esakal | पर्यटकांनो, संधीचा घ्या फायदा; 'कास'चा हंगाम आलाय शेवटच्या टप्प्यात I Kas Pathar
sakal

बोलून बातमी शोधा

Kas Plateau

राज्‍यमार्गावरील कुमुदिनीची पांढरी शुभ्र कमळाची फुले पर्यटकांना आकर्षित करत आहेत.

पर्यटकांनो, संधीचा घ्या फायदा; 'कास'चा हंगाम आलाय शेवटच्या टप्प्यात

sakal_logo
By
सूर्यकांत पवार

कास : सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसास्थळ कास पठारावर (Kas Plateau) पर्यटनासाठी राज्यासह देश-विदेशातून बहुसंख्य पर्यटक भेट देत असून, शनिवार, रविवारमुळे हजारो पर्यटकांनी कासला भेट दिली. गाड्यांची गर्दी इतकी होती की दोन्ही पार्किंग कमी पडू लागली. कासचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. पठारावर मिकी माऊसच्या पिवळ्या रंगांची छटा पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पांढरे गेंदही बहुसंख्य असून, तर फुले कमी झाली आहेत.

राज्‍यमार्गावरील कुमुदिनीची पांढरी शुभ्र कमळाची फुले पर्यटकांना आकर्षित करत आहेत. आत्तापर्यंत हजारो पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली असून, आज शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारोंच्या संख्येने पर्यटकांनी कासच्या फुलोत्सवाचा आनंद लुटला. विविधरंगी फुलांचे गालिचे, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पुष्प पठारावर कुटुंबासमवेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. कास-महाबळेश्वर राज्‍यमार्गावरील (Kas-Mahabaleshwar State Highway) तीन किलोमीटर अंतरावरील पांढऱ्या शुभ्र कुमुदिनी फुलांचे पर्यटकांना आकर्षण होऊ लागल्याने पायी चालत या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक फुलांची पर्वणी अनुभवताना दिसत होते. जिल्ह्याला लाभलेले कास पठार हे निसर्गाचे वरदान आहे. कित्येक पर्यटक येथील फुलांसमवेत आपल्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात, यासाठी येथील मनाला मोहिनी घालणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद करत होते.

हेही वाचा: लेह-लडाख ट्रीप सुरू करण्यापूर्वी या 5 गोष्टी लक्षात असू द्या..

कास पठारावरील निसर्गसौंदर्याच्या पर्वणीचा स्वानुभव कायमस्वरूपी स्मरणात राहणारा आहे. येथील पर्यावरणाला, नाजुक दुर्मिळ फुलांना कोणतीही हानी पोचणार नाही, याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे.

-नंदकुमार असोलकर, पर्यटक, मुंबई

हेही वाचा: बजेटमध्ये बसणारे 'हे' 5 परफेक्ट डेस्टिनेशन, एकदा भेट द्याच!

पंधरा ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन बुकिंग वेबसाईटवर उपलब्ध असून, कासचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. फुलांचा बहर पाहून हंगाम समाप्तीचे नियोजन केले जाईल.

-मारुती चिकणे, अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती

loading image
go to top