बिकानेरचा ‘लग्गड ससाणा’ | Wildlife Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Peregrine falcon
बिकानेरचा ‘लग्गड ससाणा’

बिकानेरचा ‘लग्गड ससाणा’

बिकानेरमधील पक्षीनिरीक्षणासाठी जाणं म्हणजे शिकारी पक्ष्यांची भरलेली शाळा बघण्यासारखं आहे. किमान पाच प्रकारची गिधाडं तसंच हिवाळ्यात अनेक प्रकारचे गरुड व ससाणा प्रजातींचे शिकारी पक्षी येथे सहज दिसतात. इतरत्र दुर्मिळ असणारे हे पक्षी येथे शेकडोंच्या संख्येत आढळतात. तसाच गवसलेला हा लग्गड ससाणा...

राजस्थानातील बिकानेर शिकारी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. किमान पाच प्रकारची गिधाडं तसंच हिवाळ्यात अनेक प्रकारची गरुड व ससाणा प्रजातींचे शिकारी पक्षी येथे सहज दिसतात. इतरत्र दुर्मिळ असणारे हे शिकारी पक्षी येथे मात्र शेकडोंच्या संख्येत आढळतात. साहजिकच आम्हाला बिकानेरचा दौरा करण्याची इच्छा होती; परंतु हा योग मात्र २०१७ च्या हिवाळ्यात आला.

बिकानेरला जायचं म्हणजे मुंबई ते जयपूर विमानाने गेल्यावर तिथून पुढे ३४० किमी गाडीने. हा गाडीचा प्रवास लांबचा असला, तरी वाटेत अनेक धाब्यांवर राजस्थानी पदार्थांची चव घेऊन तो प्रवास ‘चविष्ट’ करता येतो. आम्हीही कचोरी, दही परोठे यांवर यथेच्छ ताव मारत बिकानेरच्या मार्गाला लागलो. अडीच तासाचा प्रवास शिल्लक असताना

धुकं सुरू झालं. त्यामुळे गाडीचा वेग मंदावला. थोड्याच वेळात धुकं इतकं वाढलं की पाच फुटांवरचंही दिसेना; तरीही आम्हाला घ्यायला आलेले महेंद्रभाई गाडी चालवत होते. धुकं खूपच वाढलं होतं. थोड्या वेळाने धुकं संपलं; पण पाऊस सुरू झाला, अनपेक्षित... अधेमधे पुन्हा धुकं होतंच. निसर्गाचा एक वेगळाच अवतार अनुभवत पावसाच्या सोबतीने आम्ही बिकानेर गाठलं. जेवण झाल्यावर लगेच सफारीला निघायचं होतं; पण पावसाने गोंधळ घातला.

तब्बल दोन तासाने पाऊस थांबल्यावर जितूभाईंनी जायचं का, म्हणून विचारलं. प्रकाश फारच कमी होता, छायाचित्रण करणं कठीण होतं; पण आम्ही आलो होतो पक्षी पाहायला. त्यामुळे सर्वच सफारीला निघण्यास तयार झाले. जोडबिड डम्पिंग यार्डला पोहोचलो. सर्वत्र पांढरी गिधाडं (एजिप्शियन गिधाडं), युरेशिअन गिधाडं, मध्येच काही हिमालयन गिधाडं, नेपाळी गरुड (स्टेप्पी इगल) दाटीवाटीने झाडांवर व जमिनीवरदेखील गर्दी करून बसले होते. आपल्या इथे एखादं गिधाड दिसणं दुरापास्त, पण आम्ही तर शेकडो गिधाडं, गरुड अगदी जवळून पाहत होतो. त्या अंधुक प्रकाशातही फोटोग्राफी करण्याचा मोह आवरत नव्हता. लवकरच पूर्णपणे अंधारून आलं, तसं रिसॉर्टला परतण्याचा निर्णय घेतला. छायाचित्रं खास मिळाली नव्हती म्हणून हिरमुसलो होतो. पाय निघत नव्हता. जितूभाई म्हणाले, उद्याचा हवामानाचा अहवाल चांगला आहे. पुन्हा येऊ.

