कोरोनाकाळात प्रोटीनयुक्त चिकन आणि अंडींची वाढली मागणी; 'असा' आहे भाव

एस. डी. आहिरे
Monday, 14 September 2020

प्रोटिन जास्त असल्यामुळे अंडी व चिकनला पसंती मिळत आहे. तसेच कोरोना रुग्णांनाही रोज आहारात दोन वेळेला उकडलेली अंडी दिली जात आहेत. 

नाशिक / पिंपळगाव बसवंत : सध्या कोरोना महामारीत अनेक जण आहाराबाबत जागरूक झाले आहेत. विशेषत: पौष्टिक आहारावर भर दिला जात आहे. प्रोटिन जास्त असल्यामुळे अंडी व चिकनला पसंती मिळत आहे. तसेच कोरोना रुग्णांनाही रोज आहारात दोन वेळेला उकडलेली अंडी दिली जात आहेत.

कोरोनाकाळात मागणी वाढल्याने दर वधारले

कोरोनाच्या सुरवातीच्या काळात चिकनविषयी गैरसमज निर्माण झाला होता. त्यामुळे दर झपाट्याने उतरले होते. ५० रुपये किलो चिकनचे दर झाले होते. माल शिल्लक असल्याने काही पोल्ट्रीमालकांनी फुकट कोंबड्या वाटप केल्या होत्या. याच काळात मटणाच्या दरात जोरदार उसळी आली. भीती, गैरसमज दूर झाल्यानंतर चिकनला पुन्हा चांगले दिवस आले. मागणी वाढल्यामुळे साहजिकच दरात वाढ झाली आहे. सध्या किरकोळ अंडी ६ रुपयांना नग, तर चिकनचा दर २४० रुपये किलोपर्यंत वधारला आहे. श्रावण महिना, गणेशोत्सवाची सांगता झाल्याने खवय्यांनी मांसाहारावर ताव मारण्यास सुरवात केली आहे. आता मागणी एवढी वाढली आहे, की ब्रॉयलर कोंबड्या व अंड्यांचा तुटवडा जाणवत आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी हॉस्पिटल, केअर सेंटर सुरू झाले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना आहारात दूध व अंडी दिली जात आहेत.

चिकन २४० रुपये किलो, तर अंडी सहा रुपये नग

कोरोनाकाळात सोशल मीडिया, तसेच माध्यमातून नागरिकांना फळांबरोबर आहारात अंडी व चिकनचा समावेश करण्यास सांगितले जात आहे. रुग्णांबरोबर सध्या इतर नागरिकही प्रोटिन्ससाठी अंडी व चिकन खात आहेत. काही दिवसांत अंडी आणि चिकनला मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून दरातदेखील वाढ झाली आहे. अंड्याचा किरकोळ दर आठवड्यापूर्वीपर्यंत पाच रुपये नग होता. मागणी वाढल्यामुळे दरात एक रुपया वाढ झाली आहे. चिकन आठवड्यापूर्वी २०० रुपये किलोपर्यंत विकले जात होते. मागणी वाढल्यामुळे चिकनच्या दरात आठवड्यात ४० रुपये वाढ झाली आहे. मागणी वाढल्यामुळे चिकन व अंडी भाव खात आहेत.

मटणाला सहाशे रुपये किलो
लॉकडाउनच्या काळात मटण दरात ५६० रुपयांवरून ७०० रुपये किलोपर्यंत वाढ झाली होती. गेल्या दोन महिन्यांत चिकनला मागणी वाढून मटणाकडील कल काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे दर काहीसे खाली येऊन ६०० रुपये प्रतिकिलोपर्यंत विकले जात आहे.

 

दर काहीसे वधारले
कोरोनाच्या काळात गैरसमजामुळे चिकनकडे नागरिकांनी पाठ फिरविली होती. आता कोरोनारुग्णांना चिकनचा आहार घेण्याचा सल्ला दिला जात आहे. त्याचबरोबर नागरिकांमधील संभ्रम दूर झाल्याने चिकनला मागणी वाढली आहे. त्यामुळे दर काहीसे वधारले आहेत.- जावेद खाटीक, चिकन विक्रेता

 

संपादन : रमेश चौधरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chicken and eggs demands more nashik marathi news