Picnic Spot Near Nagpur : वन डे ट्रिपसाठी नागपूरजवळील 'हे' बेस्ट ऑप्शन्स

चला मग नागपूर वन डे ट्रीप च्या भ्रमंतीला.
Picnic Spot Near Nagpur
Picnic Spot Near Nagpursakal

Picnic Spot Near Nagpur : वीक एंड आला की प्रत्यकाला फॅमिलीला घेऊन एका दिवसासाठी कुठे जावं हा प्रश्न पडतो. नागपूर शहरातही काही वेगळे चित्र नाही. मग खूप प्लानिंग होतं पण एकमत होत नाही. आणि प्लान फसतो. कारण आपल्यातील अनेकांना दूरदूरची पर्यटनस्थळे खूप माहिती असतात पण आपल्याच आसपासच्या सुंदर स्थळांविषयी ते अनभिज्ञ असतात.

हीच बाब हेरून ‘सकाळ’ने नागपूरच्या आसपास असलेल्या पर्यटन स्थळांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ पर्यटन साध्य होईल एवढाच हेतू नसून यामुळे आपल्या जिल्‍ह्याचा इतिहास, भुगोल, अध्यात्म, समाज समजून घेण्यासही मदत होईल. चला मग नागपूर वन डे ट्रीप च्या भ्रमंतीला. (Picnic Spot one day trip Near Nagpur)

पेंच राष्ट्रीय उद्यान
पेंच राष्ट्रीय उद्यानsakal

पेंच राष्ट्रीय उद्यान

भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यानांपैकी एक असलेले पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. नागपूरपासून अवघ्या ३५ किमीवर हे उद्यान आहे. येथील उद्यान, पेंच धरण व निसर्ग संपदा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर काही भाग असलेल्या या अभयारण्याचे नाव पेंच या नदीवरून पडले.

ती या अभयारण्याच्या मध्य भागातून वाहते. काळ्या कभिन्न खडकाळ प्रदेश व सागवानाचे जंगल असणारे हे उद्यान प्रसिध्द कादंबरी जंगल बुकचे प्रेरणा स्थान आहे.

पेंच राष्ट्रीय उद्यान हे २९२.८३ चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेले असून २०११ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन’ पुरस्कार देऊन या उद्यानाचा गौरव करण्यात आला.या उद्यानाचे वर्णन १६ शतकात सम्राट अकबर यांच्या मुघल काळात लिहलेला ऐतिहासिक दस्तऐवज ‘ऐन-ए-अकबरी’ यामध्ये ‘वन्यजीव व निसर्गाने समृद्ध’प्रदेश असा केला आहे.

इथल्या समृद्ध नैसर्गिक संपदेचा व प्राकृतिक विविधतेचा इंग्रजांवर इतका प्रभाव होता की, या अभयारण्यावर अनेक मासिकातून लेख लिहले गेले. अनेक डॉक्युमेंट्री तयार केल्या गेल्या. प्रसिध्द ब्रिटीश पत्रकार व कादंबरीकार रूड्यार्ड किपलिंग यांनी लिहलेले ‘द जंगल बुक’हे जगप्रसिद्ध पुस्तक याच जंगलावर आधारित आहे.म्हणून पेंच राष्ट्रीय उद्यान ‘मोगली लँड’ म्हणूनही ओळखले जाते.

पेंच राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या मध्यवर्ती भागात असल्याने इथले जंगल हे उष्ण कटिबंधीय पानझडी प्रकारचे आहे.या उद्यानात १२०० प्रकारच्या वनस्पती आढळतात. औषधी वनस्पतींनी युक्त असलेले हे जंगल भारतातील जैवविविधतेचे द्योतक आहे.

पेंच राष्ट्रीय उद्यान हे व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून ओळखले जात असल्याने बंगाल वाघ हा इथला मुख्य प्राणी आहे. तसेच अनेक प्रकारचे प्राणी जसे की, बिबट्या, लांडगा, कोल्हा, तरस, हरीण, गवा, नीलगाय, जंगली मांजर, कालवीट, जंगली कुत्री इत्यादी प्राणी व २१० प्रकारचे देशी व विदेशी पक्षी जसे की,गरुड, घुबड, पोपट, कबुतर, मलबार होर्नबील, असे पक्षी तसेच नाग, मण्यार, घोणस, धामण, अजगर असे ३३ प्रकारचे विषारी व बिनविषारी सर्प या उद्यानात आहेत.

वन्यजीवांचे निरीक्षण व अभ्यास करण्यासाठी तसेच पर्यटनासाठी पेंच राष्ट्रीय उद्यान सर्वात उत्तम ठिकाण आहे.