दुसऱ्या दिवशी मात्र छान सूर्यप्रकाश होता. उत्तम छायाचित्रण करता आलं. तिसऱ्या दिवशी आपण लग्गड ससाणा शोधू, असं ठरलं. त्यामुळे अजून उत्साह वाढला. लग्गड ससाण्यांची एक जोडी बिकानेरच्या परिसरात असल्याचं कळलं; परंतु त्यांचं निश्चित ठिकाण माहीत नव्हतं. सकाळीच लवकर निघून शोध सुरू केला. दरम्यान सूर्योदयाचं अप्रतिम छायाचित्रण केलं. बिकानेरला सूर्यदेव अक्षरशः जमिनीवरून उगवताना पाहता येतो. आम्ही मात्र त्याच्यासमोर काही गरुड किंवा गिधाड टिपता येतं का, याचा प्रयत्न करू लागलो. ससाण्याचा शोध सुरू असतानाच साडेदहाच्या सुमारास दूरवर ससाणा उडताना दिसला. उडून लांब दृष्टीआड गेला. त्याचा माग काढणंही कठीण होतं.

आम्ही पुन्हा इतर वन्यजीव शोधू लागलो. तासाभराने पुन्हा हा ससाणा उडताना दिसला. या वेळी मात्र जवळून उडत गेला. पुढे कुठेतरी स्थिरावल्यासारखा वाटला. त्याचा माग काढण्याचं ठरवलं. जवळपासची सर्व खुरटी झुडुपं, झाडं पिंजून काढली; पण हे महाशय सापडता सापडेना. तासभर झाला असेल; अचानक जितूभाईंनी विजेच्या खांबाकडे बोट दाखवलं. त्यावर विजेचं यंत्र बसवलं होते व एका कोनाड्यात आमचा लग्गड ससाणा (लगार फाल्कन) बसला होता.

शिकारी पक्ष्यांच्या प्रजातींमधला मध्यम आकाराचा, ४०-४५ सेंमीचा, ६०० ते ८०० ग्राम वजनाचा, फिक्कट राखाडी-गडद तपकिरी रंगाचा हा पक्षी. ताशी १५० किमीपेक्षा अधिक वेगाने उडतो. छायाचित्रण करता-करता लक्षात आलं की, त्याच्या पायाखाली झाडांच्या काड्या आहेत. बहुधा घरटे बनवण्याचा प्रयत्न सुरू असावा. त्यामुळे त्याला फार त्रास न देता लांबूनच छायाचित्रण आटोपून घ्यायचं ठरवलं. त्यानेही फारसं आढेवेढे न घेता चांगली छायाचित्रं दिली, पण लांबूनच.

त्याला अधिक त्रास न देता तिथून निघायचं ठरलं. त्या वेळेस ही एकमेव जोडी तिथे होती. त्यांना पाहण्यासाठी दूरदुरून पक्षीनिरीक्षक आणि छायाचित्रकार येत होते. पुढच्याच वर्षी पुन्हा जेव्हा बिकानेरला जाण्याचा योग आला तेव्हा मात्र त्याने अगदी जवळून अप्रतिम छायाचित्रं टिपू दिलीत. त्या सकाळचे छायाचित्रणही आटोपतं घेतलं, कारण कडक दुपार झाली होती व पोटातही कावळे ओरडू लागले होते. बिकानेरची ती टूर वर्षानुवर्षं लक्षात राहील. ते शेकडो गिधाड, गरुड व लग्गड ससाण्याची ती जोडी व त्यांना शोधण्याकरिता केलेले प्रयत्न अगदी काल घडल्यासारखेच वाटतात.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

loading image
go to top