ग्वाल्हेरच्या महाराणीच्या दुर्लक्षित समाधीचा शोध; अंगठीतील हिरा गिळून केला होता देहत्याग

सुदाम गाडेकर
Friday, 20 November 2020

संगमनेरच्या माहेरवाशीण व ग्वाल्हेरच्या महाराणी भवानीबाई यांच्या दुर्लक्षित समाधीचा इतिहास अभ्यासक व महाराणीच्या सध्याच्या वारसदारांना नुकताच शोध लागला आहे. भवानीबाईंनी बोटातल्या अंगठीतील हिरा गिळून देहत्याग केला होता. अनेक बुजुर्ग व इतिहास अभ्यासक ही महिती सांगतात​

नगरसूल (नाशिक) : संगमनेरच्या माहेरवाशीण व ग्वाल्हेरच्या महाराणी भवानीबाई यांच्या दुर्लक्षित समाधीचा इतिहास अभ्यासक व महाराणीच्या सध्याच्या वारसदारांना नुकताच शोध लागला आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात जन्मलेल्या आणि लग्नानंतर तीन वर्षांनी नगरसूल (ता. येवला) येथे देह ठेवलेल्या म्हणजे भवानीबाईंच्या समाधीला त्यांच्या माहेरच्या देशमुख कुटुंबीयांनी नुकतीच भेट दिली. 

ग्वाल्हेरच्या महाराणीच्या दुर्लक्षित समाधीचा शोध ​
पेशवाईच्या काळात मराठेशाहीचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या शूरवीर महादजी शिंदे यांचा चौथा विवाह संगमनेरच्या म्हस्के देशमुख परिवारातील भवानीबाई यांच्याशी झाला होता. विवाहानंतर ग्वाल्हेरच्या महाराणी झालेल्या भवानीबाईंनी आपल्या सासरी म्हणजे ग्वाल्हेरला न जाता संगमनेरलाच वास्तव्य करणे पसंत केले होते. महादजी शिंदे ग्वाल्हेरहून पुण्याला व पुण्याहून ग्वाल्हेरला परत जाताना संगमनेरला थांबायचे. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

अंगठीतील हिरा गिळून केला होता देहत्याग
१७८० मध्ये महादजींनी भवानीबाई यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध आग्रहाने ग्वाल्हेरला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. संगमनेरहून कोपरगावमार्गे पुढे निघाल्यावर हा लवाजमा नगरसूल येथे मुक्कामाला थांबला असता भवानीबाईंनी बोटातल्या अंगठीतील हिरा गिळून देहत्याग केला होता. अनेक बुजुर्ग व इतिहास अभ्यासक ही महिती सांगतात. काळ पुढे सरकत गेला. देशमुख परिवारात भवानीबाई आपल्या पूर्वज स्त्रीबद्दलचे कुतूहल मात्र कायम होते. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

ती समाधी महाराणी भवानीबाईंची
इतिहास संशोधक डॉ. संतोष खेडलेकर, नगरसूल येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी इतिहासातील अनेक नोंदी व पुराव्यांचा अभ्यास करून नगरसूल येथील संजय खैरनार यांच्या भवानी मळा म्हणून परिचित असलेल्या शेतीतील भवानीदेवी मंदिरातील समाधी ही इतिहासकालीन महाराणी भवानीबाई यांची असल्याची बाब नुकतीच उघड केली आहे. 

ऐतिहासिक समाधीला वारसदारांची भेट 
भवानीबाईंच्या देशमुख कुटुंबातील सध्याचे वंशज तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजितसिंह देशमुख, संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे संस्थापक, कार्याध्यक्ष डॉ. संतोष खेडलेकर, संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील नवनीत देशमुख व अजित देशमुख, सुभाष निकम, विनोद पाटील यांनी नुकतीच या समाधीस्थळी भेट देऊन दर्शन घेतले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: neglected tomb found of queen of Gwalior bhavanibai nashik marathi news