कोंडाणे लेणी

कोंदिवडे गावाच्या पुढे सह्याद्रीच्या पायथ्याशी कोंडाणे गाव आहे. तिथूनच आडवळणावरील लेणीच्या पायवाटेची सुरुवात होते.
Kondane Caves
Kondane CavesSakal
Summary

कोंदिवडे गावाच्या पुढे सह्याद्रीच्या पायथ्याशी कोंडाणे गाव आहे. तिथूनच आडवळणावरील लेणीच्या पायवाटेची सुरुवात होते.

कोंदिवडे गावाच्या पुढे सह्याद्रीच्या पायथ्याशी कोंडाणे गाव आहे. तिथूनच आडवळणावरील लेणीच्या पायवाटेची सुरुवात होते. लेणीपर्यंत पोहोचण्याआधी काही किलोमीटर मस्त छोटा ट्रेक होतो. पावसाळ्यात आजूबाजूंच्या गर्द झाडीमुळे दुरून संपूर्ण लेणी दिसत नाही. दिसतो तो फक्त कातळावरून कोसळणारा पाऊस; पण जसजसे तुम्ही लेणीच्या समीप पोहोचता आणि पायऱ्या चढून लेणीच्या दर्शनी भागात दाखल होता तेव्हा अपूर्ण अवस्थेतील आणि पडझड झालेल्या तरीही आखीवरेखीव लेणीकडे आपण काही काळ आ वासून पाहत स्तब्ध उभे राहतो.

सिद्ध कार्ला लेण्यांमधील एका शिलालेखात नहपानाचा जावई उषवदत्त याने भिक्षुसंघाला ‘करजिक’ नावाच्या गावाचे दान दिल्याचा उल्लेख आहे. हे ‘करजिक’ म्हणजे आजचे ‘कर्जत’, ज्याची आता अविकसित आणि मुंबईपासून दूर अशी हेटाळणी केली जात असली, तरी एकेकाळी पुरातन व्यापारी मार्गावरील हे महत्त्वाचे स्थान होते. कल्याणच्या बंदरात उतरलेला माल घाटावर घेऊन जाण्यासाठी कर्जतच्या परिसरात अनेक घाटवाटा तयार करण्यात आल्या होत्या. यामधील सर्वपरिचित कुसूर घाटाच्या पायथ्याकडून प्राचीन काळी ढाक बहिरीच्या परिसरातून पावसाळ्यात बौद्ध भिक्षुंच्या ‘वर्षावास’कडे जाता येत असे. व्यापारी मार्गावरील विश्रांतीची ही ऐतिहासिक जागा म्हणजे कोंडाणे लेणी. सह्याद्रीच्या डोंगरारांमध्ये कोरलेल्या या लेणीपर्यंत जाणारी दगड-मातीची वाट, पाण्याचे ओहोळ आणि हिरवाईने नटलेला आजूबाजूचा परिसर अनुभवायचा असेल तर पावसाळ्यातच इथे भेट द्यायला हवी.

कर्जतपासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर ‘कोंडाणे लेणी’ आहेत, पण तिथे जाण्यासाठी आधी कर्जत रेल्वे स्थानकापासून दहा-बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंदिवडे गावात पोहोचावे लागते. गावात जाण्यासाठीचा रस्ता उल्हास नदीच्या काठावरून जातो. हा संपूर्ण रस्ता अतिशय नयनरम्य असून वाटेवर डाव्या बाजूला ढाक बहिरीच्या गडाचे दर्शन होते आणि समोर राजमाची किल्ला दिसायला लागतो. कोंदिवडे गावाच्या पुढे सह्याद्रीच्या पायथ्याशी कोंडाणे गाव आहे आणि तिथूनच इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात कोरलेल्या आडवळणावरील लेणीच्या पायवाटेची सुरुवात होते.