कऱ्हांडलातील जंगल सफारी
कऱ्हांडलातील जंगल सफारीsakal

कऱ्हांडलातील जंगल सफारी

विदर्भ जंगल आणि वाघ हे समीकरण तसे जगात लोकप्रिय आहे. नागपूर शहरापासून अवघ्या ५८ कि.मी. अंतरावर असलेले उमरेड कऱ्हांडला अभयारण्य आहे. या अभयारण्याला ‘जय’ या वाघामुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. नागपूर शहरापासून अवघ्या पाऊण तासांच्या अंतरावर असल्यामुळे पर्यटक या अभयारण्याला पसंती देतात. उमरेड कऱ्हांडला हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी जोडले गेलेले आहे. त्यामुळेच येथे अनेक वाघ वास्तव्यात येतात. या परिसरात निलगाय, हरीण आणि रानकुत्र्यांचे कळप आहेत. सोबतच गौर सारखे प्राणी, इतर क्वचित आढळणारे पॅंगोलिन आणि उडणारी गिलहरी यासारखे प्राणी येथे अनेकदा आढळतात वैनगंगा नदीच्या तीरावर घनदाट अरण्य असल्याने वन्यजीवांसाठी हे पर्वणी ठरले आहे. या रस्त्यावर जेवणासाठी अनेक चांगले हॉटेल उपलब्ध आहेत. तुम्ही घरून डब्बे घेऊन वनभोजनाचा आनंदही लुटू शकता. आपले कुटुंब आणि मित्र मैत्रिणींसोबत वन डे पिकनिकचा प्लॅन नक्की करा.

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला प्रसिद्धीच्या झोतात आणणाऱ्या महाप्रचंड ‘जय’ वाघाच्या मृत्यूपासून या जंगलाच्या मागे लागलेले नष्टचर्य अद्याप थांबलेले नाही. २०१८ पासून या अभयारण्यात अनेक वाघ मारले गेले आहेत. येथे बस आणि रेल्‍वेने जाता येते.

गडमंदिर, रामटेक
गडमंदिर, रामटेकsakal

गडमंदिर, रामटेक

नागपूरपासून अवघ्या ४५ किमीवर प्रभू श्रीरामाच्या पावलांनी पावन झालेले रामटेकचे गडमंदिर अभूतपूर्व आहे.श्रीरामाच्या देशातील प्रमुख काही मंदिरांमध्ये या मंदिराची गणना होते. येथे लक्ष्मण, देवी सीता व रामभक्त हनुमानाचे सुद्धा मंदिर आहे. एखाद्या किल्ल्याप्रमाणे हे मंदिर विस्तिर्ण अशा टेकडीवर आहे. येथील राधाकृष्ण मंदिरही सुंदर आहे.

गडमंदिर परिसरातच महाकवी कालीदास यांचे स्मारक उभारलेले आहे. त्याला लागूनच असलेला बगिचाही अप्रतीम आहे. गडमंदिरावर जाण्यासाठी दोन प्रकारच्या पायऱ्यांचे मार्ग आहेत. एक मोठ्या पायऱ्या व दुसऱ्या लहान पायऱ्या. मोठ्या पायऱ्यांची रचना उभी आहे. त्या सुमारे १००० आहेत. तर लहान पायऱ्या रुंद असल्याने त्यावरून जाताना कमी थकवा येतो. पण निसर्गाचा आनंद लुटत जाणे अविस्मरणीय ठरते.

यादरम्यान धुमरेश्‍वराचे मंदिरही येते. याशिवाय नृसिंह मंदिर, बहीण भावाचे देऊळ व इतरही मंदिरे पाहताना निसर्गाचे सानिध्य अनुभवता येते. महाकवी कालादासाने महाकाव्य मेघदुताची निर्मिती जेथे केली त्यांच्या नावाने असलेले कालीदास स्मारक परिसराचे सौंदर्यही मोहक आहे. विशेष म्हणजे येथूनच अंबाळा या ठिकाणी जाता येते. अंबाळा येथूनच जवळच असलेल्या नागार्जून टेकडीवरसुद्धा जाता येते.

नागार्जून परिसरही निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. विशेष म्हणून येथेही दरवर्षी श्रावण मासात दरसोमवारी भाविकांची गर्दी होते. गडमंदिर येथे वर्षभरात अनेक उत्सव होतात. कार्तिक मासातील येथील काकड आरती प्रसिद्ध आहे.

