पुरातन ‘बाणगंगा’

मुंबई शहराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे माणसं सतत गर्दीतून मार्ग काढत घड्याळाच्या काट्यावर चालत असली तरी प्रत्येक जण आपला निवांत कोपरा शोधून काढत असतो.
Banganga Lake
Banganga LakeSakal
Summary

मुंबई शहराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे माणसं सतत गर्दीतून मार्ग काढत घड्याळाच्या काट्यावर चालत असली तरी प्रत्येक जण आपला निवांत कोपरा शोधून काढत असतो.

गतिमान जीवनशैलीच्या आधुनिक धबडग्यात पुरातन, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेल्या अनेक वास्तू आणि ठिकाणं आजही मुंबईत अस्तित्वात आहेत. त्यापैकीच एक ठिकाण म्हणजे ‘बाणगंगा तलाव’ होय.

मुंबई शहराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे माणसं सतत गर्दीतून मार्ग काढत घड्याळाच्या काट्यावर चालत असली तरी प्रत्येक जण आपला निवांत कोपरा शोधून काढत असतो. समुद्रकिनारे, बागा, मैदाने, किल्ले या सार्वजनिक जागा लोकांनी ओसंडून वाहत असताना याच मुंबईत अशी काही ठिकाणं आहेत, जिथे गेल्यावर खरंच आपण मुंबई शहरात आहोत का, अशी शंका येते.

वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नी रोड आणि ग्रँट रोड रेल्वेस्थानकांपासून जवळ आहे. मलबार हिलच्या एका छोटेखानी टेकडीवर वसलेल्या वाळकेश्वर मंदिर परिसरात असलेला पाण्याचा तलाव ‘बाणगंगा’ या नावाने ओळखला जातो. मात्र तेवढीच त्याची ओळख नसून पौराणिक पार्श्वभूमी लाभलेला हा तलाव भूविज्ञान आणि स्थापत्यकलेचा एक उत्तम मिलाफ आहे. वाळकेश्वर परिसरात फिरत असताना एखादा तलाव या ठिकाणी असेल असे नवख्या माणसाला चुकूनसुद्धा वाटणार नाही. कारण मुख्य रस्त्याला लागून आतमध्ये असलेल्या बैठ्या वस्त्यांनी या तलावाला वेढलेले आहे. बाणगंगाच्या गल्लीतून आत चालत गेल्यानंतर तलावाकडे जाणारी वाट निमुळती होत जाते आणि दगडी पायऱ्या लागतात. या पायऱ्या उतरून गेल्यानंतर अचानक समोर आयताकृती तलावाचे दर्शन होते. आकाराने हा तलाव फार मोठा नसल्याने नजरेच्या एका टप्प्यात सहज मावतो. पण तलावाच्या भौगोलिक स्थितीचे महत्त्व जाणून घ्यायचे असेल तर आजूबाजूच्या एखाद्या उंच इमारतीवर जायला हवे. चहुबाजूंनी बांधलेल्या दगडी पायऱ्या, भोवताली दिसणारे मंदिरांचे कळस आणि अथांग पसरलेल्या अरबी समुद्राच्या काठाशी वसलेलं हे एक छोटंसं तीर्थक्षेत्र असल्यासारखे भासते.

या जागेबाबत पुराणातील अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. एक आख्यायिका अशी आहे की, शिवलिंगाच्या पूजेसाठी पाणी हवे होते म्हणून रामाने याच ठिकाणी बाण मारला आणि तेव्हा गंगा अवतीर्ण झाली. दुसरी आख्यायिका असं सांगते की, राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना समुद्राजवळच्या एका टेकडीवर आले असता, सीतेला पिण्यासाठी पाणी कुठेच मिळेना. त्यावेळी रामाने समुद्रकाठच्या या वालुकामय जमिनीत एक बाण मारला आणि या जमिनीतून गोड्या पाण्याचा झरा फुटला. तिसऱ्या आख्यायिकेनुसार, सीतेच्या शोधासाठी निघालेल्या रामाला शिवलिंगाची पूजा करायला सुचविल्यानंतर पूजेसाठी रामानी वाळूचे शिवलिंग तयार केले, हेच ते ‘वालुकेश्वर’ महादेवाचे मंदिर आणि बाण मारलेली जागा म्हणजे बाणगंगा तलाव. याचबरोबर काहींचे असेही म्हणणे आहे की, परशुरामाने बाण मारून इथून पाणी काढले होते. ज्या ठिकाणी बाण मारला ते ठिकाण तलावाच्या मध्यभागी एका खांबाद्वारे चिन्हांकित केलेले आहे.

तलावाचे बांधकाम शिलाहार राजाच्या काळातील म्हणजे ११२७ सालातील आहे. त्यानंतर परिसराचे नूतनीकरण १७१५ मध्ये झाले. येथील मंदिर १८ व्या शतकात उभारले गेले. तलावात प्रवेश करताना प्रवेश द्वारावर दोन मोठ्या समई आहेत. दक्षिण बाजूस काही दगडी वास्तू, कोरीव मूर्ती यांचे अवशेषदेखील आहेत. आयताकृती तलावाच्या चारही बाजूंना छोट्या इमारती आणि त्यातून डोकावणारी मंदिरं आहेत. त्यामध्ये परशुराम, श्रीराम, सिद्धेश्वर, हनुमान, काशी मठ, विठोबा-रखुमाई, वाळूकेश्र्वर, लक्ष्मी नारायण, गणपती, रामेश्वराची मंदिरे आहेत. तलाव तब्बल पन्नास फूट खोल असून, चारही बाजूंनी विशिष्ट पद्धतीने दगडी पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. चार छोट्या पायऱ्या आणि एक विस्तीर्ण सपाट पायरी अशी पायऱ्यांची रचना आहे. अशी रचना करण्याचे कारण म्हणजे तेथे पार पडणारे धार्मिक विधी.

तलावाला पौराणिक महत्त्व असल्यामुळे येथे पितृपक्षात आणि इतरवेळी पूजा आणि श्राद्धाचे विधी पार पाडले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून येथे दीपोत्सवही मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. त्यावेळी हा संपूर्ण परिसर दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघतो. वाराणसी येथे होणाऱ्या गंगा पूजेशी साधर्म्य सांगणारी महाआरतीदेखील आयोजित केली जाते. काही वर्ष येथे बाणगंगा संगीत महोत्सवदेखील भरवला जायचा. तलावाच्या एका काठावर कलाकारांसाठी पाण्यावर बांधलेला मंच आणि समोरच्या बाजूला पायऱ्यांवर रसिकांना बसण्यासाठी व्यवस्था केली जात असे. रात्री चंद्र आणि रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात गायकांच्या कलाकारीने हा परिसर संगीतमय होऊन जात असे. संगीताचा अशाप्रकारे रसास्वाद घेणे ही श्रोत्यांसाठी पर्वणी असे.

समुद्राच्या इतक्या जवळ असूनही इथले पाणी खारट नाही आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेमुळे हा संपूर्ण परिसर आता वारसावास्तूत समाविष्ट करण्यात आला आहे. कोणत्याही दिवशी किंवा वेळी येथे जा, तलावाच्या पायऱ्यांवर बसलो असताना आपसूकच मुंबईच्या कोलाहलाशी आपला संपर्क तुटतो. एक दुर्मिळ शांतता व प्रसन्नता अनुभवायला मिळते. आकाशाचे प्रतिबिंब पडलेल्या पाण्यात विहार करणाऱ्या बदकांना न्याहाळत आपण आपल्याच दुनियेत रममाण होऊन जातो.

nanawareprashant@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com