अखेर पाच वर्षांनंतर मृत पत्नीला मिळाला न्याय; पतीला सात वर्षे सक्तमजुरी 

रोशन खैरनार
Tuesday, 29 September 2020

चंदाबाई हिचा विवाह साहेबराव पंडित गांगुर्डे याच्याशी घटनेच्या सात वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर जे काही घडले त्यानंतर अवघ्या पाच वर्षांनंतर मृत पत्नीला न्याय मिळाला आहे, काय घडले?

नाशिक / सटाणा : चंदाबाई हिचा विवाह साहेबराव पंडित गांगुर्डे याच्याशी घटनेच्या सात वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर जे काही घडले त्यानंतर अवघ्या पाच वर्षांनंतर मृत पत्नीला न्याय मिळाला आहे, काय घडले?

पाच वर्षांनंतर मृत पत्नीला मिळाला न्याय

२८ सप्टेंबर २०१५ ला वसंत वाण्या गवळी यांनी सटाणा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी चंदाबाई हिचा विवाह साहेबराव पंडित गांगुर्डे (रा. बिरदावण पाडा, पोस्ट मानूर, ता. बागलाण) यांच्याशी घटनेच्या सात वर्षांपूर्वी झाला होता. विवाहानंतर त्यांना दोन अपत्ये झाली. मात्र लग्नाच्या दोन वर्षांनंतर पती साहेबराव हा पत्नी चंदाबाईकडे पत्ते व जुगार खेळण्यासाठी वारंवार पैशांची मागणी करू लागला. दुचाकी घेण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये घेऊन ये, अशी मागणी करीत चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करू लागला. माहेरी गेल्यावर तिची माफी मागून पुन्हा नांदायला घरी घेऊन येत असे. २६ सप्टेंबर २०१५ ला सकाळी साडेआठला पती साहेबरावने पुन्हा भांडण करून पत्नी चंदाबाईला बेदम मारहाण केली. त्यामुळे पतीच्या जाचाला कंटाळून तिने स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या साहेबराव गांगुर्डे याच्यावर कारवाई करण्याची मागणीही वसंत गवळी यांनी केली होती.

न्यायालयाने दिला निकाल

पाच वर्षांपूर्वी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व २५ हजार रुपये दंड केला असून, दंडाची रक्कम भरल्यानंतर आरोपीने बँकेत मुलांच्या नावावर ५० हजार रुपये मुदतठेव स्वरूपात ठेवण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश अनिरुद्ध एस. गांधी यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. ॲड. संजय सोनवणे यांनी सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासले. तपासी अंमलदार सहाय्यक पोलिस निरीक्षक जी. के. वनारे व पैरवी अधिकारी पोलिस शिपाई नितीन देवरे यांनी न्यायालयीन कामकाजात विशेष सहाय्य केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after five years dead wife got justice nashik marathi news