याशिवाय दसरा दिवाळी, कार्तिकी पौर्णिमा,रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळष्टमी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होते. येथील शोभायात्रा उत्सव अवघ्या देशभरात प्रसिद्ध आहेत. पण स्थानिकांशिवाय येणाऱ्या भाविकांची सोबतच पर्यटकांची संख्या वाढविण्याची गरज आहे.

रामटेक मार्गावरील मनसर येथील उत्खननात मोठ्या प्रमाणात प्राचिन काळातील सभ्यतेचे पुरावे सापडले आहेत. त्यातील पुरातन वस्तू मनसर मार्गावरील संग्रहालयात ठेवलेल्या आहेत.

मनःशांती देणारे ड्रॅगन पॅलेस
मनःशांती देणारे ड्रॅगन पॅलेस sakal

मनःशांती देणारे ड्रॅगन पॅलेस

नागपूरपासून १४ किमी अंतरावर कामठी येथे विश्वविख्यात बुद्धविहार ड्रॅगन पॅलेस टेम्पल आहे. मनःशांतीचे ते एक विश्‍वातील प्रतीक झाले आहे. कर्मयोगी दादासाहेब कुंभारे परिसराच्या दहा एकर जागेत या विहाराची निर्मिती केली आहे. तळमजल्यावर वातानुकूलित सभागृह, सुसज्ज वाचनालय व भव्य संग्रहालय आहे. पहिल्या मजल्यावर विशाल प्रार्थनागृहात भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केली आहे.

ही अप्रतिम बुद्धमूर्ती जपानतर्फे भेट मिळाली आहे. तिचे वजन ८६४ किलो आहे. चंदनाच्या अखंड लाकडापासून ती बनविण्यात आली आहे. मूर्तीचे सुंदर डोळे अर्धोन्मीलित आहेत. वैशिष्ट्य़ म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत विविध दिशांनी बुद्धर्तीकडे बघितल्यास तथागत बुद्धांच्या विविध भाव मुद्रा बघावयास मिळतात आणि अलौकिक आनंदाचा लाभ होतो.

शांतीपूर्ण वातावरण निर्मितीमुळे परिसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक मानवाला सुख, शांती, समाधानाची आणि दिव्य आनंदाची अनुभूती होते.

अत्यंत उच्च दर्जाचे बांधकाम

विहाराची निर्मितीत राजस्थान येथील संगमरवर, आग्रा येथील लाल दगड, दक्षिण भारतातून कुशल तंत्रज्ञाकडून तयार केलेले ग्रॅनाईटचे कठडे आगळे-वेगळे वैशिष्ट्य़ दर्शवितात. प्लास्टर न करता केलेले कॉक्रिट उच्च दर्जाच्या बांधकामाची साक्ष देते. विहारातील मंच शुभ्र संगमरवराचा आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पलला इंडियन काॉक्रिट इंस्टिट्यूट या संस्थेचा राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट दर्जाच्या बांधकामाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

बुद्ध धम्मातील बोधिसत्व मंजुश्रीचा इतिहास,जागतिक स्तराचे बौद्ध पर्यटनस्थळ, जपान व भारताच्या मैत्रीचे प्रतीक, आंतरराष्ट्रीय शांती, मैत्री व मानव कल्याणकारी केंद्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक, संशोधन केंद्र, राजर्षी थाटातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्णाकृती आकर्षक शिल्प, प्रदर्शन कक्षात डॉ. बाबासाहेबांची दुर्मीळ छायाचित्रे, जागतिक स्तरांवरील भव्य ग्रंथालय व संशोधन केंद्र असे येथील वैशिष्टे आहेत.

नवसाला पावणारा टेकडी गणपती
नवसाला पावणारा टेकडी गणपतीsakal

नवसाला पावणारा टेकडी गणपती

विदर्भातील अष्टविनायकातील पहिले समजले जाणारे सीताबर्डी टेकडीवरील गणेश मंदिर भाविकांसाठी एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. नागपूर रेल्वे स्थानकाजवळ असलेले एक प्राचीन गणपती मंदिर असून टेकडीचा गणपती नागपुरातील लोकप्रिय मंदिर आहे. साधेच परंतु ऐसपैस असे आहे.

झाडाच्या प्रचंड मोठ्या बुंध्याशी शांतपणे टेकून बसलेली वाटावी अशी गणपतीची भव्य मूर्ती मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेते. हे मंदिर टेकडीवर असल्याने त्याला ‘टेकडी गणपती’ मंदिर असे म्हटले जाते. नागपूरचे राजे भोसले यांनी सुमारे १८व्या शतकात हे मंदिर बांधले असल्याचे समजते. डोक्यावर मोठ्ठा मुकुट धारण केलेली आणि मंदिरात कुठूनही थेट दर्शन होणारी ही मूर्ती आहे.

