघाले. मला मात्र अजून आशा होती, त्यामुळे एका ग्रुप मेंबरसह तिथेच रेंगाळत राहिलो. ग्रुप बराच पुढे गेला व इतर काही पक्ष्यांचे छायाचित्रण करू लागले. आम्हीदेखील त्यांना गाठायचा निर्णय घेतला. जेमतेम चारपाच पावले पुढे गेलो आणि एका किंचित मोकळ्या फांदीवर हा ‘चेस्टनट कॅप्प्ड बॅबलर’ वळून पाहत होता. जेमतेम काही क्षणच दिसला व आम्हाला पाहताच वेळूच्या झुडपात लपला. या क्षणभराच्या कालावधीच त्याची जशी मिळतील तशी छायाचित्रे आम्ही टिपली होती. एक दुर्मिळ पक्षी, कठीण परिस्थितीत छायाचित्रित करण्याचा आनंद काही औरच असतो याचा अनुभव त्या दिवशी आला. त्या सकाळी मागुरी बिल परिसरात आम्ही ३२ विविध पक्ष्यांचे छायाचित्रण केले. अनेक दिवसांपासून मागुरी बिलला जाण्याची इच्छा होती, तीही पूर्ण झाली व काही दुर्मिळ पक्ष्यांचे छायाचित्रणही करता आले. मागुरी परिसरात अजून खूप दुर्मिळ पक्षी आहेत, त्याकरिता वेगळ्या ऋतूमध्ये परत जाण्याची उत्सुकता अद्याप कायम आहे.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com