निवृत्तिनाथांची पंढरपूर आषाढी वारी "शिवशाही'ने  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

नाशिक ः सव्वाशेहून अधिक वर्षांची परंपरा आणि वारकरी संप्रदायात मानाच्या पालख्यांपैकी एक असलेली येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या आषाढी वारी प्रथमच राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या "शिवशाही' बसने पंढरपूरला जाणार आहे. 

नाशिक: कोरोना महामारीमुळे पायी वारीला परवानगी नसल्याने दर वर्षी हजारो वारकऱ्यांच्या सहभागाने मंगळवारी निघणाऱ्या वारीत फक्त 12 वारकरी-विश्‍वस्त असतील. कोरोनामुळे अनेक प्रथा-परंपरांना फाटा देत आणि वारकऱ्यांच्या भावभावनांना मुरड घालून शतकात बहुधा मंगळवारी प्रथमच अशी वारी निघणार आहे. त्र्यंबकेश्‍वरला सकाळी आठला मंदिरात पूजा होईल. त्यानंतर परंपरेप्रमाणे नाथांच्या पादुका व प्रतिमा कुशावर्तावर स्नानाला नेल्या जातील.

कुशावर्तावर नाथांच्या पादुकांना श्री त्र्यंबकराजाच्या मंदिराजवळ आणले जाईल. तेथून त्र्यंबकराजाच्या मंदिराच्या महाद्वाराचे दर्शन करून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची जशी वारी सुरू होते त्याप्रमाणे मंगळवारी सगळे सोपस्कार होऊन शिवशाही बसने पंढरपूरसाठी वारीचे प्रस्थान होणार आहे. 

तत्पूर्वी कुशावर्तावर वारीच्या प्रस्थानाचे अभंग व आरती होईल. त्र्यंबकेश्‍वर ते पंढरपूरदरम्यान शिवशाही बसने निघणाऱ्या पालखीसोबत यंदा अनेक वर्षानुवर्षांचे मानाचे दिंडीप्रमुख नाहीत. शेकडो वर्षांची परंपरा कोरोनामुळे मोडीत निघाल्याचे दुःख वाटत असल्याने बसने निघणाऱ्या वारीत सहभागी होत नसल्याचे पूजक आणि देवस्थानचे विश्‍वस्त हभप जयंत महाराज गोसावी यांनी सांगितले. 

वारकऱ्यांचे चैतन्य नसलेली वारी 
प्रतिवर्षी आषाढ पौर्णिमेला पायी निघणारी निवृत्तिनाथांची वारी महामारीमुळे शिवशाही बसने जात आहे. त्यामुळे कुणालाही आमंत्रण न देता सहभागी होणाऱ्या हजारो वारकऱ्यांचा उत्साह, त्यांचे चैतन्य यंदाच्या तयारीत नाही. प्रस्थानापूर्वी महिनाभर आधीपासून पायी प्रवास करणारे वारकरी आणि हरीचा सत्संग करणाऱ्या वारकऱ्यांची गर्दी यंदा नसल्याने वारी सुनी वाटते आहे. बुधवारच्या आषाढी वारीस फक्त 20 लोकांना शासनाची परवानगी आहे. विश्‍वस्त दोन पूजक टाळकरी, ध्वजेकरी, विणेकरी व व्यवस्थापक अशा 16 जणांसह पोलिस-वैद्यकीय अधिकाऱ्यासह 20 जणांच्या वारीसाठीच्या शिवशाही बसचा 70 हजार रुपये भाड्याचा खर्च देवस्थानाच्या खर्चातून होणार आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the first time, Nivruttinath's Pandharpur Ashadi Wari was called "Shivshahi"