द्राक्षे हंगाम यंदा उशिरा! हवामान बदलाचा होतोय परिणाम; बळीराजा द्विधा मनस्थितीत 

संदीप मोगल
Saturday, 26 September 2020

जिल्ह्यात दिंडोरी तालुक्याचा ग्रीन झोन व द्राक्षपंढरी म्हणून नामोल्लेख केला जातो. परंतु मागील वर्षी द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांना अनेक संकटांनी व समस्यांनी ग्रासल्याने यंदा दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष्याची चव नागरिकांना उशीर चाखायला मिळेल, असे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.

नाशिक / लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे हंगाम यंदा उशिरा सुरू होण्याची चिन्हे आहेत. हवामानातील बदल व परतीचा पाऊस यामुळे शेतकरीवर्गाची द्विधा अवस्था निर्माण झाली असल्याने यंदा हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता जानकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

द्राक्षे हंगाम यंदा उशिराने होण्याची शक्यता 
जिल्ह्यात दिंडोरी तालुक्याचा ग्रीन झोन व द्राक्षपंढरी म्हणून नामोल्लेख केला जातो. परंतु मागील वर्षी द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांना अनेक संकटांनी व समस्यांनी ग्रासल्याने यंदा दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष्याची चव नागरिकांना उशीर चाखायला मिळेल, असे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. मागील वर्षी भरपूर पाऊस झाल्याने द्राक्षे उत्पादक शेतकऱ्याला हंगाम घेताना तारेवरची कसरत करावी लागली होती. थेट छाटणीपासून ते द्राक्षे माल विकण्यापर्यंत शेतकरीवर्गाचे नाकीनऊ आले. त्यासाठी मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध करून द्राक्षबागा उभ्या केल्या. परंतु कोरोनामुळे द्राक्षे कवडीमोल भावाने विकावे लागले. त्यात भांडवल प्रमाणापेक्षा जास्त व उत्पन्न काहीच नसल्याने अडचण झाली. थोडक्यात, शेतकरीवर्गाची गत डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखी झाली आहे. त्यामुळे मागील हंगामात शेतकरीवर्ग पूर्णपणे हतबल होऊन गेल्याने यंदा द्राक्षे हंगाम कसा घ्यावा, ही मोठी समस्या निर्माण झाल्याने आता पुढे काय? असे संकट ‘आ’वासून उभे राहिले आहे. 

दिंडोरी तालुका, हवामान बदलाचा होतोय परिणाम 
यंदा शेतकरीवर्गावर अस्मानी व सुलतानी संकटांचे आक्रमण झाल्याने शेतकरीवर्ग पूर्णपणे हतबल झाला आहे. त्यामुळे प्रत्येक हंगाम घेण्यासाठी बळीराजाला तारेवरची कसरत करावी लागते आहे. रब्बी, खरीप हंगामासाठी जे भांडवल वेगवेगळ्या बॅंका, सोसायटी आदींकडून घेतले होते ते अजून बाकी असताना आता यंदाच्या हंगामासाठी भांडवल कसे उभे करायचे, ही मोठी समस्या निर्माण झाल्याने यंदा प्रत्येक हंगाम उशिरा सुरू होईल. -वाल्मीक मोगल, द्राक्षे उत्पादक शेतकरी, लखमापूर  

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grapes season to be late this year nashik marathi news