शिवभोजनचा 'येथे' वेगळाच पॅटर्न!...लिमिटेड शिवथाळी अनलिमिटेड...

shivthali.jpg
shivthali.jpg

नाशिक : शिवथाळींसाठी प्रत्येक केंद्रावर दीडशे एवढीच अनुदानप्राप्त थाळ्यांची संख्या आहे. साहजिकच दीडशेहून अधिक नागरिकांच्या संख्येला विनाभोजन माघारी फिरावे लागते. मात्र, यात मालेगाव अपवाद ठरत आहे. शासकीय अनुदानपात्र थाळ्यांची दीडशे इतकीच संख्या असताना त्याहून अधिक नागरिकांनाही स्थानिक संस्थेतर्फे दहा रुपयांतच भोजन दिले जाते. 

जवळपास प्रत्येक केंद्रावर सध्या हेच घडतंय

शासन मंजुरीपेक्षा अधिक थाळींचा खर्च कृषिमंत्री दादा भुसे, समितीचे संचालक मंडळ, जय आनंद ग्रुप मित्रपरिवार व तेथील दानशूर व्यक्ती उचलणार आहेत. त्यामुळेच "सरकार'ची लिमिटेड शिवथाळी मालेगावला मात्र अनलिमिटेड ठरली आहे. प्रजासत्ताक दिनापासून राज्यात सगळीकडे शिवभोजन थाळीचा उपक्रम सुरू झाला. नाशिकला शहरात तीन, तर मालेगावला एक याप्रमाणे चार केंद्रांवर शिवथाळीचा उपक्रम सुरू झाला. प्रत्येक केंद्रावर दुपारी दोन तास ऑनलाइन ऍप्लिकेशन सुरू होते. दहा रुपयांत थाळीचे दीडशे ग्राहक झाले, की आपोआप ऍप्लिकेशन बंद होते. साहजिकच त्यानंतर थाळीसाठी रांगेत असलेल्या नागरिकांना दहा रुपयांत थाळी मिळत नाही. शिवभोजन थाळीला सर्वत्र चांगला प्रतिसाद असल्याने राज्यातील जवळपास प्रत्येक केंद्रावर सध्या हेच घडत आहे. 

मालेगावचा अपवाद 

मालेगाव केंद्रावर दीडशेहून अधिक नागरिकांना कोटा संपला म्हणून माघारी फिरावे लागत नाही. जेवणाच्या आशेने येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होऊ न देता तेथे स्थानिक संस्थेच्या पुढाकारातून दीडशेहून अधिकच्या लोकांनाही संस्थेच्या खर्चाने भोजन दिले जाते. दीडशेपेक्षा जास्त थाळ्यांना सरकारी अनुदान मळत नाही, हे माहिती असूनही हा उपक्रम स्थानिकांनी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

तीनशेपेक्षा अधिक नागरिकांना शिवथाळीचा लाभ

मालेगाव बाजार समितीच्या मुख्य आवारात केंद्र सुरू आहे. दाभाडी येथील साईश्रद्धा महिला बचतगट काम पाहत आहे. केंद्राला शासनाकडून दीडशे थाळ्या मंजूर आहेत. याव्यतिरिक्त येणाऱ्या नागरिकांनाही थाळी दिली जाते. शासन मंजुरीपेक्षा अधिक थाळींचा खर्च कृषिमंत्री दादा भुसे, समितीचे संचालक मंडळ, जय आनंद ग्रुप मित्रपरिवार व शहरातील दानशूर व्यक्ती उचलणार आहेत. सध्या तीनशेपेक्षा अधिक नागरिक शिवथाळीचा लाभ घेत आहेत. विचारविनिमय करून दुपारची वेळही वाढविली जाणार आहे. - बंडूकाका बच्छाव, माजी सभापती, कृउबा, मालेगाव 

आगळावेगळा असाच मालेगावचा उपक्रम

तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या शिवथाळी योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दीडशे थाळींचा कोटा तत्काळ संपत असल्याने त्यात वाढ करून देण्याची मागणी आहे. त्यानुसार सरकारला अहवाल सादर करणार आहोत. मालेगावला मात्र स्थानिक संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रमातून इतरही अनेकांना शिवभोजन दिले जाते. राज्यात आगळावेगळा असाच मालेगावचा उपक्रम ठरत आहे. -डॉ. अरविंद नरर्सीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com