सावधान! ज्येष्ठांचे रुग्णांमध्ये ५० टक्के प्रमाण; ३० नोव्हेंबरपर्यंत दिवसाला ३०० रुग्णांचा अंदाज  

senior cc1.jpg
senior cc1.jpg

नाशिक : दिवाळीच्या सुट्यांनिमित्त शहरांमधून गावाकडे जाण्याचा कल वाढलेला असताना खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांमुळे गर्दी वाढत गेली. हा वर्ग प्रामुख्याने तिशी ते पन्नाशी वयोगटातील आहे. त्याच वेळी ‘मॉर्निंग-इव्हनिंग वॉक’, एकमेकांच्या भेटींवर ज्येष्ठांनी भर दिला. त्याचाच परिपाक म्हणजे, ज्येष्ठांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर प्रश्‍न कोरोना लागणीने तयार झाला आहे. गेल्या १९ दिवसांमधील नाशिक शहर आणि जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांमध्ये ज्येष्ठांची संख्या ५० टक्के आहे, तर मृत्यूंमध्ये ८८ टक्के ज्येष्ठ आहेत. 

सावधान! ज्येष्ठांचे रुग्णांमध्ये ५० टक्के प्रमाण
कोरोना विषाणू संसर्गाला सुरवात झाल्यानंतर खबरदारी घेतली गेल्याने ज्येष्ठांच्या दृष्टीने फारशी चिंताजनक परिस्थिती तयार झाली नव्हती. आता मात्र ज्येष्ठांचे आरोग्य राखण्यासाठी कुटुंबांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे. १५ अंश सेल्सिअसच्या खाली घसरलेला पारा, दिवाळीच्या खरेदीसाठी होणारी गर्दी आणि वाढते प्रदूषण या कारणास्तव कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याबद्दलचा इशारा आरोग्य विभागातर्फे दिवाळीच्या अगोदरपासून देण्यात येत होता. याच पार्श्‍वभूमीवर नाशिक जिल्ह्याची स्थिती काय राहील, यासंबंधाने आरोग्य विभागातील तज्ज्ञांशी संवाद साधला. त्यातून ३० नोव्हेंबरपर्यंत दिवसाला सर्वसाधारणपणे ३०० रुग्णांची वाढ होण्याचा अंदाज पुढे आला आहे. त्यासाठी प्रलंबित असलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या आधारभूत मानण्यात आली आहे. सद्यःस्थितीत दोन हजार ५२४ चाचण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. आजवरच्या प्रलंबित अहवालातून ‘पॉझिटिव्ह’ आढळण्याचे प्रमाण २० ते २५ टक्क्यांपर्यंत आहे. त्यावरून दिवसाच्या रुग्णसंख्यावाढीचा अंदाज आहे. प्रलंबित अहवालांमध्ये एक हजार ७५६ चाचण्या ग्रामीण, ६५८ चाचण्या नाशिक महापालिका आणि ११० चाचण्या मालेगाव महापालिका क्षेत्रातील आहेत. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी
दिवाळीनंतर वाढल्या चाचण्या 
शारीरिक त्रास जाणवत असला, तरीही दिवाळीमुळे चाचणी करून घेण्याकडे कल कमी झाल्याने तपासणीचे प्रमाण कमी झाले होते. दिवाळी पाडवा-भाऊबीज झाल्यानंतर चाचण्यांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे प्रलंबित अहवालांची संख्या वाढत चालली आहे. दिवाळीतील संसर्गाचा विचार करता, ३० नोव्हेंबरपर्यंत रुग्णसंख्या वाढत जाणार आहे. पण मध्यंतरी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील पारा १५ अंश सेल्सिअसच्या खाली घसरलेला असताना थंडीने हुडहुडी भरवली होती. बाजारपेठांमधून गर्दी झालेली असताना फटाक्यांच्या प्रदूषणाने कळस गाठला. त्यामुळे स्वाभाविकपणे कोरोनाग्रस्तांची संख्या नेमकी किती वाढणार, असा काळजीचा सूर दाटून आला होता. आरोग्य विभागातील तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार दिवसाला ३०० रुग्णसंख्या वाढीची असली, तरीही आगामी काळात १५ अंश सेल्सिअसच्या खाली किमान तापमानाची नोंद होणाऱ्या भागामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी सांगितले, की आगामी काळातही कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही यासंबंधाने मास्क वापरणे, नियमितपणे हाताची स्वच्छता आणि शारीरिक अंतर राखणे महत्त्वाचे आहे. 

साडेचार हजार कोमॉर्बिड पॉझिटिव्ह 
जिल्ह्यातील ४२ लाख २८ हजार २०१ पैकी ४१ लाख ६३ हजार २१५ लोकसंख्येचे ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत सर्वेक्षण दोन फेऱ्यांमध्ये करण्यात आले होते. आठ लाख ५६ हजार ४९६ कुटुंबांचा समावेश होता. ८९ हजार २५८ स्थलांतरित लोकसंख्या होती. दुर्धर आजार आणि ज्येष्ठ असे पहिल्या फेरीत एक लाख ९१ हजार ३२०, तर दुसऱ्या फेरीत १८ हजार ३३९ असे एकूण दोन लाख नऊ हजार ६५९ कोमॉर्बिड लोक सर्वेक्षणात आढळले होते. त्यातील दहा हजार ४०५ जणांना पहिल्या फेरीत, पाच हजार ९०९ जणांना दुसऱ्या फेरीत अशा एकूण १६ हजार ३१४ जणांना आरोग्यसेवेसाठी संदर्भित करण्यात आले होते. त्यांपैकी १४ हजार ३२२ जणांची कोरोनाविषयक तपासणी करण्यात आली असून, त्यात पहिल्या फेरीत तीन हजार ८३९ आणि दुसऱ्या फेरीत ७०५ असे एकूण चार हजार ५४४ कोमॉर्बिड ‘पॉझिटिव्ह’ आढळले होते. त्याचा विचार करता, गेल्या १९ दिवसांमध्ये एक हजार ८९३ जण ज्येष्ठ कोरोनाग्रस्त झाल्याने ज्येष्ठांच्या दृष्टीने चिंतेत भर पडलेली आहे. 

 कोरोनाग्रस्त अन् मृत्यूंची स्थिती 
(१ ते १९ नोव्हेंबर २०२० हा कालावधी) 
वयोगट पॉझिटिव्ह मृत्यू 
पुरुष महिला पुरुष महिला 

० ते १२ १०५ ८१ ० ० 
१३ ते २५ ३१० २४४ १ ० 
२६ ते ४० ७६८ ४६० ६ २ 
४१ ते ६० ८०९ ४७५ १३ ५ 
६१ वरील ३७० २३९ २९ २१ 
एकूण २ हजार ३६२ १ हजार ४९९ ४९ २  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com