आधुनिक जगाचे वर्तमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Italy

आधुनिक जगाचे वर्तमान

आधुनिक जगाचे वर्तमान

डॉ. सूरज एंगडे

इटली हे युरोपातील क्रांतिकारी चळवळीचे केंद्रबिंदू. आधुनिक काळातील युरोपीय चळवळींमध्येही अग्रस्थानी दिसते. कला आणि तत्त्वज्ञान हे क्रांतिकारी चळवळीचा आत्मा असतो. पंधराव्या शतकात या विचारधारेचा उगम आणि प्रसार झाला. त्याचेच चित्र आधुनिक जगाच्या वर्तमानस्थितीत भरभरून दिसते. इटलीतल्या प्रत्येक शहरात चळवळीच्या अशाच खाणाखुणा दिसतात.

कार, रेल्वे असा मजल- दरमजल करत माझा प्रवास व्हेनिस या इटलीतील शहरात येऊन पोहोचला. अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये या शहराचे दर्शन झाले आहे. इटलीमध्ये मी यापूर्वी अनेक वेळा आलो, प्रत्येक वेळी एका मैत्रिणीला भेटायला. तिच्याबद्दल विस्ताराने बोलतोच थोड्या वेळात. व्हेनिसवरून मला इटलीच्या मध्यभागात असलेल्या टुसकनी या भागात जायचे होते. मी रेल्वेचे फस्ट क्लासचे तिकीट काढले होते. तेथेही उष्ण तापमान अगदी भारतासारखेच; पण ज्या डब्यातील माझे तिकीट होते, तिथले एसी चालत नव्हते आणि कोरोनाच्या नियमांमुळे महिला टीसीने मला दुसऱ्या डब्यात जाण्याची विनंती केली. तीसेक वर्षांची होती ती. स्कर्ट व शर्ट असा तिचा पोषाख. त्यात तिने घातलेले बूट आणि केसांना केलेल्या हायलाईट्समुळे तिच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास दिसून येत होता.

माझ्या बाजूच्या कंपार्टमेंटमध्ये एक आई आपल्या दोन गोड मुलींबरोबर प्रवास करत होती. त्या मुलींचे वय असेल चार-सहा वर्षांपर्यंत. छोटी मुलगी तर फारच खोडकर होती. ती मला पाहून हळूच हसायची. तिचे डोळे अगदी बदामासारखे. प्रवासामध्ये आम्ही चिडवाचिडवीचा खेळ खेळलो. तिच्या आईने त्याकडे दुर्लक्ष केले. मग काय ती छोटी मुलगी माझ्याकडे पाहायची आणि आमची नजर जुळताच ती चिडवायची आणि मी काही कमी नव्हतो. मी पण माझ्या बालपणाचे धडे तिथे रेखाटले. बराच वेळ आमचा खेळ सुरू होता. मध्येच वेटर आला व आम्हाला जेवण दिले. आमची रेल्वे अनेक गावे मागे टाकत दक्षिणेच्या दिशेने निघाली, तसाच माझ्याही टायपिंगचा वेग वाढत गेला. एका लांबलचक ई-मेलला उत्तर लिहिता लिहिता आणि शेजारच्या छोट्या मैत्रिणीशी खेळत खेळत आम्ही पोहचलो ते सुंदर अशा फ्लोरेन्स शहरात...

इटली हे युरोपातील क्रांतिकारी चळवळीचा केंद्रबिंदू होते. अनेक आविष्कार, विचार, कला, साहित्य, कविता, स्थापत्य कला, आदी घडामोडीही या ठिकाणी होत्या. गॅलेलिओ असो की लिओ नार्डो दा विची हे याच भागातले. आधुनिक काळातील युरोपीय चळवळींमध्येही इटली हा देश अग्रस्थानी असल्याचे दिसते. फ्लोरेन्स हे तेच शहर आहे, जिथे भांडवलशाहीचा कर्ज व बॅंकांच्या माध्यमातून युरोपात प्रसार झाला. त्याचाच फायदा घेत एक गृहस्थ स्‍वतःची आवड म्हणून ‘लॉरेन्जो दि मेदेची’च्या पुस्तकांचा संग्रह करतो. तसेच नव्या कलांचा तो पुरस्कर्ताही होता. त्याच्या निवडक कलाकारांच्या यादीत नामवंत नावे होती. कला आणि तत्त्वज्ञान हे क्रांतिकारी चळवळीचा आत्मा होते. त्याला अशा लोकांमुळेच बळ मिळाले. चित्रकारांनी त्यांच्या शैलीतून जागतिक विचार मांडला. परोपकारी प्रवृत्तीने पुढे चळवळीला प्रोत्साहन दिले. पंधराव्या शतकात या विचारधारेचा उगम आणि प्रसार झाला. त्याचेच चित्र आधुनिक जगाच्या वर्तमानस्थितीत भरभरून दिसते.

फ्लोरेन्सनंतर मी एक आठवडा टुसकनी या भागात घालवला. तिथे मला कोरोना काळात झूमवर ओळख झालेल्या सहकाऱ्यांनी भेटीचे निमंत्रण दिले. वाईन लव्हर्स अशी त्यांची ओळख करता येईल. त्यांना वाईनची भरपूर हौस. एक प्रकारे ते वाईनचे जाणकार होते. वाईन कशी प्यायची, कशी निवडायची, कसा वास घ्यायचा आणि कशा प्रकारे आस्वाद घेऊन त्याबाबत जाणून घ्यायचे, याची त्यांना भरपूर माहिती होती. मी मात्र न पिणारा. त्यांना भेटण्यासाठी मी निघालो. तिथे जाणारे रस्ते हे नागमोडी आणि डोंगरदऱ्यातून जाणारे होते. प्रवासावेळी एक नियम माझ्या यजमानांनी थोपवला. तो म्हणजे प्रवासात काम करायचं नाही आणि गाडीत फोनवर बोलायचं नाही. मला तो नियम पटला. माझ्यासारखे तिथे आणखी तीन जण होते. कामाबद्दल चर्चा करायची नाही म्हणून आम्हाला एका दुसऱ्याबद्दल माणूस म्हणून थोड्या प्रमाणात का होईना कनेक्ट होता आले. या भेटीदरम्यान काही प्रसारमाध्यमांनी जातीय जनगणनेवरील पॅनलसाठी आमंत्रण दिले होते; पण नो वर्क या अटीमुळे मला जाता आले नाही.

नंतर माझा प्रवास पूर्व किनाऱ्यावरील लिवोर्नो या शहरात पोहचला. सात वर्षांपूर्वी जेव्हा मला माझ्या वडिलांच्या निर्वाणाची बातमी मिळाली होती, तेव्हा मी याच शहरात माझ्या एका मैत्रिणीला भेटायला आलो होतो. फॅबिओला असे तिचे नाव. त्या वेळी तिने मला भरपूर आधार दिला. त्याबाबत मी तिचा ऋणी आहे. कारण त्या वेळी तिचे सहानुभूतीशील असणे हे तिची जबाबदारी होती. त्यामुळे मला अचानक या वेळी तिला भेटण्याची इच्छा झाली. तिला फोन केला आणि मी येणार असल्याचे सांगितले; परंतु भानगड अशी होती की, ती दुसऱ्या शहरात नोकरी करत होती. दर वीकेंडला ती लिवोर्नोला यायची. सुदैवाने मलाही वीकेंडला वेळ होता. सर्व काही जुळून आले आणि माझी रेल्वे पोहोचली लिवोर्नोला. फॅबिओला आणि तिचा पत्रकार, छायाचित्रकार असलेला बॉयफ्रेन्ड जॅकोमो मला रेल्वेस्थानकावर घ्यायला आले.

जॅकोनो हा अनारकीस्ट विचारधारेने प्रभावित असलेला पत्रकार होता, तर फॅबिओला ही प्रगत डाव्या विचारांची समर्थक. तब्बल आठ वर्षांपूर्वी रस्त्यावर ती चालत असताना एक डाव्या विचारांचे पत्रक विक्रीला दिसले. तिने ते विकत घेत चळवळीसाठी काही पैशांची मदत केली. तो अनुभव माझ्यावर भरपूर प्रभाव पाडून गेला. जॅकोमो आणि फॅबिओसोबत अनेक विषयांवर दीर्घ चर्चा घडल्या. इटलीच्या सर्वात प्रभावी विचारवंतांपैकी एक नाव जगप्रसिद्ध आहे आणि ते म्हणजे एंटोनियो ग्राम्शी. हे जोडपं ग्राम्शीच्या विचाराने फार प्रभावित होते. ग्राम्शीच्या विचारांमध्ये नवसमाजवादाचे दर्शन होते आणि त्याने कार्ल मार्क्सच्या सिद्धांताचा जवळून अभ्यास केला होता. भारतातील नव्या डाव्या विचारांमध्ये ग्राम्शीचा प्रभाव दिसून येतो.

सबल्टर्न स्टडीज कलेक्टिव्हने आपल्या विचारांचे श्रेय ग्राम्शीला दिले. ग्राम्शीने ऑरगॅनिक बौद्धिमत्तेची रीतसर मांडणी केली. ऑरगॅनिक इंटेलेसक्चुअला हा खऱ्या अर्थाने क्रांतिकारी असतो. कारण त्याला अवस्था आणि व्यवस्था याचे अनुभव, जगण्याचे दृष्टिकोन लाभले असते. अनेक बुद्धिजीवींनी ग्राम्शीबद्दलचा आदर आपल्या लेखनातून किंवा विचारातून व्यक्त केला आहे. कोसोमा झिने या विचारवंताने डॉ. आंबेडकर आणि ग्राम्शींवरील पुस्तकाचे संपादन केले आहे. मिशेल फुकोने त्याला सब्जेक्टिव्ह बौद्धिकतेचे मापदंड लावले. ग्राम्शीसोबत इथला प्रभावशाली कम्युनिस्ट नेता एन्रिको बर्लिंगरने सोव्हिएत राष्ट्रांपासून अंतर राखत मध्यम साम्यवादाला प्रोत्साहन दिले.

लिवोर्नो हे शहर डाव्यांचा बालेकिल्ला राहिला आहे. आश्चर्य म्हणजे येथे उजव्या विचारधारेचे किमान ५० लोकही एकत्र जमू शकत नाही. डाव्या नेत्यांना तिथे इतका आदर आहे की, उजवे विरोधकदेखील त्यांना मत देतात. लिवोर्नो हे कामगार व कर्मचाऱ्यांचे सुमारे दीड लाख लोकसंख्येचे शहर. समुद्रकाठावर असलेल्या या सुंदर शहरात वावरताना राजकीय व पुरोगामीशक्ती अगदी सहजपणे दिसते. लिवोर्नोचे आद्यवैरी शहर म्हणजे शेजारचे पिजा शहर. जगातील सात मध्ययुगीन आश्चर्यांपैकी येथील ‘टॉवर ऑफ पीजा’ येथे आहे.

लिवोर्नो असो वा पीजा व मिलान, मला बांगलादेशातून आलेले अनेक स्थलांतरित कामगार दिसले. त्यापैकी अनेक वेशभूषांमध्ये हिजाब घातलेल्या महिला आणि श्रीलंकेवरून आलेले आणि स्थायिक झालेले लोकही सिंहलीजमध्ये बोलताना आढळले. आफ्रिकन राष्ट्रांतूनदेखील इथे अनेक लोक रस्त्यावर गप्पा मारताना दिसत होते. उन्हाळ्यात तर सायंकाळचा चहा, मद्यपान करत त्यांचा उत्सव सुरू असतो. रस्त्याच्या कडेला संत्र्याची झाडे होती आणि त्याला लागलेली संत्रे पाहून असे वाटले की, कदाचित ती कृत्रिम असावीत; पण ती नव्हती. जसे इथल्या लोकांचा रंगबेरंगी पोषाख तसाच रस्त्यानेदेखील आपला इटलियन फॅशनच्या रूपाने निसर्गालाही धरले.

surajyengde@fas.harvard.edu

(लेखक जगातील आघाडीचे संशोधक आणि विचारवंत असून, ‘कास्ट मॅटर्स’ या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक आहेत.)

टॅग्स :WorldeuropeItaly