छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मोदींची तुलना त्रासदायक - छगन भुजबळ

प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 January 2020

युगपुरुष छत्रपती शिवरायांची कोणाशी तुलनाच होऊ शकत नाही. महाराष्ट्र, देश व परदेशात ज्यांना ज्यांना छत्रपतींचा इतिहास माहिती आहे तो प्रत्येक जण याचा निषेध करणार. स्वत: मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे .असे सांगत मोदी देशभर मते मागत होते.

मालेगाव : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी गेलेले सर्व गड-किल्ले काबीज केले. जगाने त्यांचा आदर्श घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कर्तबगारी काय? असा सवाल करतानाच राज्य स्थापन करुनही रयतेचे राज्य म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायांबरोबर मोदींची तुलना होऊच शकत नाही. हे प्रत्येकाच्या मनाला वेदना व त्रास देणारे आहे. अशा प्रकारच्या पुस्तकांवर तात्काळ बंदी घातली पाहिजे असे मत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (ता.१३) मालेगाव येथे व्यक्त केले.

छत्रपती शिवरायांची कोणाशी तुलनाच होऊ शकत नाही

मालेगाव येथील राज्य राखीव पोलीस दल संकुल व निवासी इमारतीच्या उद्‌घाटन समारंभानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी कृषीमंत्री दादा भुसे, महापौर ताहेरा शेख त्यांच्या समवेत होते. भुजबळ म्हणाले, की युगपुरुष छत्रपती शिवरायांची कोणाशी तुलनाच होऊ शकत नाही. महाराष्ट्र, देश व परदेशात ज्यांना ज्यांना छत्रपतींचा इतिहास माहिती आहे तो प्रत्येक जण याचा निषेध करणार. स्वत: मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे असे सांगत देशभर मते मागत होते. छत्रपतींनी शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण करताना प्रत्येक लहान घटकांना, मुस्लीमांना जवळ केले. १३ मुस्लीम सेनापती त्यांच्याकडे होते. रायगड राजधानी निर्माण झाल्यानंतर मंदिर बांधण्यात आले. महाराज, जिजामाता पहायला आले. ते म्हणाले, ठिक आहे. आपल्या सैन्यातील मुस्लीम बांधवांसाठी मशीद कुठे आहे? सगळ्यांना घेऊन जाणारा हा रयतेचा राजा होता. आज तस दिसत नाही. धर्मा धर्मात वाद, मारामाऱ्या लावणे, गडबड करणे सुरु आहे. शिवरायांनी गड काबीज केले. मोदींनी काय केले. पीओकेमधला एखादा गड ताब्यात घेतला असे काही झाल नाही. छत्रपतींनी सांगितले रयतेच्या, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये. आज काय सुरु आहे. ते युगपुरुष होते हे जगाने मान्य केले. त्यांची गमिनी काव्याने लढण्याची पध्दत अवलंबून व्हिएतनाममध्ये अनेक लोक अमेरिकेबरोबर अनेक वर्षे लढले. त्यांच्याशी कोणाची तुलना कदापी होऊ शकत नाही. यामुळे लोक क्रोधीत होतील. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल. आपण सर्वांनी सावध असले पाहिजे. अशा प्रकारच्या पुस्तकांवर तात्काळ बंदी घातली पाहिजे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chagan bhujbal statement on Prime Minister Narendra Modi Nashik Marathi News