
सातपूर (जि. नाशिक) : कधी नव्हे, ते सातपूरकरांनी भारतीय जनता पक्षाचे सर्वांत जास्त नगरसेवक निवडून दिले. यामुळे महापालिकेवर व प्रभाग समितीवर भाजपचा झेंडा फडकला. परंतु, भाजपची सत्ता असूनही कामच होत नसल्याची आक्रोशपूर्ण भावना शुक्रवारी (ता.२९) सातपूर प्रभाग सभेत भाजपच्याच नगरसेवकांनी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होतील, अशी अपेक्षा नागरिकांबरोबर नगरसेवकांनाही होती. परंतु, तसे होताना दिसत नाही. सातपूर प्रभाग सभापती रवींद्र धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत भाजप नगरसेवक हेमलता कांडेकर, अलका अहिरे, माधुरी बोलकर, बेबाबाई नागरे, पल्लवी पाटील या नगरसेवकांनी विविध प्रश्नावर रान उठवले.
सभापतींचे प्रशासन ऐकत नसल्याची भावना
कांडेकर यांनी भाषणात सत्ताधारी असूनही व आमच्याच प्रभागाचे नगरसेवक धिवरे सभापती असूनही प्रभागातील काम होत नसल्याचा आरोप केला. कांडेकर यांनी सभापती कोणाच्या तरी दबावाखाली असल्याने ते तरी काय करतील, अशी कोपरखळी मारली. अलका अहिरे यांनीही घरचा आहेर देत सभापतींचे प्रशासन ऐकत नसल्याची भावना व्यक्त केली. त्याचबरोबर नगरसेवक सलीम शेख, भागवत आरोटे, मधुकर जाधव, सीमा निगळ यांनीही स्वच्छता, बांधकाम, ड्रेनेज तसेच घंटागाडी व फवारणीबाबत समस्या मांडल्या. हा गोंधळ पाहून सभापती रवींद्र धिवरेही हतबल झाले.
समस्या ‘जैसे थे’
महापौर सतीश कुलकर्णी व सभापती रवींद्र धिवरे यांनी सातपूरच्या अनेक प्रभागात वेगवेगळे दौरा करून समस्या जाणून घेतल्या. परंतु, एक महिना उलटल्यानंतरही समस्या ‘जैसे थे’ आहेत. दौऱ्यामुळे समस्याच सुटल्या नाहीत, अशी भावना सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.