
नाशिक : राज्यात नववी ते बारावीचे वर्ग सोमवार (ता. २३)पासून सुरू करण्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. त्यानुसार शिक्षक आणि शिक्षकेतरांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. बुधवारी शिक्षण संचालकांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधताना वर्गातील उपस्थितीबद्दल पालकांची संमती घ्यावी, कोरोना अहवाल निगेटिव्ह असलेले शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहतील याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. हे सारे प्रयत्न एकीकडे सुरू असले, तरीही प्रत्यक्ष वर्गात गणित, विज्ञान अन् इंग्रजीचे अध्यापन करून इतर विषय ऑनलाइन पद्धतीने शिकविले जाणार आहेत.
वर्गात गणित अन् विज्ञानासह इंग्रजीचे अध्यापन अपेक्षित
शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे ऑनलाइन पद्धतीने की प्रत्यक्ष वर्गात अध्यापन करण्यास आपली पसंती आहे याची विचारणा अनेक शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे केली आहे. त्यासंबंधीचा कानोसा घेतल्यावर आणि शिक्षकांकडे उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे फारसे पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी अनुकूल नसल्याचे चित्र पुढे आले आहे. १५ अंश सेल्सिअसच्या खाली घसरलेले तापमान आणि दिवाळीत झालेल्या गर्दीबरोबर फटाक्यांच्या आतषबाजीने वाढलेल्या प्रदूषणामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची स्थिती काय राहील यावर आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याबद्दलची संभ्रमावस्था असल्याचे पालकांशी संपर्क साधल्यावर जाणवले.
इतर विषय ऑनलाइन; एका बाकावर एक विद्यार्थी अन् नावानिशी बैठक
नववी ते बारावीचे वसतिगृह आणि आश्रमशाळा विशेषतः आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंबंधाने आदिवासी विकास आयुक्तालयामध्ये संपर्क साधल्यावर आयुक्त हिरालाल सोनवणे मंत्रालयात गेले असून, प्रधान सचिव अनुपकुमार यांच्या मार्गदर्शक सूचना आल्यावर आश्रमशाळा सुरू होण्याची बाब स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले. वर्गाप्रमाणे शिक्षकांच्या खोलीमधील बैठकव्यवस्थेत शारीरिक अंतर राखायचे आहे. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठकव्यवस्था करायची आहे.
हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान
घरी अभ्यास शक्य
पिण्याचे पाणी, हात धुण्याची सुविधा, स्वच्छतागृह अशा गर्दीच्या ठिकाणी शारीरिक अंतर सहा फूट राखले जावे म्हणून चौकोन, वर्तुळ आखायचे आहे. अधिक गर्दी होईल असे परिपाठ, स्नेहसंमेलन, खेळ व इतर कार्यक्रम घेता येणार नाहीत. पालकांच्या बैठकी ऑनलाइन घ्यायच्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलवायचे. एकाच दिवशी पन्नास टक्के विद्यार्थी शाळेत आणि पन्नास टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेतील अशी व्यवस्था शाळांनी करायची आहे. प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी तीन ते चार तास असेल. वर्गात जेवणाची सुटी नसेल. विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीने घरी राहून अभ्यास करता येणार आहे. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मूल्यांकनासाठी विशिष्ट योजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेवर राहील.
शिक्षणाबद्दलच्या काही सूचना
० शाळेत हात धुण्याची सोय उपलब्ध करणे.
० जंतुनाशक, पाणी, साबण, थर्मामीटर, थर्मल स्कॅनर-गन, पल्स ऑक्सिमीटर उपलब्धता आणि शाळेची स्वच्छता-निर्जंतुकीकरणाची स्थानिक प्रशासनावर जबाबदारी.
० एखाद्या शाळेत क्वारंटाइन सेंटर असल्यास ते हलविणे, शक्य नसल्यास खुल्या परिसरात अथवा इतर ठिकाणी शाळा भरविणे.
० विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून, पूर्ण उपस्थितीसाठीची पारितोषिके बंद करणे.
० विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी शाळेत असेपर्यंत मास्क वापरणे बंधनकारक. मास्कची अदलाबदल होणार नाही याची दक्षता घेणे. प्रत्येकाची रोज साधी आरोग्य चाचणी घेणे.
० पालकांनी शक्यतो स्वतःच्या वाहनाने विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे. विद्यार्थ्याने शक्यतो घरून बाटलीत पाणी आणावे.
० शाळांच्या वाहनांचे दिवसातून दोन वेळा निर्जंतुकीकरण करणे.
० शाळेच्या परिसरात चारपेक्षा अधिक विद्यार्थी एकत्र जमणार नाहीत ही मुख्याध्यापकांची जबाबदारी असेल.
० पुस्तके, वही, पेन, पेन्सिल, वॉटर बॉटल आदी साहित्याची विद्यार्थ्यांकडून अदलाबदल होऊ नये.
० लॅचेस, अध्ययन-अध्यापन साहित्य, डेस्क, टॅबलेट्स, खुर्च्या आदींची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे.
० शाळा सुरू होण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यावर शाळा व वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण नियमितपणे करावे.
० विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतरांऐवजी इतरांना शाळा आवारात व प्रवेशद्वारावर नसेल प्रवेश.
जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि सर्व ग्रामीण रुग्णालयांच्या अधीक्षकांना २२ नोव्हेंबरपर्यंत नववी ते बारावीच्या शिक्षक-शिक्षकेतरांच्या कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. रुग्णालयात जाऊन चाचणी करून घेऊन प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याविषयी गटशिक्षणाधिकारी, नाशिक आणि मालेगाव महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. शिक्षकांची एकाच दिवशी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याबरोबर शारीरिक अंतर राखणे अपेक्षित आहे. - लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.