धक्कादायक! कोरोनाच्या मगरमिठ्ठीत कवटाळले जाताएत पोलीसबांधव..वाढणारा आकडा चिंतेची बाब!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

पोलिसांविरोधातील कोरोनाची मगरमिठी सैल होतानाचे चित्र अद्याप तरी दिसत नाही. त्यातच, पॉझिटिव्ह पोलिस कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील पोलिसांनाही क्वारंटाईन करण्यात दिरंगाई होते आहे. परिणामी या पोलिसांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. तर त्यांच्या कुंटूंबियांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. 

नाशिक : मालेगावात कोरोनाग्रस्त वाढत्या रुग्णांमुळे बंदोबस्तावरील पोलिसही या विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. सोमवारी (ता. 4) आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सहा पोलिस कर्मचारी असून, ही संख्या 67 झाली आहे. यात नाशिक ग्रामीण आणि राज्य राखीव दलाच्या पोलिस जवानांचा समावेश आहे. तर, जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा 371 झाला असून चारशेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. अद्यापही पावणे पाचशे स्वॅब प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत. 

जिल्ह्याची चारशेकडे वाटचाल..
जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मालेगाव शहरात आहेत. मालेगावाची परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिस आणि राज्य राखीव दलाच्या पोलिस जवानांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. मात्र शहरातील वाढत्या कोरोनाच्या विषाणूने पोलिस दलांमध्येच शिरकाव केला आहे. त्यात सोमवारी (ता. 4) आलेल्या 10 पॉझिटिव्ह रिपोर्टपैकी 7 पोलिस कर्मचारी आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा 67 झाला आहे. यामध्ये एक जळगाव आणि दोन राज्य राखीव दलातील अमरावतीच्या दोन जवानांचा समावेश आहे. परिणामी, पोलिसांविरोधातील कोरोनाची मगरमिठी सैल होतानाचे चित्र अद्याप तरी दिसत नाही. त्यातच, पॉझिटिव्ह पोलिस कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील पोलिसांनाही क्वारंटाईन करण्यात दिरंगाई होते आहे. परिणामी या पोलिसांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. तर त्यांच्या कुंटूंबियांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. 

मालेगावात कोरोनाग्रस्त रुग्णांचा वेग तीव्रतेने
दरम्यान, गेल्या आठवड्यात मालेगावात कोरोनाग्रस्त रुग्णांचा वेग तीव्रतेने वाढला होता. तो वेग सोमवारी (ता. 4) काहीसा मंदावल्याचे पहावयास मिळाले. परंतु तरीही जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 371 झाला आहे. तर यात मालेगावाचा आकडा 331 झाला आहे. नाशिक शहरात खासगी रुग्णालयातील महिला डॉक्‍टर आणि मालेगावातील 9 जणांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यामुळे नाशिक शहरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 17 झाला आहे. 

पावणे पाचशे रिपोर्ट प्रलंबित 
दरम्यान, नाशिक जिल्हा रुग्णालयाचे 32, नाशिक महापालिकेच्या डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयाचे 43, मालेगाव महापालिकेचे 394 तर जिल्ह्याबाहेरील 5 असे 474 कोरोना संशयित रुग्णांचे रिपोर्ट प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत. तर आत्तापर्यंत 2 हजार 541 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. तसेच, या तीनही रुग्णालयांमध्ये सध्या कोरोना संशयित 586 रुग्ण उपचार घेत असून, सोमवारी (ता. 4) नव्याने 93 कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. 

एकूण कोरोना बाधित: 371 
मालेगाव : 331 
नाशिक : 17 
उर्वरित जिल्हा : 17 
परजिल्हा : 6 
जिल्ह्यात एकूण मयत: 12 (धुळ्याची एक) 
कोरोनमुक्त : 25 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona virus affected police patients increased nashik marathi news