
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी सध्या राज्यभर आंदोलने सुरु आहेत. राज्यात अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही लागल्याचे दिसून आले.
खामगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यात आंदोलन अधिक आक्रमक झाले असून आज 8 ऑगस्ट ला खामगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी एक हजारांवर समाज बांधवांनी मुंडन करुन शासनाचे वेधले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी सध्या राज्यभर आंदोलने सुरु आहेत. राज्यात अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही लागल्याचे दिसून आले. मात्र शासनाने अजुनही या आंदोलनाची दखल न घेतल्याने मराठा समाजाकडून विविध आंदोलने करुन शासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे. खामगाव येथे 7 ऑगस्ट पासुन सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली असून मंगळवारी डफडे बजाओ, गोंधळ करण्यात आला. तर आज 8 ऑगस्ट रोजी घंटानाद, मुंडन असे आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील मराठा समाजातील चिमुकल्यांसह हजारो समाजबांधवांनी मुंडन करुन शासनाचा निषेध केला. सकाळपासुन ठिय्या आंदोलनस्थळी समाजबांधवांची मोठी गर्दी जमली होती.
काँग्रेस, भारिप, काँग्रेस सेवादल, एमआयएम, बजरंग दल, मुस्लिम समाज, सिंधी समाज, धनगर समाज, यासह अनेक संघटना व पक्ष यांनी मराठा आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
मुंडन केल्यावर प्रत्येक आंदोलकास एक पाकीट देण्यात आले. त्या पाकिट वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता लिहून ते पाकीट त्याना पोस्ट करण्यात आले. त्यामुळे हे आंदोलन चर्चेत राहिले.