
शासनाने व्यावसायिकांच्या मागणीचा सकारात्मक विचार घेत लवकरच निर्णय घेतला नाही तर व्यावसायिक वर्गाचा रोष वाढत जाईल. येत्या काही दिवसांत शासनाच्या निर्णयाविरोधात जाऊन दुकाने सुरु करण्याचीही तयारी व्यावसायिकांकडून सुरु असल्याचे समजते.
तर व्यवसाय सुरु करण्यास निर्बंधांसह परवानगी द्या
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘ब्रेक द चेन’अंतर्गत बाजारपेठा बंद ठेवण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापारी वर्गातून आवाज उठू लागला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर बेरोजगारीचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. निर्बंधांची अंमलबजावणी करूनही रस्त्यांवर रहदारी कायम आहे, मग वेळेसह अन्य कठोर निर्बंध घालून व्यवसाय सुरू करण्यासही परवानगी द्यावी अशी मागणी व्यापारी वर्गाकडून जोर धरू लागली आहे.
‘ब्रेक द चेन’ मुळे रोजगार ब्रेक होण्याची भीती
राज्यभरातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मिनी लॉकडाउन लागू केले आहे. असे असले तरी भाजीबाजार, किराणा दुकाने व अन्य सार्वजनिक ठिकाणांवर गर्दी होत आहे. शहर परिसरातील रस्त्यांवर वाहनांची रहदारी कायम आहे. दिवसा जमावबंदी असूनही घोळकेच्या घोळके बघायला मिळत आहेत. तर, रात्री संचार बंदी लागू असतानाही रस्त्यांवर मोठ्या संख्येने वाहने बघायला मिळत आहेत. उद्योग सुरु आहेत, अशा परिस्थितीत केवळ व्यवसायांवर अन्याय का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. आगामी काळात गुढीपाडव्याचा सण येऊ घातला असून, अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय सणासुदीवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत उद्योगांच्या धर्तीवर व्यावसायिकांनाही नियमांचे पालन करत व्यवसाय करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी केली जाते आहे.
आंदोलनाचा पवित्रा
शासनाने व्यावसायिकांच्या मागणीचा सकारात्मक विचार घेत लवकरच निर्णय घेतला नाही तर व्यावसायिक वर्गाचा रोष वाढत जाईल. येत्या काही दिवसांत शासनाच्या निर्णयाविरोधात जाऊन दुकाने सुरु करण्याचीही तयारी व्यावसायिकांकडून सुरु असल्याचे समजते. तसेच शासनाच्या कठोर भूमिकेविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
भाजीबाजार व अन्य ठिकाणांवरही सध्या गर्दी होतेच आहे. मग सामान्य व्यावसायिकांवर अन्याय का, असा प्रश्न उपस्थित होतो. व्यावसायिकांनी आपल्याकडे नोकरीस असलेल्या मनुष्यबळाचा पगार कसा करावा, दालनाचे भाडे व अन्य खर्च कसे सोसावे ही समस्या निर्माण झाली आहे. कठोर निर्बंध घालून का होईना व्यवसायिकांना व्यवसायाची संधी द्यावी.
- दिनेश वराडे, साची होंडा.गेल्यावर्षी गुढीपाडवा व अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर चांगल्या व्यवसायापासून मुकावे लागले होते. यंदाही गुढी पाडव्याला दुकाने बंद राहिली तरी परिस्थिती अवघड होईल. कोरोनाचा अटकाव करण्यासाठी "माझे दुकान, माझी जबाबदारी' ही संकल्पना आम्ही यापूर्वीच राबविली होती. ग्राहकांकडून आगाऊ बुकिंग घेतलेल्या असून, शासनाने सहानुभूतिपूर्वक विचार करत निर्बंधांसह व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी.
-चेतन राजापूरकर, माजी अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन.