चक्क 'त्यांनी' केली तीस नक्षत्रवनांची निर्मिती!...भविष्यात चरकवन तयार करण्याचे स्वप्न 

माधव बर्वे.jpg
माधव बर्वे.jpg

नाशिक : मातीला काय हवे हे ओळखणारे, झाडे-पाने-फुलांची परिभाषा समजणारे, उद्यानांच्या समृद्धीचा मंत्रजागर करणारे, संशोधक वृत्तीने शेतकऱ्यांच्या आयुष्याला बळकटी देणारे कोठुरे (ता. निफाड) येथील माधवकाका बर्वे (वय 84) यांनी आतापर्यंत तब्बल 30 नक्षत्रवनांची निर्मिती केली. त्यांनी आतापर्यंत गावात चिंचेच्या 400 रोपांचे संगोपन केले असून, स्वत:ला सेंद्रिय शेतीच्या प्रचारात झोकून दिले. 

एक लाखाहून अधिक वृक्षांची लागवड 

वृक्षलागवड हा बर्वेकाकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून दासबोध परीक्षा देतांना मूर्खाची लक्षणे हा विषय त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरला. दीडशे देशी चिंचेची झाडे लावून त्यांनी गावातून कामाला सुरवात केली. त्यानंतर माधववृंद प्रयोग राबवून प्रत्येक स्वाध्यायीकडून एक रोप लावण्याच्या कार्यक्रमात ते रोपांची लागवड कशी करतात, याचे शिक्षण त्यांनी घेतले. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात 15 हजार झाडे लावली. कारागृहात रोपवाटिका तयार करून कैद्यांकडून रोपे बनवून घेतली. या परिसरात आवळा, सावर, करंज, चिंच, हादगा आदी वृक्ष डौलाने उभे आहेत. हे काम पाहून त्यांना देवळालीतील स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये वृक्षलागवडीसाठी बोलविण्यात आले. या ठिकाणी त्यांनी जैविक कुंपणाचा प्रयोग यशस्वी केला. हिरवे साबरचा प्रयोग केला. आंबे, करंज आणि बांबूचे अनेक वृक्ष त्यांनी येथे लावले. पुढे सैन्यदलाच्या नवी दिल्ली, जबलपूर, चंडीगड, बेंगळुरू, रामगड, रांची अशा मुख्यालयातून वृक्षलागवडी साठी बोलावणे आले. गुजरात सीमेवरील 22 गावांत चिंचेची साडेतीन हजार झाडे व तेथील प्रत्येक झोपडीसाठी एक झाड अशी वृक्षलागवड केली. त्यांनी स्वतः एक लाखा हून अधिक वृक्षांची लागवड केली. अर्जुन, करंज, चिंच, शेवगा, हादगा, शिकेकाई, साव री, बांबू अशा वृक्षांचा त्यात समावेश आहे. 

राहुरी कृषी विद्यापीठात नक्षत्रवन उभारले 

बर्वे काकांनी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात नक्षत्र वन उभे केले. त्यात वर्तुळाकार पद्धतीने झाडांची लागवड केली. प्रत्येक नक्षत्रासाठी एक अशी 27 झाडे प्रत्येक वर्तुळात लावण्यात आली. पहिले वर्तुळ 29.4, दुसरे 25, तिसरे 21 मीटर त्रिज्येचे आहे. वनांची रचना करण्यात एक एकर जागा लागते. अशी 30 वने त्यांनी राज्यात उभी केली आहेत. औषधी वनस्पतींची लागवड, पर्यावरण व त्यांचे महत्त्व नक्षत्रवन संकल्पना, सरस्वतीवन, लक्ष्मीवन, पंचवटीवन, अशोकवन, वृंदावन असे विषय त्यांच्या आवडीचे आहेत. महाराष्ट्रातील बोर, जांभूळ, चिंच, कवठाचे बियाणे त्यांच्याकडे उपलब्ध आहे. गुजरातमधील अतुल लिमिटेड कंपनीचा खजूर लागवड नाशिकमध्ये करता येईल का, याचा ते अभ्यास करीत आहेत. नाशिकमधील हाजी मिठाईतर्फे काही झाडे लावून ती जगली आहेत. काकांनी तांदळाच्या विविध जातींचा अभ्यास केला असून, कोठुरेची जात प्रसिद्ध झाली आहे. बायफ संस्थेत संशोधन झाले आहे. नक्षत्रवनाची संकल्पना सोनगीर (जि. धुळे) येथील डॉ. ऊर्जिता जैन यांच्या 35 एकरमधील शांतिवनामुळे त्यांना मिळाली. महाराष्ट्रातील वन विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात त्यांनी नवीन अधिकाऱ्यांना वृक्षलागवडीचे शिक्षण दिले आहे. 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वृक्षलागवड केली. त्यासाठी एक रुपयाही घेतला नाही. भविष्यात चरकवन तयार करण्याचे माझे स्वप्न आहे. पाचशे औषधी वनस्पतींची लागवड करून वन उभारले जाणार आहे. - माधव बर्वे, वृक्षमित्र  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com