गणपतीच्या डोक्यावर गंधाच्या ठिकाणी लाल रंगाचा चमचमता हिरा आहे. पूर्वी हे मंदिर हेमाडपंथी होते. पण परकीय आक्रमणात ते उद्ध्वस्त झाले. त्यानंतर काही काळाने १८६६ साली ती मूर्ती पुन्हा सापडली आणि तेथे मंदिर बांधण्यात आले. हा गणपती नागपूरकरांचे आराध्य दैवत आहे. माघ महिन्यातील चतुर्थीला येथे मोठा उत्सव असतो. लाखोंच्या संख्येने भक्त या काळात गणपतीच्या दर्शनाला येतात.

विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा
विदर्भाचे पंढरपूर धापेवाडाsakal

विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा

धापेवाडा हे नागपूर जवळ असलेले एक गाव. हे विदर्भाचे पंढरपूर म्हणुनही ओळखले जाते. येथे विठ्ठल रुखमाई देवस्थान आहे. येथे आषाढी आणि कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते.

आख्यायिका

धापेवाड्याचे संत कोलबास्वामी विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात पंढरपूरच्या अनेक वाऱ्या केल्या. परंतु कालौघात वृद्धापकाळामुळे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी ते जाऊ शकले नाहीत. त्यामुळे विठ्ठलाने कोलबास्वामींच्या स्वप्नात येऊन येथे वाहत असलेल्या चंद्रभागेच्या किनारी उत्तर दिशेला असलेल्या बाहुली विहिरीतून मूर्ती काढा.

मंदिराची स्थापना करून मूर्तीची पूजाअर्चा करा, असे सांगितले. त्यावेळी कोलबास्वामींनी उमाजी आबा कोलकुटे यांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. अशी आख्यायिका आहे.

पंढरपूरला जाऊ न शकणाऱ्या भक्तांच्या भेटीसाठी पांडुरंग गुरुपौर्णिमेला धापेवाड्यात येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच दिवशी पंढरपूरचे मुख्य मंदिरही बंद असते.

सोयीसुविधा

गेल्या काही वर्षांत धापेवाड्यात भाविकांची संख्या वाढू लागली आहे. या क्षेत्राला पर्यटन व तीर्थस्थळाचा ‘ब’ दर्जा प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे येथे काही विकासकामेही करण्यात आली.

अंतर : कळमेश्वर तालुक्यात असलेले धापेवाडा नागपूरपासून ३५ किलोमीटरवर आहे. येथे बसने, स्वतःच्या वाहनाने जाता येते.

नागपूरहून येथे पोहोचण्यासाठी ३५ मिनटांचा वेळ लागतो.

सातपुड्याच्या पर्वतराजीत महाबलीचा विश्राम
सातपुड्याच्या पर्वतराजीत महाबलीचा विश्रामsakal

सातपुड्याच्या पर्वतराजीत महाबलीचा विश्राम

श्रद्धा आणि अंधश्रध्देला देशात सीमा नाहीत. ह्या दोन्ही श्रद्धा बाळगणारा कोणताही व्यक्ती कुठेही जाऊन पोहचतो. जामसावळी हे तीर्थस्थळ मध्यप्रदेशात असले तरी सर्वाधिक भाविक नागपूर जिह्यातून दर्शनासाठी जातात.

शनिवारी तर भाविकांची प्रचंड गर्दी असते. भौगोलिक अंतर जवळ असल्याने आणि एका दिवसात जाऊन परत येणे शक्य असल्याने कुटूंबासह नागरिक जातात. नवसाला पावणारा झोपलेला मारूती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

जामसावळी हे ठिकाण दंडकारण्याचा भाग असलेल्या सातपुडा पर्वतराजीच्या मध्यभागी आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले असल्याने मनाला भूरळ पडल्याशिवाय राहत नाही. नागपूर-छिंदवाडा महामार्गावर हे तीर्थस्थळ आहे. येथे प्राचीन आणि विशालकाय पिंपळाच्या वृक्षाखाली महाबली हनुमानाची निद्रावस्थेत असलेली विशाल मूर्ती आहे.

याबाबत अनेक आख्यायिका सुद्धा आहेत. ही मूर्ती स्वयंभू असल्याचे मानतात. या स्थळाबाबत ज्या काही आख्यायिका आहेत त्यापैकी एक म्हणजे ही मूर्ती उभी होती. या मूर्तीखाली मोठा धनसाठा असल्याचे चोरांना समजले. त्यामुळे चोरट्यांनी मूर्ती बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यासाठी २० बैलांनाही जुंपले होते पण चोरांना यश आले नाही.

