मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण

युनूस शेख
Wednesday, 20 January 2021

अंधाराची संधी साधून घरात प्रवेश करून मोबाईल आणि रोकड चोरी करणाऱ्या संशयितास नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. सोमवारी (ता. १८) रात्री दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

जुने नाशिक : मध्यरात्रीचा वेळ...सगळे गाढ झोपेत असतांनाच घरात चोरट्याची झाली दब्या पावलांनी एंट्री. अन् त्याने डाव साधत केला हात साफ. मात्र जेव्हा मालकाला जाग आली. तेव्हा मात्र चोराची चांगलीच झाली फजिती. अन् नंतर फक्त दे दणा दण...वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

गंजमाळ येथील मकसूद शेख (वय ५१) सोमवारी (ता. १८) रात्री मोबाईल घरातील मांडणीवर चार्जिंगसाठी लावून झोपी गेले. रात्री दीडच्या सुमारास संशयिताने घराचे दार उघडे असल्याची संधी साधली. घरात प्रवेश करून नऊ हजारांचा मोबाईल आणि पॅन्टच्या खिशातील तीन हजारांची रोकड असा १२ हजारांचा ऐवज लंपास केला. संशयित घरातून बाहेर पडत असताना शेख यांना जाग आली. त्यांनी चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चकमा देत त्याने पळ काढला. त्यांनी चोर-चोर ओरडताच त्यांचे कुटुंब आणि नागरिकांनी चोरट्याचा पाठलाग करून काही अंतरावर त्यास ताब्यात घेतले. त्याची यथेच्छ धुलाई करून पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र माळी यांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने आकाश दिनकर ताटे (वय २३, रा. मुंबई वेस्ट) नाव असल्याचे सांगितले. नागरिक आणि पोलिसांच्या भीतीपोटी मोबाईल आणि रोकड अंधारात फेकल्याचे त्याने सांगितले. मंगळवारी (ता. १९) त्यास न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. 

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क

दूध बाजारातून मोबाईलची चोरी 

दूध बाजार परिसरात शनिवारी (ता. १६) सायंकाळी अविनाश अहिरे पत्नीसह दुकानात मोबाईलची दुरुस्ती करीत होते. एकजण मोबाईल दुरुस्तीच्या बहाणाने दुकानात आला. अहिरे यांनी मोबाईल घेऊन येण्यास सांगितले. त्याने जुने मोबाईल विक्री आहे का, अशी विचारणा केली. दुकानदाराने त्याच्याकडील जुने मोबाईल त्यास दाखविले. त्यानंतर त्याने परत येतो, असे म्हणत निघून गेला. त्यादरम्यान त्याने दुकानदाराचा काउंटरवर ठेवलेला २० हजारांचा मोबाईल लंपास केला. जुने मोबाईल ठेवत असताना त्यांना मोबाईलची आठवण झाली. दुकानात शोध घेतला. मात्र, मोबाईल आढळून आला नाही. ग्राहक बनून आलेल्या व्यक्तीनेच मोबाईल लंपास केल्याचा संशयावरून मंगळवारी (ता. १९) अहिरे यांनी पोलिसांत तक्रार दिली.  

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile, cash thief caught in ganjmal nashik marathi news