आता सुस्थितीत, पूर्वीच्या रस्त्यांवर खड्डे; सत्ताधारी भाजपचा मनसेवर अप्रत्यक्ष निशाणा

विक्रांत मते
Friday, 18 September 2020

शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे सुमारे ५ ते १२ वर्षांपूर्वीचे असून, त्या काळात भाजपची सत्ता नव्हती. त्या रस्त्यांचे अस्तरीकरण न केल्याने खड्डे पडले आहेत. रस्त्यांचे अस्तरीकरण आवश्यक असल्याचा दावा करण्यात आला.

नाशिक : शहरातील रस्त्यांवरून राजकारण तापले असताना महापालिकेतील सत्ताधारी भाजपने प्रशासनाचे समर्थन करताना भाजपच्या सत्ताकाळात झालेले रस्ते सुस्थितीत असल्याचे सांगत पूर्वीच्या रस्त्यांवर खड्डे पडल्याचा दावा करत मनसेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. सभागृहनेते सतीश सोनवणे यांनी माध्यमांकडे रस्त्यांबाबत माहिती देताना वस्तुस्थिती जाणून न घेता विरोधकांकडून आरोप होत असल्याचा दावा केला आहे. 

खड्डे सुमारे ५ ते १२ वर्षांपूर्वीचे

सभागृहनेते सोनवणे यांनी म्हटले, की २०१९-२० च्या अंदाजपत्रकात सुमारे १४.५८ कोटी रुपये रक्कम दुरुस्तीसाठी, तर खडी, मुरूम व अन्य साहित्यपुरवठ्यासाठी १३.२५ कोटींच्या रकमेचा समावेश करण्यात आला होता. राखीव निधीतून साधारणपणे एक हजार ३०० किलोमीटर डांबरी रस्ते व खडीकरण करणे अपेक्षित होते. २०१८-१९ व २०१९-२० या आर्थिक वर्षाकरिता केबल टाकण्यासाठी महापालिकेकडे ३५.१५ कोटी रुपये जमा आहेत. तीन वर्षांत सुमारे साठ किलोमीटर रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यात आली. हे काम भाजपच्या सत्ताकाळातील आहे. शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे सुमारे ५ ते १२ वर्षांपूर्वीचे असून, त्या काळात भाजपची सत्ता नव्हती. त्या रस्त्यांचे अस्तरीकरण न केल्याने खड्डे पडले आहेत. रस्त्यांचे अस्तरीकरण आवश्यक असल्याचा दावा करण्यात आला. त्यासाठी ऑक्टोबरमध्ये निविदाप्रक्रिया अपेक्षित असल्याचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. उपमहापौर भिकूबाई बागूल व भाजप गटनेते जगदीश पाटील यांची निवेदनावर स्वाक्षरी आहे. 

पाच वर्षांपूर्वीही भाजपचीच सत्ता 

भाजपने मनसेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला असला तरी ज्या सत्ताकाळाचा उल्लेख करण्यात आला, त्या काळात महापालिकेत मनसेचा महापौर असला तरी उपमहापौरपद भाजपकडे होते. विशेष म्हणजे विद्यमान महापौर सतीश कुलकर्णी त्या वेळी उपमहापौर असल्याने त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांकडे एक बोट दाखविले तरी चार बोटे भाजपकडे असल्याने रस्त्याच्या वादात भाजपने घेतलेली भूमिका अंगलट येण्याची शक्यता आहे. 

पाच ते दहा वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या रस्त्यांवर खड्डे पडले असून, त्या काळात महापालिकेत कोणाची सत्ता होती याचे आत्मपरीक्षण विरोधकांनी करावे. शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असल्याने विरोधक भाजपला लक्ष करत आहे. 
-सतीश सोनवणे, सभागृहनेता, महापालिका 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics over potholes in the streets in nashik marathi news