फड कालवे मोजताय अखेरच्या घटका! कालव्यांना गाळासह पाणीगळतीचे संकट

phad kalva.jpg
phad kalva.jpg

कंधाणे (नाशिक) : बागलाण तालुक्याचा गुजरात सीमेलगतचा भाग अधिक पर्जन्यवृष्टीचा असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात आरम नदीवर ब्रिटिशकालीन बंधारे बांधून आरम खोऱ्यातील गावांना जलसिंचनासाठी वरदान ठरलेल्या हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली आणणारे फड कालवे आजच्या घडीला अखेरच्या घटका मोजत आहे. कारण सर्व फड कालव्यांना अतिक्रमणाने विळखा व गाळाने गच्च भरले आहे. कालव्यांमध्ये पाणी सोडण्यासाठी बांधण्यात आलेले गेट व संरक्षक भिंतींच्या पडझडीने कालव्यांमधून होत असलेल्या पाणीगळतीचा प्रश्‍नदेखील गंभीर बनत चालला आहे. 

कालव्यांना गाळासह अतिक्रमणाचा विळखा

केळझर (गोपाळसागर) धरणाच्या निर्मितीपूर्वी बारमाही दुथडी वाहणाऱ्या आरम नदीच्या पाण्याचा वापर शेतीसाठी करता यावा, यासाठी ब्रिटिश काळात ठिकठिकाणी बंधारे बांधून शेतकऱ्यांनी श्रमदानातून कालव्यांचे खोदकाम करून संपूर्ण गावातील शेतकऱ्यांच्या थोडीफार का होईना शेती असलेल्या शेतजमिनीतून उपपाट काढून आरम खोऱ्यातील कंधाणे, निकवेल, चौंधाणे, मुंजवाड, सटाणा व आराई गावात फडबागायत शेती अस्तित्वात आली. नियोजनबद्ध पद्धतीने पाणीवाटप व शासनाला भरावयाच्या पाणीपट्टीसाठी निधीची तरतूद करणे व कालव्यांच्या जुजबी दुरुस्तीसाठी गावागावांत पंच मंडळ आजच्या पाणीवाटप संस्था कार्यरत आहेत. 

गाळ साचल्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी

स्वातंत्रोत्तर काळात १९७२ मध्ये चौंधाणे येथील गोपाळराव मोरे यांच्या प्रयत्नातून ५७२ दशलक्ष घनफूट पाणी साठवणक्षमता असलेल्या केळझर प्रकल्पाची निर्मिती झाल्यानंतर फड कालव्यांद्वारे फडबागायत शेतीला आवर्तनाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतू पश्चिम पट्ट्यातील अवैध वृक्षतोडीमुळे घटणारे जंगलक्षेत्र, जमिनीची धूप यामुळे आज धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे त्याची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. तसेच गाळाने गच्च भरलेल्या बंधाऱ्याची उंची वाढवून कालव्यांची दुरुस्ती करण्याची आज गरज आहे.

आरम नदीवर एकही प्रकल्प नाही
 
दुरुस्तीअभावी केळझर धरण भरल्यानंतर हजारो क्यूसेक अतिरिक्त वाहून जाणारे किंवा आवर्तनाने सोडण्यात येणारे पाणी परिसरातील भूजल पातळीत वाढ करण्यासाठी नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याची मागणी फार पूर्वीपासून प्रलंबित आहे. यामुळे निवडणुकीच्या काळात बंधारे बांधकाम मंजूर करण्यात येतील, असे आश्र्वासन देऊन राजकीय मंडळी वेळ मारून नेत असल्याने ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांनंतर भौगोलिकदृष्ट्या अतिशय उत्तम परिस्थिती असलेल्या आरम नदीवर एकही प्रकल्प होऊ शकलेला नाही. त्यामुळे आहे त्याची दुरुस्ती करण्याची वारंवार मागणी होत आहे. 

फड बागायत गावनिहाय क्षेत्र एकरमध्ये 

कंधाणे : १६८ 
निकवेल : १७० 
चौंधाणे : १६५ 
सटाणा : ५२५ 
आराई : ५०० 

केळझर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पाणीसाठा कमी झाल्यावर गाळ काढण्यासाठी प्राधान्यक्रमाने निधी उपलब्ध करून दिला जाईल. - दिलीप बोरसे, आमदार 

धरणातील गाळ पोयटा या मातीचा प्रकार फळबागा व मुरमाड जमिनीसाठी अतिशय सुपीक असतो. त्यामुळे तो काढण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. फड कालव्यांची दुरुस्तीही फार गरजेची आहे. - बाळासाहेब बिरारी, शेती अभ्यासक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com