
Supriya Sule : सुप्रिया सुळेंची राजकारणात एंट्री होताना बाळासाहेब म्हणाले होते, "कमळाबाईला पटवण्याची..."
Supriya Sule : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनी आज कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दोन नेत्यांची घोषणा केलीय. याआधी ३ मे २०२३ रोजी शरद पवार यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी त्यांचा हा निर्णय स्वत:च माघारी घेतला. मात्र पवारांच्या या वक्तव्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती.
शरद पवारांऐवजी आता उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे या पक्षाचं काम बघणार अशा चर्चा रंगल्या होत्या. सुप्रिया सुळे या उत्तम नेत्या आहेत यात काही वादच नाही. मात्र बाळासाहेबांना हे आधीच कळालं होतं. सुप्रिया सुळेच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीचा एक किस्सा जाणून घेऊयात.
हा अनुभव शरद पवार यांनी आपल्या लोक माझा सांगाती या पुस्तकामध्ये सांगितला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रिया सुळेंच्या राजकीय एन्ट्रीला पाठिंबा दर्शवला होता. याबद्दल आपल्या पुस्तकात शरद पवार लिहितात, बाळासाहेबांनी एखाद्याला एकदा आपलं मानलं, की बाकी सारं त्यांच्यासमोर फिजूल असायचं. माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध होतेच. माझ्यावर ते तुटून पडायचे. परंतु जेव्हा सुप्रियाला राज्यसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्याचा निर्णय झाला, तेव्हा बाळासाहेबांच्यातल्या उत्कट भावनाशील माणसाचं मला दर्शन झालं."
नक्की काय झालं होतं?शरद पवार लिहितात...
"झालं असं होतं, की महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एक जागा रिक्त झाली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीतील चर्चेनुसार या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीला संधी देण्याचा निर्णय झाला. माझ्या पक्षातल्या माझ्या सहकाऱ्यांनी सुप्रियाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. सुप्रियाच्या विरोधात उमेदवार कोण असणार, हे जाणून घेण्यासाठी मी बाळासाहेबांना फोन केला."
"मी त्यांना सांगितलं, “सुप्रिया राज्यसभेसाठी निवडणूक लढवते आहे. युतीतर्फे कोण उमेदवार असेल?” बाळासाहेब उत्तरले, "शरदबाबू, असं विचारताना तुम्हाला काही वाटत कसं नाही? सुप्रिया सहा महिन्यांची असल्यापासून माझ्या अंगाखांद्यावर खेळलेली आहे. आज तिला संधी आल्यावर मी तिच्याविरोधात उमेदवार देईन, असं तुम्हाला कसं वाटलं?" मी प्रश्न केला, “तुमचं ठीक आहे. पण भारतीय जनता पक्ष काय भूमिका घेईल ?” यावर त्यांचं उत्तर होतं, "कमळाबाईला कसं पटवायचं, ती माझी जबाबदारी."