कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरणार 'ई-साय क्लिनिक'; संवाद, समुपदेशातून घालवणार भीती

E-Cy Clinic to alleviate the fear of corona in nashik marathi news
E-Cy Clinic to alleviate the fear of corona in nashik marathi news

नाशिक : कोरोना विषाणू संसर्गाची तपासणी, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, सेंट्रल ऑक्सिजनच्या खाटा अशा विविध उपाययोजनांच्या माध्यमातून कोरोनाविरुद्धची लढाई सुरू आहे. त्याच्या पुढचे पाऊल टाकत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे आता कोरोनाविषयीची भीती संवाद, समुपदेशातून कमी करण्यासाठी ई-साय क्लिनिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा सरकारी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णांचे चोवीस तास ‘मॉनेटरिंग’ करणारा ‘क्लाउड फिजिशिअन’ हा उपक्रमदेखील राबविण्यात येणार आहे.

कसे असेल ई-साय क्लिनिक 
स्टार्टअप ॲक्ट फंडच्या माध्यमातून मदत केली जाईल. त्यातील दोन स्टार्टअपशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यातील एक आहे ई-साय क्लिनिक आणि दुसरे क्लाउड फिजिशिअन. भीती दूर करण्यासाठी तज्ज्ञ समुपदेशकांची आवश्‍यकता आहे. हीच गरज ई-साय क्लिनिकच्या माध्यमातून मोफत पूर्ण केली जात आहे. त्यासाठी एक मोबाईल क्रमांक जाहीर केला जाईल. त्यावर २४ तास समुपदेशक मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतील. कोरोना संसर्गाच्या काळात मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. कोरोना संसर्ग झाल्यावर, तो होईल का म्हणून अशा दोन्ही पद्धतीने भीतीमुळे तणाव वाढतो. हा तणाव कमी करण्यासाठी थेट संपर्क साधता येईल. अथवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून माहिती घेता येईल. मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमधून समुपदेशक संवाद साधतील. सततच्या आरोग्यसेवेमुळे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर तणाव वाढतो. अशांसाठी सुद्धा ई-साय क्लिनिक उपयुक्त ठरणार आहे. कोविड केअर सेंटरमधून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना समुपदेशानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

बेंगळुरूहून गुरुवारी पथक येणार
‘क्लाउड फिजिशिअन'अंतर्गत जिल्हा सरकारी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कॅमेरे बसविण्यात येतील. त्यासाठी भारत दूरसंचार निगमची सेवा रुग्णालयात पोचली आहे. बेंगळुरूहून कॅमेरे घेऊन पथक गुरुवारी (ता. १३) नाशिकमध्ये येत आहे. अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचे बेंगळुरूहून ‘मॉनेटरिंग' करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका उपलब्ध असतील. त्यासाठी रुग्णांची माहिती दिली जाईल. जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

स्वातंत्र्यदिनी घोषणा अपेक्षित
ई-साय क्लिनिकचे औपचारिक उद्‍घाटन स्वातंत्र्यदिनी (ता. १५) पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्याची प्रशासनाची तयारी सुरू आहे. तसेच क्लाउड फिजिशिअनची घोषणा त्यांच्याकडून होण्याची शक्यता अधिक आहे. उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पुढाकार घेतला आहे. क्लाउड फिजिशिअन उपक्रमातून मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी तीन वर्षे व्हेंटिलेटरचा अभ्यास केलेले डॉ. धृव जोशी यांचे सहकार्य लाभणार आहे.

(संपादन : ब्रिजकुमार परिहार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com