esakal | सावधान ! चोरट्यांची नजर तुमच्यावर...
sakal

बोलून बातमी शोधा

images (4).jpg

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वत्र बंद असल्याने आणि नागरिकही घरातच बसून असल्याने उन्हाळा चोरीचा सीजन असूनही चोरट्यांची हातचलाखी बंद होती. मात्र अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झाला आणि चोऱ्यांचे सत्रही वाढले आहे. अनेकांच्या हाताचे काम गेले तर दोन ते अडीच महिने हाताला काम नसल्याने अनेक बेरोजगार युवक घरात बसून रोजगाराच्या शोधात असल्याचेही दिसतात. त्यामुळे ज्यांचा चोऱ्या हा व्यवसाय आहे, अशांनी आता आपला हा गोरखधंदा पुन्हा एकदा जोमाने सुरू केला आहे. 

सावधान ! चोरट्यांची नजर तुमच्यावर...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सावधान ! चोरट्यांची नजर तुमच्यावर... 
लॉकडाऊनपासून या तालुक्‍यात वाढल्या घटना 
नाशिक / येवला : 
कोरोनामुळे लॉकडाऊन तीन महिने राहिल्यानंतर आता अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे, त्यातच बाजारपेठा ठप्प असून व्यवहारही विस्कळीत आहेत. यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून गेल्या चार महिन्यांत अनेक ठिकाणी विविध 30 पेक्षा जास्त चोऱ्यांच्या घटना झाल्या असून यात सर्वाधिक चोऱ्या दुचाकीच्या आहेत. गेल्या दोन - तीन आठवड्यांत तालुक्‍यात छोट्या - मोठ्या चोऱ्यांच्या अनेक घटना घडल्या असून बाजारातील मंदी अशीच राहिल्यास चोऱ्या वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे. विशेषतः घरफोडी, दुचाकी चोऱ्यांच्या घटना अधिक असल्याने नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. 


पाठलाग करून पकडले 
बुधवारी रात्री मध्यरात्री स्वत: पोलिस उपअधीक्षकांनी अनकुटेजवळ ट्रक चालकाला लुटणाऱ्यांना पाठलाग करून पकडल्याच्या घटनेमुळे वाढत्या चोऱ्यांचा प्रश्न पुन्हा पुढे आला आहे. अजूनही पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण असल्याचा गैरफायदा चोरटे घेत असल्याचेही तालुक्‍यातील काही घटनांतून दिसून आले. मागील दोन आठवड्यात शेळ्या, मोबाईल, घरफोडी लुटमारीच्या घटनाही पुढे आल्या आहे. 


काही प्रमुख चोऱ्या 
अनकुटे येथील एका टोळीने पालघरच्या व्यापाऱ्याला कोपरगाव शिवारात लुटले, बाभूळगाव येथे किरण गायकवाड यांच्या घरासमोरून दोन नव्या मोटरसायकली रात्रीतून चोरीला गेल्या आहेत. थळकर वस्तीजवळ एक जण मोबाईलवर बोलत असतानाच हातातून मोबाईल हिसकावला. धामणगावला एका शेतकऱ्याच्या शेळ्या चोरीस गेल्या आहेत. गवंडगावला मोटारसायकलसह पेट्रोल पंपावर 3 हजार लिटर डिझेलची चोरी झाली तर अंदरसुलला दळे वस्ती येथील पंढरीनाथ जाधव यांच्या मालकीच्या किराणा दुकानचे शटर वाकवून दुकानातील रोख रक्कम व किराणा माल चोरुन नेल्याची घटना घडली. कातरणी येथे संतोष कदम यांच्या राहत्या घरातून चोरट्यांनी दोन दिवसांपूर्वी सोने, पैशासह वस्तू चोरून नेल्या. सुदैवाने त्यांची मोटारसायकल व ट्रॅक्‍टर मात्र वाचला. अशा अनेक पण नंतर छोट्या-मोठ्या घटना घडल्याने आता नागरिक सावध होत आहेत. 


पैशासाठी शॉर्टकट 
सध्या बाजारपेठेत शुकशुकाट असून शेतीची कामे मर्यादित सुरू आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हाताला काम मिळणे दुरापास्त झाल्याने हा शॉर्टकट मार्ग अवलंबिला जात असल्याचीही चर्चा आहे. विशेषत: मोबाईल, मोटारसायकली व घरफोड्यांच्या घटना घडत असल्याने आता सार्वजनिक ठिकाणी नागरिक काळजी घेऊ लागले आहेत. 


14 ची नोंद प्रत्यक्षात 20 गायब 
मार्चपासून जूनपर्यंत शहर व तालुक्‍यात घरफोड्या व चोऱ्यांच्या बारा घटना झाल्या असून मोटरसायकल चोऱ्या विसवर आहेत. मात्र दोन्ही पोलीस ठाण्यात 14 मोटरसायकली चोरीची नोंद आहे. विशेष म्हणजे मेमध्ये एकही घटना झाली नसली तरी जूननंतर चोऱ्यांच्या दहावर घटना झाल्याचे दिसतेय. तालुक्‍यात अधिक घटना घडल्या आहेत.