धामडकीवाडी पॅटर्न : लॉकडाऊन काळात अशी भरतेय दुर्गम भागात शाळा; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 August 2020

आधीच बिनरस्त्याचे गाव, कोणत्याही फोनला तासभरही नेटवर्क नाही. अशा अनेकानेक समस्यांनी ग्रासलेली इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी आदिवासी वाडी आहे. अतिदुर्गम आदिवासी वाडीतील विद्यार्थी मात्र रोज शाळेचा अभ्यासक्रम नियमितपणे गिरवत आहेत. इतर शाळांसह धामडकीवाडीची शाळा सुद्धा बंद असली तरी येथील अवलिया शिक्षक प्रमोद परदेशी यांनी राबवलेला "धामडकीवाडी पॅटर्न" विद्यार्थीप्रिय झाला आहे. 

इगतपुरी शहर : आधीच बिनरस्त्याचे गाव, कोणत्याही फोनला तासभरही नेटवर्क नाही. अशा अनेकानेक समस्यांनी ग्रासलेली इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी आदिवासी वाडी आहे. अतिदुर्गम आदिवासी वाडीतील विद्यार्थी मात्र रोज शाळेचा अभ्यासक्रम नियमितपणे गिरवत आहेत. इतर शाळांसह धामडकीवाडीची शाळा सुद्धा बंद असली तरी येथील अवलिया शिक्षक प्रमोद परदेशी यांनी राबवलेला "धामडकीवाडी पॅटर्न" विद्यार्थीप्रिय झाला आहे. 

टाकाऊ आणि कालबाह्य वस्तूंच्या वापराने धामडकीवाडीतील 3 टीव्ही संचाचा उपयोग शाळा भरवण्यासाठी करण्यात येत आहे. अपुऱ्या साधन सामग्रीची अडचण असतानाही एका टिव्हीपुढे 7 प्रमाणे 3 टीव्ही समोर 21 विद्यार्थी धडे गिरवत आहेत. लॉकडाऊन काळात पुढची पावले ओळखून अभ्यासक्रमावर आधारित तयार केलेल्या विविध व्हिडिओचे प्रसारण प्रत्येक टीव्हीवर होत आहे. त्यामुळे शिक्षणापासून दूर असलेल्या गावकऱ्यांचीही चांगलीच उजळणी होत आहे. "धामडकीवाडी पॅटर्न" राबवतांना कोरोना विरुद्ध लढा लढण्याची सामुग्री आणि मनोरंजनाची सुद्धा व्यवस्था झाल्याने विद्यार्थी आणि गावकरी आनंदी आहेत. 

तालुक्यातील धामडकीवाडी त्यापैकीच. भावली धरणाच्या बाजूला रस्त्यापासून 1 किमी दूर असलेल्या ह्या वाडीत पायपीट करूनच खाचखळग्यांच्या रस्त्याने जावे लागते. 1 ते 4 पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून एकूण 21 विद्यार्थी पटावर आहे. मुख्याध्यापक म्हणून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजते शिक्षक प्रमोद परदेशी आणि सहकारी शिक्षक दत्तू निसरड हे दोघे काम पाहतात.

अडचणींचा डोंगर कधी होणार दूर ?

"धामडकीवाडी पॅटर्न" विद्यार्थीप्रिय आहे. मात्र सतत होणार विजेचा लपंडाव अडथळा करीत आहे. यासह मोबाईलला नेटवर्क नाही. गरिबीमुळे घरात टीव्ही नसल्याने अनेकांना 3 टिव्हीचा उपयोग नाईलाजाने करावा लागतो. सामाजिक क्षेत्रातील नागरिकांकडून कालबाह्य झालेले आणि कोनाड्यात पडलेले टीव्ही उपलब्ध झाल्यास "धामडकीवाडी पॅटर्न" राज्यभर आपला वेगळा ठसा उमटवू शकेल.

टीव्हीवरची शाळा आणि प्रत्यक्षातील शाळा यामध्ये फरक नाही. शाळेत जे प्रत्यक्ष शिकवतात अगदी त्याच प्रकारे शिक्षण मिळत आहे. बाल चित्रपट, टिलिमिली, गृहपाठ आदींमुळे आम्ही जणू काही शाळेतच असल्याचे आम्हाला वाटते.
-रेश्मा आगीवले, विद्यार्थिनी,

शिक्षकांकडून आमच्या पालकांसोबत नियमित चर्चा, भेटी, आढावा यामुळे आम्ही घरातील टीव्हीवरची शाळा आनंदितपणे अनुभवत आहे. आमचे पालकही यानिमित्ताने शाळेचा जाण्याचा आत्मिक आनंद घेत आहेत.
- विजय आगीवले, विद्यार्थी इ. 4 थी.

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhamakiwadi village school pattern, students doing studies different way