मिश्मी हिल्समधील शिंजीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mishmi hills shinjir bird

मिश्मी हिल्सच्या दौऱ्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. हवेतील प्रचंड गारठा, पावसामुळे पक्षी बरेचदा एका जागीच शांतपणे बसून राहतात.

मिश्मी हिल्समधील शिंजीर

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

मिश्मी हिल्सच्या दौऱ्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. हवेतील प्रचंड गारठा, पावसामुळे पक्षी बरेचदा एका जागीच शांतपणे बसून राहतात. याचाच फायदा आम्हाला झाला. मिश्मीमधील एका वळणावर आमच्या डोळ्यांच्या रेषेत असलेल्या एका झाडाच्या फांदीवर चक्क हिरव्या शेपटीचा शिंजीर आरामात बसून होता. ज्याकरिता जंग-जंग पछाडले, तो पक्षी आमच्यापासून अगदी काही फुटांवर बराच वेळ बसून होता...

लहान असताना गावी अंगणात चिमणीच्या आकाराचा काळपट-निळसर पक्षी जास्वंदाच्या फुलांवर हमखास दिसायचा. तितक्याच आकाराचा पण लाल रंगाचादेखील पक्षी दिसायचा. हे पक्षी इतके अस्वस्थ असायचे, की मिनिटभरदेखील एका ठिकाणी स्थिर राहात नव्हते. त्यांची ती लगबग पाहताना खूप गंमत वाटायची. नंतर जेव्हा वन्यजीव छायाचित्रणाला सुरुवात केली, तेव्हा सोशल मीडियावर या पक्ष्यांची सुंदर छायाचित्रे पाहताना आश्चर्य वाटायचे. इतके अस्थिर पक्षी छायाचित्रकाराने कसे बरे टिपले असतील? जसजसे वन्यजीव छायाचित्रणात अधिकाधिक रस घेऊ लागलो, तसतसे पक्ष्यांबद्दल वाचनदेखील करू लागलो. तेव्हा या पक्ष्यांची नावेदेखील कळली. हे शिंजीर वर्गातील पक्षी (सन बर्डस्) आणि भारतात चक्क यांच्या १३ प्रजाती आहेत. या सर्वच प्रजाती एकापेक्षा एक सुंदर आहेत, त्यांची चांगली छायाचित्रे हवी असल्यास प्रचंड चिकाटी व संयम हवा. त्याचबरोबर उच्च प्रतीची वेगवान लेन्स व कॅमेराही.

महाराष्ट्र... पश्चिम घाट तसेच नीलगिरी, अंदमान येथील शिंजीर प्रजातींचे छायाचित्रण पूर्ण केले; परंतु तरीही समाधान होत नव्हते. कारण मिसेस गोल्ड्स सनबर्ड, फायर टेल्ड सनबर्ड, ग्रीन टेल्ड सनबर्ड यांचे छायाचित्रण अद्याप बाकी होते.

२०१७मध्ये उत्तराखंडमधील सत्ताल व पांगोतचा दौरा करताना या शिंजीर प्रजातींच्या पक्ष्यांची छायाचित्रे टिपता आली; परंतु मनासारखी छायाचित्रे मिळाली नाहीत. २०२१मध्ये कोरोनादरम्यान पश्चिम बंगालमधील महानंदा-लाटपांचोरचा दौरा केला, तिथेही फायर टेल्ड सनबर्ड, ग्रीन टेल्ड सनबर्ड यांचे छायाचित्रण करता आले; परंतु येथेही मनाजोगी छायाचित्रे मिळाली नव्हती. खरेच यांची उत्तम छायाचित्रे टिपणे हे कठीण काम आहे याची जाणीव झाली. त्यामुळे या वर्षी मार्चमध्ये पुन्हा सत्ताल-पांगोतचा मोठा दौरा ठरवला. १२ दिवस तिथे मुक्काम केला; पण इतके करूनही मनाजोगते छायाचित्र मिळाले नाही. म्हणतात ना... प्रयत्नांती परमेश्वर, जेव्हा जे काम व्हायचे असेल तेव्हाच ते होईल, अगदी तसेच झाले.

एप्रिल २०२२ मध्ये अरुणाचलमधील मिश्मी व आसाममधील दिब्रू सैकोहा, देहिन्ग पटकाई व मागुरी बिलचा दौरा ठरला. या दौऱ्यात काही घुबडे व उत्तर स्थायी पक्षी छायाचित्रित करायचे ठरले; मात्र मिश्मी हिल्सला पोहोचलो व दुसऱ्या दिवसापासून मुसळधार पाऊस व प्रचंड धुके यामुळे फारसे छायाचित्रण करता आले नाही. उत्तर-पूर्वेकडील लहरी हवामानाचा फटका बसला; परंतु तरीही मध्येमध्ये पाऊस थांबताच जमेल तसे छायाचित्रण करून घेतले. त्यामुळे काही दुर्मिळ पक्ष्यांची छायाचित्रे टिपता आली. हवेतील प्रचंड गारठा, पावसामुळे पक्ष्यांचे क्रियाकर्म थोडे मंदावते व ते बऱ्याचदा एका जागीच शांतपणे बसून राहतात. याचाच फायदा आम्हाला झाला.

मिश्मीमधील एका वळणावर आमच्या डोळ्यांच्या रेषेत असलेल्या एका झाडाच्या फांदीवर तो आरामात बसून होता. होय चक्क हिरव्या शेपटीचा शिंजीर (ग्रीन टेल्ड सनबर्ड)! ज्याकरिता जंग जंग पछाडले, तो पक्षी आमच्यापासून अगदी काही फुटांवर बराच वेळ बसून होता. आम्ही या ग्रीन टेल्ड सनबर्डच्या अप्रतिम छायाचित्रांसह आम्हाला त्या दौऱ्यात तब्बल १९० पक्ष्यांची छायाचित्रे टिपता आली व बऱ्याच काळापासून मनात असलेली इच्छा पूर्ण झाली.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

Web Title: Dr Sudhir Gaikwad Writes Mishmi Hills Shinjir Bird

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top