विदेशी पर्यटकांसाठी खुशखबर : १५ ऑक्टोबरपासून सरकार देणार पर्यटन व्हिसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Foreign Tourists

पर्यटकांसाठी खुशखबर : १५ ऑक्टोबरपासून सरकार देणार पर्यटन व्हिसा

नागपूर : देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सरकारने अनेकदा लॉकडाऊन घोषित केला. या काळात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचीही परवानगी नव्हती. मंदिर, पर्यटनस्थळ सर्वांना निर्बंध लादण्यात आले होते. आता सर्व नियम शिथिल करण्यात आले आहे. ७ तारखेपासून राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्यात आली आहेत. आता १५ ऑक्टोबरपासून विदेशी पर्यटकांसाठी भारताची दारे उघडण्यात येणार आहे.

देशात कोरोना आटोक्यात येत आहे. यामुळे सरकारकडून अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात येत आहे. यामुळे नागरिकही खूश आहेत. दीड वर्षांपासून बंद असलेले पर्यटन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. सरकारच्या गृह विभागाने पहिल्या टप्प्यात १५ ऑक्टोबरपासून विदेशी पर्यटकांना भारतात पर्यटनास येण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र, यात फक्त चार्टर्ड विमानांनी भारतात येणाऱ्यांना व्हिसा देण्यात येणार आहे. १५ नोव्हेंबरनंतर अन्य विमानांनी भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांना व्हिसा उपलब्ध करून दिले जाऊ शकतो.

हेही वाचा: खांदा दुखतोय? जाणून घ्या कारणे आणि उपाय

मागच्या वर्षीपासून पर्यटन व्हिसा बंद असल्याने अनेक राज्य सरकारे आणि पर्यटन क्षेत्रातील भागधारकांनी केंद्र सरकारकडे पर्यटक व्हिसा सुरू करण्याची मागणी केली होती. यानंतर केंद्र सरकारने राज्य सरकार आणि आरोग्य, परराष्ट्र व्यवहार, नागरी उड्डाण, पर्यटन मंत्रालयासह इतर भागधारकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. असे असले तरी विदेशातून येणारे पर्यटक, त्यांना आणणारे विमान कंपन्या आणि इतर भागधारकांना आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

मागच्या वर्षी मार्चपासून व्हिसा देणे होते बंद

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर भारत सरकारने मागच्या वर्षी मार्चपासून परदेशी नागरिकांना व्हिसा देणे बंद केले होते. मात्र, कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात आल्यानंतर पर्यटक व्हिसा वगळता इतर व्हिसा परदेशी नागरिकांसाठी सुरू करण्यात आला होता. आता पर्यटन व्हिसा सुरू केल्यामुळे विदेशी पर्यटकांना पर्यटनासाठी येण्याचा मार्ग सोपा झाला आहे.

टॅग्स :India Tourism News