लेणीपर्यंत पोहोचण्याआधी काही किलोमीटर मस्त छोटा ट्रेक होतो. पावसाळ्यात आजूबाजूच्या गर्द झाडीमुळे दूरून संपूर्ण लेणी दिसत नाही. दिसतो तो फक्त कातळावरून कोसळणारा पाऊस; पण जसजसे तुम्ही लेणीच्या समीप पोहोचता आणि पायऱ्या चढून लेणीच्या दर्शनी भागात दाखल होता, तेव्हा अपूर्ण अवस्थेतील आणि पडझड झालेल्या तरीही आखीवरेखीव लेणीकडे आपण काही काळ आ वासून पाहत स्तब्ध उभे राहतो. एवढ्या आतमध्ये डोंगरदऱ्यांत इतकी सुंदर कलाकृती कोरलेली आहे यावर विश्वास बसत नाही. या हीनयानपंथीय लेणी समूहात एक चैत्य आणि सात विहार आहेत. चैत्यगृहाची कमान पिंपळाकृती कोरलेली असून दोन्ही बाजूला शिल्पपट आहेत. चैत्यगृहाच्या पिंपळपानाकृती कमानीचा आकार, सर्व बाजूचे अचूक मोजमाप, नक्षीकाम, मानवी आकृत्या आणि कोरीव काम पाहता कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नसताना इतकी सुबक कलाकृती कशी काय साध्य करता आली याचे आश्चर्य वाटते. तुम्हाला ब्राम्ही लिपी वाचता येत असेल तर दर्शनी भागात असलेल्या शिलालेखामध्ये लेणीविषयीचे तपशील आहेत. चैत्यगृहात मोठा स्तूप असून काही प्रमाणात भग्न झाला आहे. बाजूच्या अष्टकोनी खांबांचीही पडझड झाली आहे. आतील गजपृष्ठाकार विशाल छतही लक्ष वेधून घेते.

बौद्ध भिक्षुकांसाठी बांधण्यात आलेल्या विहाराच्या दर्शनी भागातही छोटीशी पिंपळपान कमान आहे. विहाराच्या आतही छोटे कक्ष आहेत. कक्षात दगडी बाक असून, संपूर्ण विहाराला एकेकाळी व्हरांडा होता, ज्याची आता पडझड झालेली दिसते. पहिल्याच विहारात भिंतीवर स्तूप कोरलेला आहे. यावरून चैत्यगृहातील स्तुपाची कल्पना येते. शेवटच्या विहारात बारमाही पाण्याच्या दोन टाक्या आहेत. पहिल्याच विहाराच्या दर्शनी बाजूवर दोन ओळीतील पुसटसा ब्राम्ही लिपीतील शिलालेख आढळतो. ज्यावर विहार कोरण्यासाठी दान देणाऱ्यांचा उल्लेख आहे.

कोंडाणे लेणीचा बराचसा भाग कोसळलेला दिसतो. ही पडझड भूकंपामुळे झालेली आहे. पंधराव्या आणि सोळाव्या शतकात या भागात झालेल्या तीव्र भूकंपांमुळे लेणीचीदेखील अपरिमित हानी झाली. भूकंपामुळे चैत्याचा दर्शनी भाग कोसळून जमिनीत शिरलेला दिसतो. चैत्य आणि विहाराच्या दर्शनी भागाचे अनेक अवशेष डोंगरावरून कोसळून खाली गेले असण्याही शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात इथे उत्खनन झाल्यास लेणीचे कोसळलेले भाग सापडण्याची दाट शक्यता आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत लेणीच्या डोक्यावरून धो-धो पाऊस कोसळत असतो. लेणीच्या आतून चारही बाजूला दगड आणि आकाशातून कोसळणारा पाऊस असे मनोहारी दृष्य दिसत असते. या लेणीला ‘वर्षावास’ का म्हणत असतील याची प्रचीती तेव्हा येते. धो-धो पाऊस कोसळत असताना पुरातत्त्व विभागातर्फे नव्याने बांधलेल्या पायऱ्यांवरून लयबद्ध पद्धतीने उतरणाऱ्या जलधारा संगीतमय वाटतात, आजूबाजूचा हिरवागार परिसर डोळ्यांमध्ये चकाकी आणतो आणि अखंड कातळामध्ये कोरलेली आखीवरेखीव कलाकृती मानवाच्या कलात्मकतेची साक्ष पटवून देते.

nanawareprashant@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com