नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात पर्यटनाला उधाण | Kokan Tourism | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kokan Tourism

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात पर्यटनाला उधाण

पाली : विलोभनीय निसर्ग सौंदर्य, विस्तीर्ण 240 किमीचा समुद्र किनारा, प्रसिद्ध किल्ले, ऐतिहासिक व धार्मिक स्थळे यामुळे रायगड जिल्ह्याला (Raigad) पर्यटकांची (Tourist) नेहमीच पसंती असते. सध्या नाताळच्या सुट्टीत आणि नववर्षाच्या (New Year) स्वागतासाठी येथील सर्व पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामुळे सर्वच व्यावसायिक व उद्योजक सुखावले आहेत. राहण्या-खाण्याचे दरात देखील मागील महिन्याच्या तुलनेत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दहा दिवसांत 50 कोटींच्या घरात उलाढाल होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Konkan Tourism News)

पुणे-मुंबईसह महाराष्ट्र व राज्याबाहेरील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांची पावले जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळली आहेत. सर्व ठीकाणी पर्यटकांची गर्दी आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबुन असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, छोटे-मोठे दुकानदार, वाहतूकदार, राईड्सवाले यांची सध्या चलती आहे. पर्यटकांच्या वाहनांमुळे मुंबई गोवा महामार्ग, पाली खोपोली राज्य महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई बैंगलोर महामार्ग आदी मार्गांवर गर्दी होती. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील पहायला मिळाली.

हेही वाचा: अमेरिकेतील अनोखी आणि नयनरम्य अशी ठिकाणं! पाहा PHOTOS

अलिबाग- नागाव, वरसोली, मुरुड- काशिद, श्रीवर्धन- दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहे. येथे विविध राईडचा आनंदही ते घेत आहेत. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणुन सर्वत्र परिचित आहे. माथेरानमध्ये पर्यटकांची रेलचेल पहायला मिळत आहे. आठवड्या भरापासुनच येथील काही हॉटेल व लॉज बुक झाले असले तरी येणार्‍या पर्यटकांची कोणतीच गैरसोय होणार नाही याची काळजी येथील व्यावसायिक घेत आहेत. अष्टविनायकांपैकी दोन गणपती हे रायगडमध्ये आहेत.

ते म्हणजे खालापुर तालुक्यातील महडचा वरदविनायक आणि सुधागड तालुक्यातील पालीचा बल्लाळेश्वर, सध्या येथे भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर पर्यटक मोठया संख्येने येत आहेत. समुद्रातील मुरुड जंजिरा व अलिबागचा कुलाबा किल्ला व उरण जवळील घारापुरी/अजंठा लेणी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. येथिल नगरपालिका, नगरपरिषदा, व ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात पर्यटक करामुळे भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातामुळे वाहतूक खोळंबली

राहण्या-खाण्याच्या दरात वाढ

या वर्षी हॉटेल व खाणावळीतील जेवणाच्या व राहण्याच्या दरात वाढ झाली आहे. माथेरानमध्ये मागील महिन्यात माथेरानमध्ये एका जोडप्यासाठी एक दिवस-रात्रीसाठी एक हजार ते दीड रुपये साध्या खोलीसाठी आता 1800 ते 2200 रुपये मोजावे लागत आहेत. तर दोन ते चार हजार एसी रुमसाठी भाडे आहे.

मागील महिन्यात अलिबाग व मुरुड तालुक्यात चार व्यक्तींना राहण्याचा दर एक दिवस-रात्रीसाठी साधारण खोली करिता एक ते दीड हजार रुपये असलेला दर 1800 ते 2000 रुपये झाला आहे. तर एसी व टिव्ही असलेल्या खोलीकरीत 4000 पर्यंत आहे.

तर हरिहरेश्वर, दिवेआगर व श्रीवर्धन येथे साधारण खोली करीता 1000 ते 1500 रुपयांवरून आता 2 ते 2200 रुपये मोजावे लागत आहेत. तर एसी व टिव्ही असलेल्या खोली करीता 2500 रुपयांपासुन पुढे आहे. बहुतांश ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या हॉटल मध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी राहण्याच्या दरामध्ये कपात केली जाते. तर विविध ऑफर देखील दिल्या जात आहेत.

समुद्र किनार्‍यावर विविध राईड्सची मज्जा

अलिबाग- नागाव, वरसोली, मुरुड- काशिद, श्रीवर्धन- दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहे. हे सर्व समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. किनार्‍यांवर बोटींग, घोडागाडी, बनाना, बाईक राईड, पॅरा ग्लायडिंगची मजा पर्यटक लुटत आहेत. यांचे दर देखील स्थिर आहेत.

नाताळ सुट्यांमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. 31 डिसेंबर पर्यंत गर्दी अशीच राहील. पर्यटकांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा योग्य दरात देण्यासाठी येथील व्यावसायिक सज्ज झाले आहेत. व्यावसायिकांचा व्यवसाय चांगला होत आहे. शिवाय महसूल देखील वाढत आहे.पर्यटकांनी सुरक्षित अंतर ठेवून मास्क वापरावे आणि ग्रामपंचायतीस सहकार्य करावे.

- अमित खोत, सरपंच, हरिहरेश्वर

हेही वाचा: गंगाची आत्महत्या लैंगिक शोषणातून; पोलिस कर्मचाऱ्यास पोलिस कोठडी

नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी देखील पर्यटकांची गर्दी वाढली आहे. आगाऊ (ऍडव्हान्स) बुकिंग झाले आहे. तब्बल पावणे दोन वर्षांनी खूप चांगला व्यवसाय होत आहे.

-मनीष पाटील, चालक, माऊ रिसॉर्ट, दिवेआगर

नाताळच्या सुट्टीत अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीतील बल्लाळेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. व्यवसाय खूप चांगला होतोय. डिसेंबर अखेरपर्यंत अशीच स्थिती राहील.

-अमित वरंडे, व्यावसायिक, बल्लाळेश्वर देऊळ

नाताळ सुट्ट्यांमध्ये रायगड किल्ल्यावर दुर्गप्रेमी व पर्यटकांची गर्दी खूप वाढत आहेत. येथील व्यवसायाला उभारी मिळाली आहे.

-अजित औकिरकर, व्यावसायिक, रायगड किल्ला - हिरकणी वाडी

मागील महिन्यापेक्षा या महिन्यात राहण्याखाण्याचे दर वाढले आहेत. अनेक ठिकाणी बुकिंगही फुल झाल्या आहेत.

-अविनाश भोसले, पर्यटक, औरंगाबाद

कोरोनाचे नियम पळून देवस्थान ट्रस्टने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सर्वप्रकारची व्यवस्था केली आहे.

-ऍड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली

आठवडाभर येथील रिसॉर्ट, लॉज व हॉटेल बुकिंग फुल आहे. पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत काही प्रमाणात दर वाढले असले तरी पर्यटकांना चांगल्या सोयीसुविधा पुरवत आहोत.

-सिद्धेश कोसबे, व्यवसाईक, दिवेआगर

Web Title: Kokan Tourism Natal And New Year

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KokanTourism Plan