झटपट श्रीमंतीची हाव अंगलट! सराफ व्यावसायिकाला लुटणारे २४ तासांत ताब्यात, एक फरार

संतोष विंचू
Sunday, 4 October 2020

विसापुर फाटा येथे गुरुवारी (ता.१) मनमाड येथील रहिवासी सराफ व्यावसायीकाला चाकुचा धाक दाखवून चोरट्यांनी सव्वा लाखाला लुटल्याच्या घटनेचा अवघ्या २४ तासांत येवला तालुका पोलिसांनी छडा लावत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नाशिक/येवला : विसापुर फाटा येथे गुरुवारी (ता.१) मनमाड येथील रहिवासी सराफ व्यावसायीकाला चाकुचा धाक दाखवून चोरट्यांनी सव्वा लाखाला लुटल्याच्या घटनेचा अवघ्या २४ तासांत येवला तालुका पोलिसांनी छडा लावत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वाचा नेमका काय प्रकार...

पाळत ठेऊन प्लॅनिंग

सोनारावर पाळत ठेऊन गावातील तरुणांनी झटपट श्रीमंत होण्याच्या इराद्याने सराफाला लुटल्याची हि घटना असून यातील पाच जणांना अटक झाली होऊन एक जण फरार आहे. मनमाड येथील सराफ व्यावसायीक संतोष बाविस्कर हे कातरणी, विसापुर तसेच विखरणी (ता.येवला) येथे ग्राहकांना ऑर्डरचे सोने, चांदीचे दागिने पोहोच करण्यासाठी त्यांच्या दुचाकीवर आले होते. 
चाकूचा धाक दाखवत लूट

विखरणी येथील बाजार करून विसापूर रोडने मनमाडकडे जात असताना दुपारी पावणेपाचच्या सुमारास खडीक्रशरजवळ पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी त्यांना अडवले. तसेच मारहाण करून चाकूचा धाक दाखवत त्यांच्या जवळ असलेला १ लाख ३० हजार रुपयांचा सोने चांदीचे दागिन्यांचा ऐवज लुटुन नेला. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मास्टर माईंड ताब्यात

उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंग साळवे,सहायक पोलीस निरीक्षक उज्वलासिंग राजपूत,एकनाथ भिसे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम शिंदे, माधव सानप, किरण पवार, आबा पिसाळ, सतिश मोरे, मुकेश निकम, यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी २४ तासाचे आत गुन्ह्याचा मास्टर माईंड चेतन शशिकांत पवार (वय २२, रा.तिसगाव, ता. चांदवड) याला येवल्यातील गुजरखेडे येथुन ताब्यात घेतले. 

हेही वाचा > ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

पाचही जणांकडून गुन्ह्याची कबुली

त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याचे साथीदार समाधान सुकदेव मोरे, (वय २०), योगेश रमेश पवार (वय २०, दोघे रा. विखरणी,ता.येवला), सतिश शिवाजी माळी (वय २२, रा. दरसवाडी, ता. चांदवड), भुषण बाळू पवार (वय २७, रा. रायपुर, ता. चांदवड) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या पाचही चोरटयांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उज्वलसिंग राजपुत करीत आहेत. 

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

(संपादन : भीमराव चव्हाण)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five youths arrested for robbing goldsmith in 24 hours nashik yeola marathi news