"एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत न जाता रिपब्लिकन पक्षात प्रवेश करावा"

khadse aathvale.jpg
khadse aathvale.jpg

नाशिक :  एकनाथ खडसे हे नाराज आहेत. ते माझे जवळचे मित्र आहेत. बहुजन समाजाचे नेते म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी नाराजीतून आमदारकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ नये. त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश करावा. भविष्यकाळात राज्यपाल नियुक्तीसाठी मी प्रयत्न करेन, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ता.१८) नाशिकमध्ये स्पष्ट केले.

राज्यात राष्ट्रपती राजवटीची परिस्थिती नाही 

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यासारखी परिस्थिती नसल्याचा निर्वाळा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबद्दल बोलताना त्यांनी शिवाजी पार्कमध्ये झेंडे लावावे, छोट्या आकाराचे व्यासपीठ उभारावे, शंभर जणांना बोलवावे आणि दूरचित्रवाहिन्यांवरून त्याचे थेट प्रक्षेपण करावे, असा सल्ला दिला. त्याचवेळी कायदा तोडू नका, अन्यथा कारवाई करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घ्यावा लागेल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

रामदास आठवले : शिवसेनेने शंभर जणांच्या उपस्थितीत करावा दसरा मेळावा 

कायदा-सुव्यवस्था हाताळण्यात अपयश आल्यास मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असा इशाराही द्यायला श्री. आठवले यांनी मागे-पुढे पाहिले नाही. नाशिकच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. मंदिरे खुली करण्याच्या भाजपच्या मागणीच्या प्रश्‍नावर ते म्हणाले, की सर्व धर्मस्थळे खुली झाली पाहिजेत, अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. पण, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे मुख्यमंत्री काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाखाली ‘सेक्युलर’ झालेत. खरे म्हणजे, शंभर ते दोनशे भक्तांची यादी करून एकेकांना दर्शन मिळावे, अशा पद्धतीने धर्मस्थळे खुली व्हायला हवीत. 

...अन्यथा चित्रीकरण बंद पाडू 
फिल्म इंडस्ट्री मुंबईत राहायला हवी, अशी आग्रही भूमिका मांडताना श्री. आठवले यांनी अंमली पदार्थांच्या वापराच्या अनुषंगाने चर्चेत आलेल्या अभिनेते-अभिनेत्रींना चित्रपटांमधून भूमिका दिल्या जाऊ नयेत अन्यथा अशा चित्रपटांचे चित्रीकरण रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते बंद पाडतील, असा इशारा दिला. पायल घोषने अनुराग कश्‍यपविरुद्ध केलेल्या तक्रारीची गंभीर दखल सरकारने घेतली नाही. त्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर चौकशीला सुरवात झाली. मात्र, अनुरागला अद्याप अटक झालेली नाही. एवढेच नव्हे, तर शिवसेनेने त्याविरुद्ध आवाज उठवला नाही. चित्रपट दुनियेत हा रोग लागला आहे. महिला कलावंतांनी त्यांच्यावर अत्याचार झाला असल्यास गप्प बसू नये. मला भेटावे अथवा पोलिसांमध्ये तक्रार करावी. 

कोरोना रुग्णसंख्येत घट सुरू 
जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीतून कोरोनाच्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ८८ हजार ८६१ रुग्ण आढळले. त्यापैकी ८० हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत पोचले आहे. मृत्यूचे राज्याचे प्रमाण २.७० टक्के असून, जिल्ह्यात १.७७ टक्के जणांचा मृत्यू झाला आहे, असे सांगून श्री. आठवले यांनी कोरोनाचे औषध आल्यावर मृत्यूचे प्रमाण ०.१ टक्क्यांपर्यंत कमी होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. देशात वर्षाला अपघातामध्ये दीड लाख जणांचा मृत्यू होतो. कोरोना संसर्गामुळे सव्वा लाख जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती देतानाच त्यांनी शारीरिक अंतर ठेवा, गर्दी करू नका, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असे राहू नये, असेही श्री. आठवले यांनी सांगितले. 
 

आठवले म्हणालेत... 
- केंद्राकडे राज्य सरकारने दहा हजार कोटींची मागणी केली असली, तरीही तेवढे पैसे मिळणार नाहीत. चार ते पाच हजार कोटी रुपयांची मदत मिळण्यासाठी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना मी पत्र लिहणार आहे. 
- जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला यांनी ३७० कलम हटवण्यासाठी चीनच्या मदतीचा उल्लेख केला असल्याने त्यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवायला हवा. 
- राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होईल. त्यांच्या सरकारचा सातबारा उतारा कोरा होण्याची वेळ आली; पण मुख्यमंत्र्यांनी अद्याप शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा केलेला नाही. 
- अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे काहीही करावे, कर्ज काढावे पण शेतकऱ्यांना पूर्ण पिकांची किंमत सरकारने द्यायला हवी. 
- मराठा, ब्राह्मण, लिंगायत, जैन अशा सगळ्यांना आठ लाखांपेक्षा आत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळायला हवे. 
- शिष्यवृत्तीचे बँकेत ६० कोटी पडून आहेत. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अर्धा आणि एप्रिलमध्ये उरलेला शिष्यवृत्ती हप्ता देण्याचा माझा प्रयत्न असेल. 
- शिवसेनेला मुख्यमंत्री हवे असताना भाजपला सत्तेसाठी तीस आमदारांची आवश्‍यकता होती. अजित पवार यांनी आपल्याकडे पंचवीस ते तीस आमदार असल्याचे सांगितल्याने देवेंद्र फडणवीस यांनी घाईगर्दीत अजित पवार यांच्यासमवेत शपथ घेतली.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com