द्राक्षांची साठवणूक शेतकऱ्यांच्या अंगलट...द्राक्षपंढरीतील चक्क 'इतकी' द्राक्षे पडूनच! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मे 2020

द्राक्ष काढणीच्या अखेरच्या टप्प्यात ऐन हंगामातच संपूर्ण जगाला कोरोनाचा विळखा पडला. यामुळे द्राक्षपंढरीतील उत्पादकांच्या द्राक्षाला जणू दृष्टच लागली. कोरोनामुळे त्यांच्यातील गोडवा हरपला. परंतु सौदा करण्यासाठी काहींनी व्यापारी सोडा बेदाण्यासाठी द्राक्षे न विकता साठवणुकीचा जुगार खेळला. यामुळे आजही जिल्ह्यातील कोल्ड स्टोरेजमध्ये इतकी टन द्राक्षे पडून आहेत. 

नाशिक : (पिंपळगाव बसवंत) द्राक्ष काढणीच्या अखेरच्या टप्प्यात ऐन हंगामातच संपूर्ण जगाला कोरोनाचा विळखा पडला. यामुळे द्राक्षपंढरीतील उत्पादकांच्या द्राक्षाला जणू दृष्टच लागली. कोरोनामुळे त्यांच्यातील गोडवा हरपला. अनेकांवर कवडीमोल दराने आपली द्राक्षे विकण्याची वेळ आली आणि त्यांनी द्राक्ष विकलीही. परंतु सौदा करण्यासाठी काहींनी व्यापारी सोडा बेदाण्यासाठी द्राक्षे न विकता साठवणुकीचा जुगार खेळला. यामुळे आजही जिल्ह्यातील कोल्ड स्टोरेजमध्ये इतकी द्राक्षे पडून आहेत.

द्राक्ष हंगाम बेचव झाला

कोरोनामुळे सर्वाधिक हानी जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची झाली. परदेशात निर्यात करून 70 ते 80 रुपये किलो आकर्षक दर मिळण्याचे स्वप्न यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी पाहिले होते. कारण अवकाळी पाऊस व रोगांच्या आक्रमणांशी झुंज देत शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षे पिकविली होते. मात्र, या संपूर्ण स्वप्नावर कोरोनाने पाणी फिरविले. मार्च महिन्याअखेरीस द्राक्ष काढणीला वेग आला असताना, कोरोना विषाणूचा संपूर्ण जगाला वेढा पडला. परदेश व परराज्यातील बाजारपेठ बंद, वाहतूक थांबली. त्यामुळे द्राक्षांचा हंगाम ठप्प झाला. त्यात कोट्यवधी रुपयांची द्राक्षे अक्षरश: मातीमोल झाली. 15 दिवसांनंतर काही प्रमाणात द्राक्षांची काढणी झाली खरी, पण तोपर्यंत द्राक्ष हंगाम बेचव झाला होता.

कोल्ड स्टोअरेजमध्ये द्राक्ष पडूनच

बंपर पीक असल्याने काही शेतकऱ्यांनी बेदाण्यासाठी द्राक्षे देऊन मिळतील ते पैसे पदरात पाडून घेतले. महिन्याभरात कोरोनाचे संकट दूर होऊन अपेक्षित दर मिळेल, या आशेवर काही शेतकऱ्यांनी कोल्ड स्टोअरेजमध्ये द्राक्षांची साठवणूक केली. क्रेट बॉक्‍स मध्ये पॅकिंग केले. सरासरी चार रुपये प्रतिकिलो महिना अशा दराने कोल्डस्टोअरेजला भाडे दिले. कोल्डस्टोअरेजचे भाडे व पॅकिंग खर्च पाहता प्रतिकिलो 18 रुपये अधिकचा खर्च आला. मोठ्या अपेक्षेने साठविलेल्या द्राक्षाला मात्र आता 25 ते 30 रुपये किलो दर मिळत आहे. 

लॉकडाऊन शिथिल मात्र भाव नाही

देशभरात बहुतांश राज्यांत लॉकडाउन शिथिल झाला, तरी द्राक्षाला मागणी नसून दर मिळत नाही. रमजानपर्वात द्राक्षाचे दर वधारतील, अशी अपेक्षाही फोल ठरली आहे. त्यामुळे द्राक्षांची साठवणूक शेतकऱ्यांच्या अंगलट आली आहे. नाशिक जिल्ह्यातील 69 कोल्ड स्टोअरेजमध्ये पाच हजार टन द्राक्षे विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. बांगलादेशाची सीमा खुली झाल्यास दरात तेजी येईल, अशी चिन्हे अजूनही दिसत आहेत. 

हेही वाचा >  नाशिक औष्णिक वीज केंद्र लॉकडाउननंतर कायमचे लॉक?

कोरोनामुळे द्राक्ष हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटी पाहणारा ठरला. निर्यातीच्या द्राक्षांचे कवडीमोल सौदे करावे लागले. कोल्डस्टोअरेजमध्ये साठवणूक केलेल्या द्राक्षालाही अपेक्षित दर मिळेना. - विश्‍वासराव मोरे, माजी संचालक, मविप्र 

हेही वाचा > रेल्वेसेवा 'या' तारखेपर्यंत पूर्णपणे बंदच ठेवण्याचा निर्णय!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five thousand tons of grapes are lying in cold storage in Nashik district due to corona impact nashik marathi news