सहामाहीत घरपट्टी-पाणीपट्टीत ४५ कोटींची तूट; विकासकामांच्या निधीवर होणार परिणाम

विक्रांत मते
Sunday, 4 October 2020

कोरोनाच्या काळातही नियमित निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. परंतु घरपट्टीसह पाणीपट्टी व विकास शुल्काच्या माध्यमातून प्राप्त महसुलाला कात्री लागली आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लॉकडाउन जाहीर झाले. नागरिक घराबाहेर पडले नाही.

नाशिक : महापालिका प्रशासनासममोर कोरोनाच्या वाढत्या संसर्गाशी लढा देत असताना, उत्पन्न घटीमुळे नवीन आव्हान उभे राहिले आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत महापालिकेचा प्रमुख उत्पन्न स्रोत असलेली घरपट्टी व पाणीपट्टी मिळून ४५ कोटींची तूट आली आहे. त्याचा विकासकामांवर परिणाम होण्याच्या दाट शक्यतेने प्रशासनाने नव्याने खर्चाचे नियोजन करताना कोरोना आजाराकडे लक्ष केंद्रित केले आहे. 

विकासकामांच्या निधीवर परिणाम 

शासनाकडून प्राप्त होणारा एलबीटी कर, घरपट्टी, पाणीपट्टी, विविध कर व नगररचना विभागाकडून प्राप्त होणारा विकास शुल्क महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे. शासनाकडून मासिक सुमारे ८५ कोटी रुपये एलबीटी कर प्राप्त होतो. कोरोनाच्या काळातही नियमित निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. परंतु घरपट्टीसह पाणीपट्टी व विकास शुल्काच्या माध्यमातून प्राप्त महसुलाला कात्री लागली आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लॉकडाउन जाहीर झाले. नागरिक घराबाहेर पडले नाही. त्यामुळे वर्षाअखेरीस घरपट्टी व पाणीपट्टीच्या माध्यमातून प्राप्त होणारा महसूल मिळाला नाही. प्रशासनाने त्यानंतर ऑनलाइन कर भरण्यासाठी सवलत दिली. एप्रिल, मे व जूनमध्ये ऑनलाइन करभरणा केल्यास अनुक्रमे पाच, तीन, दोन टक्के सवलत देण्यात आली. परंतु त्या वेळीही अल्प प्रतिसाद मिळाल्याने योजनेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्थचक्र काही प्रमाणात फिरण्यास सुरवात झाली. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडेल, असे वाटत असले तरी प्रत्यक्षात ४५ कोटी रुपये कमी आले आहेत. 

हेही वाचा >  ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

अशी झाली महसुलात तूट 

सन २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत ९३.२२ कोटी रुपये प्राप्त झाले होते. या आर्थिक वर्षात मात्र यंदा पहिल्या सहा महिन्यांत ५८.११ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे ३५ कोटी रुपयांची तूट आहे. मागील वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत २३ कोटी रुपये प्राप्त झाले होते. परंतु या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत पाणीपट्टीतून १२.७५ कोटी रुपये महसूल मिळाला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ही तूट सुमारे दहा कोटी रुपयांची आहे. पालिकेचे प्रमुख स्रोत असलेल्या घरपट्टी व पाणीपट्टीतून सुमारे ४५ कोटींची तूट असल्याने पालिकेला येत्या काळात भांडवली कामांसाठी निधी अपुरा पडणार आहे.  

हेही वाचा >  संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deficit of Rs 45 crore in half-yearly in nmc nashik marathi news