शेवटी 'त्यांनी' मागे घेतला अन्नत्यागाचा इशारा!'...मात्र 'त्यांच्या' प्रश्‍नांमुळे समुपदेशकांची चांगलीच भंबेरी उडाली

kamgar.jpg
kamgar.jpg
Updated on

नाशिक : इगतपुरीच्या एकलव्य शाळेतील निवारा केंद्रामधील तरुण कष्टकऱ्यांमधील अस्वस्थता वाढल्याने घरी जाण्यासाठी अन्नत्याग करण्याचा इशारा दिला. त्या वेळी राष्ट्रीय आपत्तीत सुरक्षेची हमी देत राज्य सरकारतर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दलची सकारात्मक भावना रुजविण्यात आल्याने इशारा मागे घेत कष्टकरी पोटभर जेवले. अनेकांनी घरी जाण्याचा विचार सोडून दिला. 

तरुणांनी रोष प्रकट करत वातावरण तापविले

मुंबईहून घरी निघालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार व महाराष्ट्रातील 302 स्थलांतरित कष्टकऱ्यांची निवास, भोजनाची व्यवस्था इगतपुरीमध्ये करण्यात आली आहे. निवारा केंद्रात दाखल केल्यावर काही दिवसांनी इथल्या तरुणांनी रोष प्रकट करत वातावरण तापविले होते. मग अधिकाऱ्यांनी समजूत घालत मानवी साखळीद्वारे तरुणांना पुन्हा शाळेत नेण्यात आले. आता लॉकडाउन-2 सुरू झाल्याने तरुणांमधील नाराजीचा सूर वाढत जाईल याचा अंदाज बांधत मंगळवारी (ता. 14) पहिले समुपदेशन घेतले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील निवारा केंद्रातील कष्टकऱ्यांच्या समुपदेशनाची दिशा फाउंडेशन आणि मनोवेध डेव्हलपमेंट फाउंडेशनला परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही आर्थिक मोबदल्याविना दिशाच्या डॉ. अंजली बोऱ्हाडे आणि मनोवेधचे अमोल कुलकर्णी यांनी कष्टकरी कामगारांशी संवाद साधायला सुरवात केली. 

तुमच्या पोरांना विमाने मग आम्हाला गाडी का नाही? 

आम्हाला किती दिवस सांभाळणार आहात? आम्हाला घरी जाऊ द्या. म्हणजे, तुम्ही मोकळे आणि आम्ही मोकळे, असे कष्टकरी तरुण तावातावाने सांगत होते. एवढेच नव्हे, तर परदेशातील पोरांना तुम्ही विमान पाठवून आणले, मग आम्हाला जाण्यासाठी गाडी का देत नाही, अशी विचारणा केली. या प्रश्‍नांची उत्तरे देता देता समुपदेशकांची भंबेरी उडाली. 

एम.एस्सी. पदवीधर तरुण खूश 

मध्य प्रदेशातील एम.एस्सी. पदवीधर तरुणासोबत 24 जणांचा जथा आहे. आपत्तीत करण्यात आलेल्या सोयीबद्दल त्याने समाधान व्यक्त केले आणि आपण इथेच राहणार असल्याचा निर्वाळा दिला. अस्वस्थ झालेली तरुणाई संवादाच्या माध्यमातून शांत झाली आणि गुरुद्वारातर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेमध्ये वरण-भात, भाजी-पोळी आणि लाडवाची स्वीट डिश पोटभर खाल्ली. या वेळी उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, इगतपुरीच्या तहसीलदार अर्चना पागेरे यांनी संवाद साधला. नोडल अधिकारी दत्तात्रय वाघ, तलाठी शरद बेंडकुळे, संदीप जाधव, ग्रामसेवक गुलाब साळवे, आरोग्यसेवक बी. बी. सनेर, मंडलाधिकारी सुरेंद्र पालवे उपस्थित होते. नोडल अधिकारी नितीन मुंडावरे यांचे सहकार्य लाभले. 

व्हिडिओ कॉलवरून घरी पोचविली माहिती 

कष्टकऱ्यांनी हे आपले घर मानावे. दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि कपडे देण्यात येतील, असे सांगितले जात असताना काही कष्टकरी समजून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. रोजगाराविषयीची चिंता अनेकांना नसल्याचे जाणवले. संवादावेळी काही कामगारांनी स्वतः मोबाईलमध्ये शूटिंग करून घेतले. काही जणांनी व्हिडिओ कॉलद्वारे इथल्या परिस्थितीचे दर्शन घरच्यांना घडविले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com