राजस्व विभागातील माहितीनुसार मूर्ती कुणी आणि कधी स्थापन केली याची माहिती नाही. पण पिंपळाच्या वृक्षाखाली मारूतीची मूर्ती असल्याचा उल्लेख राजस्व विभागातील १०० वर्षांपूर्वीच्या दस्तवेजात नमूद केलेले आहे. दर्शन घेतल्यानंतर सर्व मनोरथ पूर्ण होतात, अशी श्रद्धा असल्याने वर्षभरात येथे भेट देणाऱ्यांची संख्या लाखांमध्ये आहे.

यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लहान-मोठे व्यवसाय बहरले असून मारूतीरायामुळे शेकडो नागरिकांना रोजगार मिळाला असून शासनालाही राजस्व मिळत आहे. जामसावळीत भक्तनिवासही असल्याने मुक्काम करता येतो.

कोराडीचे श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान
कोराडीचे श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थानsakal

कोराडीचे श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी, हे नागपूरच्या उत्तरेस अंदाजे १५ कि.मी. अंतरावर आहे. महालक्ष्मी दगदंबा देवीचे दिवसातून तीन रुपे पाहावयास मिळतात. अशी मान्यता आहे. कोराडी देवी मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आल्यानंतर भाविक आणि पर्यटकांसाठी हे स्थळ आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

येथील भव्य रोषणाई व जिर्णोद्धार वाखाणण्याजोगा झाला आहे. या देवस्थानात स्वयंभू मूर्तीचे दर्शन भक्तांना होते. देवीच्या पूजेच्या सेवेचा मान वंशपरंपरेनुसार फुलझले परिवाराकडे आहे. फुलझले परिवार आजही देवीच्या सेवेत आहे.

जाखापूर या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये भक्त लोकांकरिता भक्तांच्या सेवेसाठी सराईचे बांधकाम, विहिरीचे बांधकाम केलेले आढळते, नंतर मंदिराच्या जिरणोद्धार झाल्यानंतर पुरातन वास्तू तोडण्यात आल्या व मंदिर मोठे बनविण्यात आले व माननीय सयुंक्त धर्मादाय आयुक्त यांच्या आदेशानुसार कोराडीचे रहिवासी जिर्णोद्वार समिती व पुजारी-परिवार आणि शहरामधील समाज सेवक, भक्त यांच्या समन्वयाने ट्रस्टची स्थापना २४ जुलाई १९८७ मध्ये करण्यात आली. या ट्रस्टचे श्री महालक्ष्मी जगदम्बा संस्थात (र. नं.अे. ५३३) कोराडी हे नाव देण्यात आले.

शांतीचा संदेश देणारी दीक्षाभूमी
शांतीचा संदेश देणारी दीक्षाभूमीsakal

शांतीचा संदेश देणारी दीक्षाभूमी

जगभरातील बौद्ध बांधवांचे हे अतिशय पवित्र आणि श्रद्धेचे ठिकाण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३ लाख ८० हजार अनुयायांसह १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बोद्ध धम्म स्वीकारला होता. यामुळे भीमबांधवांसाठी दीक्षाभूमी हे श्रद्धास्थळच आहे. प्रत्येक वर्षी अशोक विजया दशमी आणि १४ ऑक्टोबर रोजी (बाबासाहेबांनी दीक्षा स्वीकारली तो दिवस) येथे लाखो बौद्ध बांधव भेट देतात.

या जागेवर भव्य स्तूप उभारण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर असे वास्तूशिल्प आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे संपूर्ण जगात दीक्षाभूमी प्रसिद्ध आहे. पर्यटकांचेही हे मुख्य केंद्र आहे. दीक्षाभूमीवर पहिला बुद्धस्तंभ १३ एप्रिल १९५७ ला एका रात्रीतून बाबू हरिदासजी आवळे यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आला.

बुद्ध स्तंभ हा मेंढे गुरूजी ( भिक्खू धीरधम्म ) यांनी एका रात्रीतून बांधला. स्तंभावरील बुद्धमूर्ती भीमराव गजघाटे यांनी तयार केली. सोबतच अनेक कार्यकर्त्यांनी बुद्ध स्तंभ उभारण्यास आवळे बाबूस सहकार्य केले होते. ही दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग, शांती आणि मानवतेची प्रेरणा देणारी आहे. नागपुरातील या स्थळावरील चैतन्य आणि अभूतपूर्व शांतीचा आनंद घ्यायचा असेला तर नक्कीच एकदा यास भेट द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com